Friday, 18 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

** राज्यात पुढच्या महिन्यापासून कोविड लसीकरण सुरू करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

** पुणे इथं मंजूर आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरु

** देशात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम -जीपीएस आधारित पथकर संकलनाला सरकारची मान्यता

** मराठवाड्यात जिल्हा परिषद शाळांच्या निजामकालीइमारतींसाठी, दोनशे कोटी रुपये निधी मंजूर

** राज्यात कोविडमुक्तीचा दर ९४ टक्क्यांवर; मराठवाड्यात नव्या २५८ रुग्णांची नोंद

** ल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी, लातूर महापालिकेची महिलांकरता 'मी सौभाग्यवती' स्पर्धा

आणि

** ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीत भारताच्या काल दिवसअखेर, सहा बाद २३३ धावा

****

राज्यात पुढच्या महिन्यापासून कोविड लसीकरण सुरू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारनं परवानगी दिली तर पुढच्या महिन्यात पहिल्या टप्प्यात, तीन कोटी लोकांना ही लस मिळेल, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. या लसीकरणासाठी आशा कार्यकर्त्यांसह १८ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. लसीच्या साठवणुकीसाठी शीतगृहांची व्यवस्था झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला लसीकरणाची तारीख एसएमएसद्वारे कळवली जाईल आणि ओळख पटल्यावरच संबंधिताला लस दिली जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं. या संदर्भातलं सुक्ष्म नियोजन सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राज्यातल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये, आता कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतल्याची माहिती, आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे. हा निर्णय दोन सप्टेंबर २०२० पासून लागू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यात सुधारित कृषी कायदे करण्याची आवश्यकता असल्याचं, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण यांनी यासंदर्भात राज्याच्या कृषी कायदे सुधारणा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवलं आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांनी चांगले कायदे केले आहेत. त्याच धर्तीवर राज्यात, सुधारित कायदा करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका स्वीकारावी, असं चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे. या दरम्यान, कायद्यांसंदर्भात स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीची काल बैठक झाली. सर्व सदस्यांची चर्चा होऊन एकमत झाल्यावर, याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यातील औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश, ऊर्जामंत्री डॉ. नीतीन राऊत यांनी दिले आहेत. याबाबत महापारेषण, महावितरण आणि महाजनकोच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी, विशेष जाहिरात देण्यात यावी, तसंच नियमाप्रमाणे त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावं, असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, जे शेतकरी वीज देयक थकबाकीची अर्धी रक्कम अदा करून, नव्या दराप्रमाणे पुढील देयक अदा करण्यास तयार असतील, अशा शेतकऱ्यांना तातडीनं दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देशही ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी दिले.

****

पुणे इथं मंजूर करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रियेसह अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी ही माहिती दिली. विद्यापीठ स्थापनेनंतर पहिल्या वर्षात क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशिक्षण आणि सराव, हे तीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून, प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली असल्याचं, त्यांनी सांगितलं. पुण्यातल्या बालेवाडी इथं या विद्यापीठ उभारणीसाठी चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, टप्प्या- टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातही क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार असल्याचं, क्रीडा मंत्री म्हणाले.

****

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. श्रीरंग गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या २५ सदस्यांच्या मंडळात, औरंगाबाद इथले प्राध्यापक डॉ जयंत शेवतेकर, स्मिता शरद भोगले यांचा समावेश आहे. रंगभूमीवर सादर होणाऱ्या संहिताचं पूर्वपरीक्षण करून योग्यता प्रमाणपत्र देण्याचं काम ही समिती करेल.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन मुंबईतले आमदार अमित साटम यांनी केलं आहे.

****

देशात पथकर नाक्यांवर लांब रांगा लागू नयेत आणि वाहतुकीची कोंडी न होता ती अखंड सुरू रहावी, यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम - जीपीएस आधारित पथकर संकलन करण्यास, सरकारनं मान्यता दिली आहे. यामुळे आगामी दोन वर्षात भारत ‘पथकर नाकेमुक्त’ होईल, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते नागपूर इथं भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाच्या स्थापना सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. केवळ शासकीय निधीतून सर्व सुविधा उपलब्ध होणं शक्य नाही, त्यामुळेच लोकसहभाग ही आजची आवश्यकता आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

****

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन, 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 'महिला शिक्षण दिन' देशभरात साजरा करण्यात यावा, यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करणार असल्याचं, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. इतर मागासवर्गीयांचं आरक्षण वाचवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात, ज्येष्ठ आणि अनुभवी विधिज्ञांची नेमणूक करण्याची मागणीही, मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भातही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत आढावा बैठक झाली. जिल्ह्यातल्या सर्व पर्यटनस्थळांना जोडणारे रस्त्यांचं जाळं मजबूत असावं, अशा सूचना ठाकरे यांनी केल्या. पर्यटकांसाठी शहरातच्या वाहतूक व्यवस्थेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. या बैठकीला महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, सहभागी झाले होते. औरंगाबाद-ते-अजिंठा लेणी यासह जिल्ह्यातल्या सर्व पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचा दर्जेदार विकास होणं आवश्यक असून, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, असं सत्तार यावेळी म्हणाले.

