Thursday, 3 December 2020

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

** राज्यातल्या वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा सरकारचा निर्णय; लातूर आणि औरंगाबादसह चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिविशेषोपचार रुग्णालयाला मान्यता

** राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार

** तलाठी पदासाठी निवड झालेल्या, एस.ई.बी.सी. वगळता अन्य उमेदवारांना नियुक्तीचा निर्णय

** कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मानक कार्यप्रणाली जारी

** राज्यात पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघासाठी परवा झालेल्या मतदानाची आज मोजणी

** राज्यात पाच हजार ६०० नव्या कोविडबाधितांची नोंद; मराठवाड्यात नवे ३४३ रुग्ण 

** उस्मानाबाद जिल्ह्यात बाल सुरक्षा सप्ताहादरम्यान तीन बालविवाह रोखण्यात यश

आणि

** तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय

****

राज्यातल्या वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा जातीवाचक नावं असणाऱ्या वस्ती-वाड्यांना आता नवीन नावं देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

लातूर आणि औरंगाबादसह अकोला तसंच यवतमाळ इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्याला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या रुग्णालयासाठी पहिल्या टप्प्यांकरता आवश्यक ८८८ पदांच्या निर्मितीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.

 

डिसेंबर २०१९ पर्यंतचे राजकीय आणि सामाजिक आंदोलनातले खटले मागे घेण्याचा, तसंच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून एक हजार कोटी रुपयांच्या विशेष अर्थसहाय्याला काल मान्यता देण्यात आली.

 

राज्यात प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येईल. मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना तसंच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीतल्या तरतुदी भिन्न असल्यामुळे मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना सुरुच राहणार आहे.

****

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार आहे. यासाठीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली जाणार असल्याचं, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात आलं. हिवाळी अधिवेशन येत्या सात डिसेंबर पासून नागपूर इथं घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता, मात्र कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईघेण्याचा निर्णय घेण्यात आला.

****

राज्यात तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास - एस.ई.बी.सी. संवर्गातली पदं वगळता, इतर प्रवर्गातल्या निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल दिली. त्यानुसार औरंगाबाद, बीड, नांदेड, धुळे, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा, या सात जिल्ह्यातल्या सन २०१९ च्या तलाठी पदभरतीतल्या उमेदवारांच्या नियुक्तीला मान्यता मिळाली आहे. याबाबत या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आलं आहे.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे यांनी कोविड प्रतिबंधासाठी नागरिकांना मास्क वापरण्याचं तसंच वारंवार साबणानं हात धुण्याचं आवाहन केलं आहे.

***

इंग्लंडमध्ये कोविडच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करणारा इंग्लंड हा पहिला देश ठरला आहे. पुढच्या आठवड्यापासून या लसीचं उत्पादन सुरू होईल, सध्या या लसीचे पाच कोटी डोस आणि पुढच्या वर्षात एक अब्ज तीस कोटी डोस उत्पादित होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

****

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मानक कार्यप्रणाली जारी केली आहे. यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातले बाजार बंद राहणार आहेत. ६५ वर्षावरील व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील बालकांना अनावश्यक कामाखेरीज घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या भागातली दुकानं उघडण्याची परवानगी असेल, तिथली दुकानं उघडताच निर्जंतुक करण्यास, तसंच ग्राहकांमध्ये सहा फूट अंतर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. ग्राहकांसाठी दुकानाबाहेर सॅनिटायझर ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

****

युवकांनी व्यवसायासाठी ई वाहनांचा अधिकाधिक वापर करावा, असं आवाहन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर यासंदर्भातल्या बैठकीनंतर बोलत होते. इलेक्ट्रीक रिक्षा, मालवाहू रिक्षा आदी वाहन खरेदीसाठी, युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात, विविध बँक अधिकारी तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांची आठवले यांनी बैठक घेतली, तसंच बेरोजगार युवक आणि उद्योजकांसोबत दुसरी बैठक घेऊन त्यांना याबाबत मार्गदर्शन केल्यानंतर ते बोलत होते.

****

येत्या पाच डिसेंबरला जागतिक मृदादिनानिमित्त प्रत्येक गावात कृषी कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश, कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. काल मुंबईत मंत्रालयात झालेल्या ग्रामपंचायत स्तरावर सुपिकता निर्देशांक फलक लावण्याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गावातल्या शेतजमिनीत असलेले अन्न घटक आणि त्यासाठी आवश्यक खताचं प्रमाण, याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत, असं भुसे यांनी सांगितलं. गावातल्या प्रमुख पिकांच्या मार्गदर्शनासाठीही अशा प्रकारचे फलक लावण्याचं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं.

****

धनगर समाज महासंघाची काल धुळ्यात राज्यव्यापी बैठक घेण्यात आली. महासंघाचे संस्थापक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीत राज्यभरातून धनगर संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे धनगर आरक्षणाच्या मुद्यावर सकारात्मक असून कायदेतज्ञांचा सल्ला घेणार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं डांगे म्हणाले. केंद्र सरकार आरक्षणाचा विषय सोडवेल असा आपल्याला विश्वास असल्याचं, डांगे यांनी सांगितलं.

****

उत्तर प्रदेशात जागतिक स्तरावरची फिल्मसिटी उभी करणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. उत्तरप्रदेशात प्रस्तावित फिल्मसिटीसाठी नोएडा इथं एक हजार हेक्टर जमीन खरेदी करत असून, त्या संदर्भात तज्ज्ञांशी चर्चा केल्याचं आदित्यनाथ यांनी सांगितलं. आपण मुंबईतून काहीच घेऊन जायला आलेलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यात पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघासाठी परवा झालेल्या मतदानाची मतमोजणी आज होत आहे. औरंगाबाद इथं पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत होणार असून, मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे, कोविड संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे, सुरक्षेसंदर्भात बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा, तैनात आहे.

