Tuesday, 15 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

** विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात २१ हजार ९९२ कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर

** मराठा आरक्षण तसंच धनगर आरक्षणाच्या मागणीवरून विरोधकांचा गदारोळ

** दोन दिवसांचं अधिवेशन लोकशाहीला परवडणारं नाही - विधानसभाध्यक्ष नाना पटोले

** बनावट पासपोर्ट बनवणाऱ्या टोळीला दहशतवादविरोधी पथकाकडून मुंबईत अटक

** शेतीसंबंधित प्रश्नांवरून अण्णा हजारे यांचा सरकारला पुन्हा उपोषणाचा इशारा

** राज्यात काल दोन हजार ९४९ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या १६० रुग्णांची नोंद

** औरंगाबाद महापालिका हद्दीत ११ आणि १२ वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता

आणि

** मराठवाडा रेल्वे प्रश्नाचे अभ्यासक ओमप्रकाश वर्मा यांना गोविंदभाई श्रॉफ पुरस्कार जाहीर

****

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कालपासून मुंबईत सुरु झालं. विधानसभेत काल विविध विधेयकं मांडण्यात आली. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयक, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक, या विधेयकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सदनात २१ हजार ९९२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

****

विधान परिषदेचं कामकाज मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून वादळी ठरलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. दोन दिवसांच्या अधिवेशनात आरक्षण, शेतकरी समस्या, कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कशी होणार, असा प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केला.

सभापती रामराजे निंबाळकर यांनी, याबाबत दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली.

या गदारोळातच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित केला. शेती हा विषय राज्य सूचीत आहे, मात्र, केंद्र सरकारनं चर्चेविना कृषी विधेयकं संमत केल्याचा आरोप, जयंत पाटील यांनी केला. महाविकास आघाडी सरकारनं याबाबत स्वतंत्र कायदा आणावा, अशी मागणी त्यांनी केली.

त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहासमोर मांडण्यात आले. अर्थराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पुरवणी मागण्या सदनासमोर मांडल्या. या दरम्यान, विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं, सभापतींना सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. विधानपरिषदेत तालिका सभापती म्हणून प्रसाद लाड, सतीश चव्हाण, गोपीकिशन बाजोरिया आणि सुधीर तांबे यांची नियुक्ती काल करण्यात आली.

दिवगंत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर, दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.

****

दरम्यान, अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. तर आमदार गोपिचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी, विधीमंडळ परिसरात ढोल वाजवून आंदोलन केलं. प्रश्न तेवत ठेवणं हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण असल्याचा आरोप, पडळकर यांनी यावेळी केला.

****

दोन दिवसांचं अधिवेशन लोकशाहीला परवडणारं नाही, असं विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. वेळेअभावी आमदारांना जनतेचे प्रश्न सदनात मांडता येत नाहीत, त्यामुळे सत्ताधारी तसंच विरोधकांनी पुढील अधिवेशन नियमित होण्याच्या दृष्टीनं एक नियमावली तयार करण्याची सूचना पटोले यांनी केली. इतर राज्यांप्रमाणे आठ ते दहा दिवसांचं अधिवेशन घेता येऊ शकतं, असंही पटोले यांनी नमूद केलं.

****

दहशतवादविरोधी पथकानं काल मुंबईत बनावट पासपोर्ट अर्थात पारपत्र बनवणाऱ्या बांग्लादेशी टोळीला अटक केली. आठ जणांच्या या टोळीकडून मोठ्या प्रमाणावर पारपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, वीजदेयकं, भाडेकरारपत्र, शाळा सोडल्याचे दाखले, जन्मप्रमाणपत्र, बँकेची खातेपुस्तकं आदी बनावट कागदपत्रं हस्तगत करण्यात आली. बांग्लादेशी चलन, बांग्लादेशी मोबाईल फोन सिम कार्ड, तसंच विविध बँकांची एटीएमकार्ड ही, या टोळीकडून जप्त करण्यात आलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केलं आहे. 

****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शेतीसंबंधित प्रश्नांवरून पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. कृषीमू्ल्य आयोगाला घटनात्मक दर्जा, शेतमालाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान हमी भाव, यासह अन्य मागण्यांवर विचारासाठी, एक उच्चाधिकारी समिती स्थापन करण्याचं आश्वासन पाच फेब्रुवारी २०१९ ला दिल्यानंतर आपण उपोषण स्थगित केलं होतं, परंतु या आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यानं, तेव्हा स्थगित केलेलं उपोषण पुन्हा सुरू करण्याचा इशारा, हजारे यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांना पत्र लिहून दिला आहे.

****

दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन राहिलेलं नाही, अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. ते काल वाशिम इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी काल धुळ्यात याच संदर्भात पत्रकार परिषद घेतली, शेती सुधारणा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. ज्या सुधारणा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झाल्या होत्या, त्या देशपातळीवर झाल्या तर विरोध का, असा प्रश्न भामरे यांनी विचारला.

****

शेतकरी संघटनांच्या आडून केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी, काँग्रेससह विरोधी पक्ष अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, खासदार भागवत कराड यांनी केला. ते काल जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. किमान आधारभूत किंमत, केंद्र सरकारकडून धान्य खरेदी आणि बाजार समित्यांची व्यवस्था यापुढेही कायम राहणार आहे, नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे आणखी पर्याय उपलब्ध होणार असल्याचं, खासदार कराड यांनी सांगितलं.