****

मराठवाड्यातल्या जिल्हा परिषद शाळांच्या निजामकालीइमारतींचा दर्जा सुधारण्यासाठी, दोनशे कोटी रुपये निधी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आली. १९६० पूर्वीच्या या एक हजार ४५ शाळांमधल्या, सुमारे साडे तीन हजारावर वर्गखोल्यांचं बांधकाम या निधीतून करण्यात आलं आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या २९३ शाळा, जालना जिल्ह्यातल्या २०३, नांदेड १५७, औरंगाबाद १३०, लातूर ९४, परभणी ७५, उस्मानाबाद ५१ तर हिंगोली जिल्ह्यातल्या ४२ शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अभ्यासक्रमात सुधारणा आणि शिक्षकांचं प्रशिक्षण यावर भर देण्यात येणार आहे.

****

राज्यात काल तीन हजार ८८० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ८४ हजार ७७३ झाली आहे. काल ६५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार ४९९ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल चार हजार ३५८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ७४ हजार २५५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक १४ दशांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ६० हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २५८ रुग्णांची नोंद झाली.

बीड, लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ८९ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ४५, लातूर ४१, नांदेड ३२, परभणी २४, जालना १५, उस्मानाबाद ११, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एक नवीन रुग्ण आढळला.

****

परभणी जिल्ह्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रं तसंच चार नवीन उपकेंद्रं स्थापन करण्यास, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. सोनपेठ तालुक्यातल्या मौजे उखळी, मानवत तालुक्यात मौजे केकरजवळा आणि पालम तालुक्यात मौजे पेठशिवणी, या ठिकाणी तीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन होणार आहेत. तर सोनपेठ तालुक्यात तीन उपकेंद्रं स्थापन होणार आहेत. आरोग्य विभागाने काल या बाबतचा अध्यादेश जारी केला.

****

परभणी जिल्ह्यात येत्या २१ डिसेंबर पासून इयत्ता नववी आणि अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात महापालिका क्षेत्र वगळता इतर शाळांमधे दहावी आणि बारावीचे वर्ग दोन डिसेंबरपासून तर महानगर पालिका क्षेत्रातील वर्ग दहा डिसेंबरपासून सुरू झाले. सर्व शाळांनी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासंदर्भात योग्य ती काळजी घेत वर्गांना प्रारंभ केला असून, पालकांनीही यासंदर्भात संमतीपत्र पाठवलं असल्याचं मुगऴीकर म्हणाले.

****

घरात निर्माण होणारा ओला कचरा घराच्या परिसरातच कुजवून त्यापासून खत निर्मिती करण्यासाठी, लातूर महापालिकेनं महिलांसाठी 'मी सौभाग्यवती' ही स्पर्धा आयोजित केली आहे. यासंदर्भात बचत गटाच्या महिला आणि स्वच्छता निरीक्षक यांची काल एक बैठक झाली. येत्या एक जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीसाठी ही स्पर्धा असेल, १५ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत महिलांनी राबवलेल्या खतप्रक्रियेची पाहणी केली जाणार असल्याचं महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत यांनी केलं आहे.

****

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल पहिल्या दिवसअखेर, सहा बाद २३३ धावा केल्या. ॲडलेड इथं सुरू झालेल्या या सामन्यात ७४ धावा काढणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला, चेतेश्र्वर पुजारानं ४३ आणि अजिंक्य रहाणेनं ४२ धावा काढून चांगली साथ दिली. कालचा खेळ थांबला तेंव्हा वृद्धीमान साहा नऊ आणि रविचंद्रन अश्र्विन १५ धावांवर खेळत होते.

****

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं लातूर इथं स्मृतिभवन उभारण्यात येणार आहे, त्यासाठी लातूर पंचायत समितीच्या सभापतींचं निवासस्थान जिल्हा परिषदेनं सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्याची सूचना, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा निकालांतील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी, काल औरंगाबाद इथं विद्यापीठात ठिय्या आंदोलन केलं. विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश सहमंत्री अंकिता पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांसह प्र-कुलगुरु डॉ.श्याम शिरसाट यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या सर्व गावातल्या विहारी आणि कुपनलिकांतल्या पाण्याची तत्काळ तपासणी करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी, परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांना या मागणीचं निवेदन काल सादर केलं. ग्रामीण भागात स्वच्छ पाणी पुरवठा यंत्र तत्काऴ बसवावीत अशीही मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे.

****

औरंगाबाद शहरात `बांधा वापरा आणि हस्तांतरण करा` योजने अंतर्गत सुरु असलेली कामं वेळेत पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. शहरात सिद्धार्थ उद्यानासह विविध ठिकाणी, या योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा महापालिका प्रशासकांनी काल घेतला. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी आणि नवीन होणारे रस्ते एकमेकमांसाठी अडथळे निर्माण करणार नाही या बाबत नियोजन आणि दक्षता घेण्याच्या सूचनाही महापालिका प्रशासक पांडेय यांनी केल्या.

****

अंबाजोगाई इथले सेवानिवृत्त शिक्षक पुनमचंद परदेशी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईत येत्या १८ एप्रिल २०२१ रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. परदेशी हे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर प्राथमिक विद्यालयात, ३१ वर्ष अध्यापन केल्यानंतर निवृत्त झाले आहेत.

****

परभणी इथं कृषी कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात धरणे आंदोलन केलं. शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद पंचायत समितीचा विस्तार अधिकारी संतोष साबळे यानं दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे. शौचालय बांधकामाचा धनादेश देण्यासाठी साबळे याने लाचेची मागणी केली होती.

****

बीड जिल्ह्यात आष्टी इथला सहाय्यक निबंधक सुधाकर वाघमारे आणि लिपीक कविता खेडकर यांना काल सात हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली. संस्था नोंदणी करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****////****

 

No comments:

Post a Comment