Tuesday, 22 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

·       कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

·       राज्यात वाढणारा थंडीचा कडाका विषाणूजन्य आजारासाठी पोषक असल्याचा कृती पथकाचा राज्य सरकारला अहवाल

·        जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यावर्षीचा  अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ जाहीर

आणि

·        कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेअसल्याचा भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा दावा

****

इंग्लंडसह युरोपमधल्या अन्य काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांशी  मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार, त्याअनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदींबाबत त्यांनी यावेळी आढावा घेतला. द्रवरुप प्राणवायु, व्हेंटिलेटर्स, औषधं यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण - विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगानं पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवावी, अश्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. इतर देशांमधून प्रवास करुन महाराष्ट्रात विविध राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडे लक्ष द्यावं. त्यांच्याबाबतीत जागरूकता ठेवावी. त्यासाठी दिल्लीसह इतर राज्यांशी, प्रशासनाशी समन्वय साधावा, असं ते म्हणाले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

दरम्यान, राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला असून, कोणत्याही प्रकारच्या विषाणूजन्य आजारासाठी हे वातावरण पोषक ठरणारं असल्यानं या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करणारा अहवाल कृती पथकानं जिल्हा आणि राज्य प्रशासनाला सादर केला आहे. कृती पथकाचे सदस्य असलेल्या डॉ. शशांक जोशी यांनी यासंदर्भातली माहिती दिली. आगामी नाताळपासून ते पुढील २६ जानेवारीपर्यंतचा महिन्याभराचा कालावधी अतिशय महत्वाचा असून या काळात गर्दी टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारे सर्व उपाय अतिशय काटेकोरपणे अंमलात आणण्याची गरज असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. प्रामुख्यानं नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं होणाऱ्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळीच योग्य ते निर्णय घेतले जावेत अशी अपेक्षा कृती पथकानं व्यक्त केली आहे.

****

देशात सुरु असलेल्या विकासाचा लाभ कोणत्याही पक्षपाताविना प्रत्येक नागरिकाला मिळावा या दिशेनं देशाची वाटचाल सुरु आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी अलिगढ मुस्लीम विद्यापिठाच्या शताब्दी महोत्सवाला दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते.

आत्मनिर्भर भारत उपक्रमाद्वारे नवा भारत घडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं. देशात गेली सत्तर वर्षे मुस्लीम मुलींचं शाळेतून होणाऱ्या गळतीचं प्रमाण सत्तर टक्के होतं. सरकारनं स्वच्छ भारत मिशन सुरु केलं. खेड्यांमधे तसंच शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी शौचालयं बांधली. आता हे गळतीचं प्रमाण सुमारे ३० टक्क्यावर आलं असल्याचं, ते म्हणाले. मुस्लीम विद्यापिठाचा शैक्षणिक इतिहास हा भारताचा मौल्यवान वारसा असून इतर देशांशी भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी या विद्यापिठानं काम केलं आहे. या विद्यापिठानं कोरोना संकटाच्या काळात समाजाला मोठ्या प्रमाणात मदत केली. हजारो लोकांच्या मोफत चाचण्या केल्या, विलगीकरण कक्ष उभारले, प्लाझ्मा बँका सुरु केल्या आणि पीएम केअर फंडाला मोठ्या रकमेचं योगदान दिलं. समाजाबाबत आपली बांधिलकी पार पाडण्याविषयी अलिगढ मुस्लीम विद्यापीठ किती गंभीर आहे, हेच यातून दिसतं असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

****

संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा अटल संस्कृती गौरव पुरस्कारया वर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना दिला जाणार असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार माशेलकर यांना येत्या २५ तारखेला प्रदान केला जाणार असून, मानपत्र, पुणेरी पगडी आणि एक लाख रुपये गौरवनिधी असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद जिल्ह्यातले लोककलावंत जालिंदर केरे यांनी केलं आहे.

****

ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. तर प्रसिद्ध गायक शब्बीर कुमार यांना रफी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मोहम्मद रफी यांच्या ९६ व्या जयंती निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती माजी शिक्षण मंत्री आमदार विधिज्ञ आशिष शेलार यांनी आज दिली.

स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी संगीत क्षेत्रातल्या एका ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव आणि मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. पुरस्काराचं हे तेरावं वर्ष असून रोख एक लाख रूपये, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शब्बीर कुमार  यांना देण्यात येणाऱ्या रफी पुरस्काराचं स्वरुप रोख ५१ हजार रूपये आणि स्मृतीचिन्ह असं  आहे. परवा २४ तारखेला मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

केंद्र सरकारनं पारित केलेल्या कृषी कायद्यांविषयी शेतकऱ्यांमध्ये विरोधकांकडून भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं  भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीनं मराठवाडा विभागीय कार्यकर्ता संवाद आणि शेतकरी मेळावा परभणीत आज घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या तीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मालाची विक्री करता येणार आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं शोषण थांबणार असल्याचं ते म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्याभरात शेतकरी विधेयकाबाबत जनजागृती यात्रा काढण्यात येणार असल्याचं पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी यावेळी सांगितलं.

****

सोलापूर रेल्वे स्थानकाचा वेगानं विकास होण्यासाठी सुरू असलेली कामं जलद गतीनं  पूर्ण करावीत,  यासह इतर मागण्या खासदार डॉ. जयसिध्देश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केल्या आहेत. मध्य रेल्वे सोलापूरच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बैठकीत आज ते बोलत होते. विलंबानं रखडलेलं रेल्वेचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण जलद गतीने पूर्ण व्हावीत. तसंच सोलापूर - नवी दिल्ली ही नवी रेल्वेगाडी सुरू करावी, अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.

****

राजधानी नवी दिल्लीत गेल्या २४ तासात कोरोना विषाणुचे ८०३ नवे रुग्ण आढळले असून २७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत कोरोनाचे ६ लाख १७ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून ५ लाख ९८ हजार रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १० हजार ३०४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यु झाला आहे. दिल्लीत सध्या ९ हजार २५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद शहरात नंदनवन कॉलनीतल्या एका ७३ वर्षीय पुरुष कोविड बाधिताचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सात नवीन कोविड बाधित रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे एकूण मृतांची संख्या एक हजार १९० झाली असून एकूण रुग्णांची संख्या आता ४४ हजार ९७९ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार २०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

//**********//

No comments:

Post a Comment