****

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, राज्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या अंतर्गत आज ३ डिसेंबरला प्रत्येक जिल्हाधिकारी तसंच तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद इथं आज दुपारी १ ते चार या वेळेत पैठण दरवाजा परिसरात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते सुभाष लोमटे, राम बाहेती यांनी दिली.

****

राज्यात काल पाच हजार ६०० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ३२ हजार १७६ झाली आहे. राज्यभरात काल १११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर दोन पूर्णांक ५८ शतांश टक्के झाला आहे. तर काल पाच हजार २७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ९५ हजार २०८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ५२ शतांश टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात ८८ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३४३ रुग्णांची नोंद झाली.

लातूर इथं काल तीन कोविडग्रस्तांचा तर औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नांदेड इथं काल एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल नव्या ९९ कोविडग्रस्तांची नोंद झाली, जालना जिल्ह्यात ६५, बीड ५२, लातूर ५०, नांदेड ३०, उस्मानाबाद २६, परभणी १८ तर हिंगोली जिल्ह्यात काल नव्या ३ रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, औरंगाबाद रेल्वे स्थानकावर दिल्लीहून आलेल्या १९६ प्रवाशांची तर विमानतळावर २७ प्रवाशांची काल RTPCR चाचणी करण्यात आली

****

उस्मानाबाद जिल्ह्यात बाल सुरक्षा सप्ताह तसंच दत्तक सप्ताहादरम्यान तीन बालविवाह रोखण्यात आले. जिल्ह्यात सुर्डी, अणदूर तसंच उस्मानाबाद शहरातल्या देवकते गल्ली इथं हे बालविवाह होणार होते, मात्र वधु वराच्या कुटूंबाचं समुपदेशन करण्यात आलं, त्यानंतर पंचनामा करुन तसंच हमीपत्र घेऊन हे बालविवाह रोखण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातले कन्नड भाषा विभागप्रमुख डॉ. रमेश मुलगे यांना, कर्नाटकातल्या विश्व कन्नडिगा संस्थेचा, 'कर्नाटका राज्योत्सव रत्न पुरस्कार' मिळाला आहे. कर्नाटक - महाराष्ट्र सीमा भागात कन्नड विषयातली भरीव साहित्यनिर्मिती तसंच कन्नड भाषाप्रचार आणि सेवेसाठी डॉ. मुलगे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांची कन्नड भाषेत २४ पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

****

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या राज्यस्तरीय मानांकनात औरंगाबाद शहरानं तिसरा क्रमांक मिळवला आहे. काही महिन्यांपासून या प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेल्या कामांची ही पावती असल्याचं महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं जारी केलेल्या या मानांकनात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे.

****

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानांतर्गत लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात अनसरवाडा इथं, रुमा रुरल महाराष्ट्र हा महिला बचत गट कार्यरत आहे, गेल्या तीन वर्षात या गटानं गोधडी या पारंपारीक कलाकुसरीच्या पांघरुणाला आता डिजीटल मार्केंट मिळवून दिलं आहे. या गटात ३० महिला गोधडी शिवण्याचं काम करतात. ही गोधडी आता ॲमेझॉन या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचं, या गटाच्या प्रशिक्षक मधुवंती मोहन यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलं आहे.  

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत कालच्या तिसऱ्या सामन्यात भारतानं यजमान ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं, हार्दिक पंड्याच्या ९२, रवींद्र जडेजाच्या ६६ तर कर्णधार विराट कोहलीच्या ६३ धावांच्या बळावर ३०२ धावा करत, यजमान संघाला ३०३ धावांचं लक्ष्य दिलं, मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ २८९ धावांतच सर्वबाद झाला. शार्दुल ठाकूरनं ३, जसप्रीत बुमराह २ तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी एक एक बळी घेतला. नवोदित गोलंदाज टी नटराजन यानं आपल्या पदार्पणाच्या सामन्यात दोन बळी घेतले. दरम्यान, या मालिकेनंतर दोन्ही संघात टी ट्वेंटी तसंच कसोटी क्रिकेट मालिका होणार असून, पहिला टी ट्वेंटी सामना उद्या चार तारखेला होणार आहे.

****

रस्त्यावरची रहदारी दिव्यांगांकरता सुगम करण्याची मागणी राज्य दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटनेनं केली आहे. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी या मागणीचं निवेदन राज्याच्या गृहमंत्र्यांकडे सादर केलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालयात कंत्राटी पद्धतीनं काम केलेले कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून साखळी उपोषण करत आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्याचं वेतन मिळावं, कंत्राटी कामगारांना कामात सामावून घेण्यात यावं, शासनानं जाहीर केल्याप्रमाणे कोविड काळात मरण पावलेल्या कोविड योद्ध्यांना, नियमानुसार सानुग्रह अनुदान देण्यात यावं, या मागण्यांसाठी उपोषण करत असल्याचं, आंदोलकांकडून सांगण्यात आलं.

****

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल परभणी इथं वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. वीज वितरण कंपनीत करण्यात येणार असलेल्या नोकर भरतीत मराठा तरुणांना एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून संधी देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं, संतप्त पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांचा जाहीर निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

****

व्याघ्र सफारीसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अवैधरित्या जंगल भ्रमंती घडवणाऱ्या दोघांना, काल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. परवानगी नसलेल्या पर्यटकांना वनरक्षक टेकचंद सोनुले हा एका दलालामार्फत, जास्तीचे पैसे घेऊन नवेगाव प्रवेशद्वारावरून अनाधिकृतपणे आत सोडत असताना, वन कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना रंगेहाथ पकडलं, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

//**************//

 

No comments:

Post a Comment