****

राज्यात काल दोन हजार ९४९ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ८३ हजार ३६५ झाली आहे. काल ६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार २६९ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका आहे. काल चार हजार ६१० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ६१ हजार ६१५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ५४ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ७२ हजार ३८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १६० रुग्णांची नोंद झाली.

बीड जिल्ह्यात पाच, औरंगाबाद जिल्ह्यात दोन, तर परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ५४ नवे रुग्ण आढळले, बीड जिल्ह्यात ३४, लातूर २७, नांदेड १५, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी १०, जालना सात, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवीन तीन रुग्ण आढळले.

****

औरंगाबाद महापालिका हद्दतील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इयत्ता ११ आणि १२ वीच्या सर्व माध्यमांचे वर्ग आजपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मार्गदर्शक सूचेनसह यासंदर्भातील एक पत्रक काल जारी केलं. शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणं तसंच पालकांकडून संमतीपत्र घेणं, आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षणही सुरू ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात कोविड-19 लसीकरणासाठी परिपूर्ण नियोजनासह सर्व संबंधितांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. लसीकरण झाल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरण्यासह इतर नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही चव्हाण यांनी दिल्या.

****

शिक्षण विभागाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात, परभणी जिल्हा शिक्षण संस्था महामंडळ, तसंच मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी, या शासन निर्णयाची काल होळी केली. शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यापुढे शाळांमध्ये शिपाई किंवा तत्सम पदं भरता येणार नाहीत. औरंगाबाद इथल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर काल निदर्शनं करत, या आदेशाची होळी करण्यात आली.

****

ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण अबाधित राहावं, या आणि अन्य मागण्यांसाठी, जालना जिल्ह्यातल्या अंबड तहसील कार्यालयावर, काल ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात, ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.

****

महाकवी ग.दि.माडगूळकर यांचं पुण्यात स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी काल लातूर इथं जनआंदोलन करण्यात आलं. या आंदोलनास अनेक साहित्यिकांनी स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शवला.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे देण्यात येणारा, पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृतीपुरस्कार’, मराठवाडा रेल्वे प्रश्नाचे अभ्यासक आणि प्रमुख आंदोलनकर्ते, ओमप्रकाश वर्मा यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ आणि रोख रुपये एकवीस हजार, असं पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचं हे १७वं वर्ष आहे. दरवर्षी गोविंदभाईंच्या स्मृतिदिनी २१ नोव्हेंबरला हा पुरस्कार दिला जातो, मात्र यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार २६ डिसेंबर रोजी वर्मा यांना प्रदान केला जाणार आहे. वर्मा यांनी गेल्या चार दशकांपासून मराठवाड्यात रेल्वे सुविधा, तसंच नियमित आणि उत्सव विशेष रेल्वेगाड्यांसाठी केलेल्या, यशस्वी पाठपुराव्याचा यथोचित गौरव व्हावा, यासाठी त्यांना हा पुरस्कार देत असल्याचं, संस्थेकडून सांगण्यात आलं.

****

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या पार्थिव देहावर काल कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. खंचनाळे यांचं काल कोल्हापूर इथं निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

पाली आणि बौद्ध साहित्याचे अभ्यासक डॉ. विमल कीर्ती यांचं काल नागपूर इथं निधन झालं, ते ७१ वर्षांचे होते. त्यांना कोविड संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राकृत विभागाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी केलं आहे. 

****

लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यात असलेल्या हत्ती बेटावर काल श्रमदान करण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांसह बीड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातून ७० पर्यावरणप्रेमी स्वयंसेवक, तसंच १३ संघटनांचे प्रतिनिधी या अभियानात सहभागी झाले होते. पर्यावरणाची दशा आणि दिशा यावर यावेळी चिंतन बैठकही घेण्यात आली.

****

बीड जिल्ह्याच्या माजलगाव इथं विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं विवाहितेची सासू आणि नवऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कोमल सिरसाट असं विवाहितेचं नाव असून तिने सप्टेंबर २०१५ मध्ये आत्महत्या केली होती.

****

राज्य माथाडी वाहतुक आणि कामगार संघटनेच्या वतीनं काल लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसंच औद्योगिक वसाहत परिसरात लाक्षणिक संप पाळण्यात आला. कोरोना काळात मरण  पावलेल्या माथाडी कामगारांना ५० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी हा बंद पाळण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेनं दिला आहे.

****

परभणी इथं पोलिसांनी एका घरात साठवून ठेवलेला एक लाख सात हजार रुपयांचा गुटखा काल जप्त केला. याप्रकरणी अब्दूल हफीज नावाच्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

बीड जिल्हयातल्या शेतकऱ्यांना कापसाची ऑनलाईन नोंद करण्यासाठी १९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप बाजार समितीकडे नोंद केलेली नाही, त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह नोंद करावी. यानंतर पुन्हा नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

****

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने रब्बी हंगामात ऊस उत्पादक सभासदांना ऊस लागवडी साठी तीन लाख रुपये पीक कर्ज वाटपास मंजुरी दिली आहे. बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी ही माहिती दिली. जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यात जिल्हा बँकेस, ९२४ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आलं होतं, त्यापैकी आतापर्यंत ७०५ कोटी रुपये कर्ज वाटप करुन बँकेने निर्धारित उद्दिष्टाची ७६ टक्के पूर्तता केली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभासाठी सहा हजार ७५२ शेतकऱ्यांनी, अद्याप आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तत्काळ आधार प्रमाणिकरण करावं, असं आवाहन, नांदेडच्या सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक ए.डी.चव्हाण यांनी केलं आहे.

****////****

No comments:

Post a Comment