Saturday, 12 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 December 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत चढ उतार आले, तरीही आर्थिक सुधार होत असल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. भारतीय उद्योग आणि वाणिज्य महासंघ - फिक्कीच्या त्र्याण्णवाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, पंतप्रधान आज बोलत होते. उद्योजक, तरुण, शेतकरी आणि सर्व सामान्य भारतीयांना, आर्थिक व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येण्याचं श्रेय जातं, असं ते म्हणाले. जागतिक महामारीच्या काळात आपल्या नागरीकांचं संरक्षण करण्यात भारतानं यश प्राप्त केलं असून, देश अन्य काही क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, हे सिद्ध केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून, त्यांचं आगमन होत आहे. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या जलवाहिनीसह विविध विकास कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये शहरातल्या मिटमिटा परिसरात प्राणी संग्रहालयासाठी सफारी पार्क, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक तथा स्मृतीवन आणि शहरात सुरू असलेल्या तसंच प्रलंबित १५२ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा शुभारंभही मुख्यमंत्री करणार आहेत. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या गरवारे क्रीडा संकुलावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या चारही कामांचा शुभारंभ होईल. कार्यक्रम ठिकाणी फक्त २०० निमंत्रितांना प्रवेश असेल. नागरिकांनी याठिकाणी न येता सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे या कार्यक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केलं आहे.

****

राज्यात शासकीय रुग्णालयांमधल्या रुग्णांना आजपासून मोफत रक्त देण्यात येत आहे. कोविड १९ महामारीच्या काळात रुग्णांना रक्त मिळण्यात अडचण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

****

विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांच्या नावांची राज्यपालांकडून घोषणा होण्याआधीच त्याला विरोध करणं चुकीचं आहे, त्यामुळे सदस्य निवडीला विरोध करणारी याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. कायद्यातल्या तरतुदीनुसार सरकार या याचिकेला उत्तर देण्यास बांधील नसल्याचंही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेल्या १२ पैकी आठ नावांवर आक्षेप घेत दिलीप आवळे आणि शिवाजी पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून, ही आठ नावं निव्वळ राजकीय पार्श्वभूमीचे असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. यावरची पुढील सुनावणी १८ डिसेंबरला होणार असून, राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

****

देशात काल दिवसभरात ३० हजार पाच नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४४२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९८ लाख २६ हजार ७७५ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ४२ हजार ६२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ३३ हजार ४९४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९३ लाख २४ हजार ३२८ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन लाख ५९ हजार ८१९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल दहा लाख ६५ हजार १७६ कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत जवळपास १५ कोटी २६ लाख ९७ हजार ३९९ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

****

राज्यातल्या सर्व खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना यापुढे सुधारीत आकृतीबंध लागू करण्याऐवजी विद्यार्थी संख्येनुसार प्रतीशाळा शिपाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. या शाळांमधले नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाई कामगार, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर या पदांवरचे कर्मचारी निवृत्त झाल्यावर ही पदं संपुष्टात येतील, असं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे. प्रत्येक शाळेत किती विद्यार्थी संख्या असल्यास, किती शिपाई लागू राहतील, त्यांना शहरात आणि ग्रामीण भागात किती भत्ता दिला जाईल, यासंबंधीचे निर्देशही देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये सद्यस्थितीत एकही चतुर्थ श्रेणी पद कार्यरत नाही, तिथे हा आकृतीबंध लागू होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातल्या रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढ, पिंपळढव साठवण तलाव आणि जलसंधारण विभागाच्या सिंचन योजनांना पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भातली कारवाई जलद गतीने करण्याची सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या विविध सिंचन प्रकल्प आणि भोकर तालुक्यातल्या जलसंपदा विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. नांदेड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी जीवनदायी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचं पुनर्नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या पुनर्नियोजनातून पैनगंगा नदीवर सहा उच्च पातळी बंधारे बांधण्यात येणार आहेत.

****////****

 

No comments:

Post a Comment