Friday, 4 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** देशात पुढच्या काही आठवड्यात कोविड लस उपलब्ध होणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

** विधान परिषदेच्या नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचा विजय

** दिल्लीतलं शेतकरी आंदोलनही राजकीय हेतूने प्रेरित - माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा आरोप

** औरंगाबाद इथं एका कोविडग्रस्ताचा मृत्यू; जालना जिल्ह्यात नवे ४७ नवीन कोविडग्रस्त

आणि

** पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा यजमान ऑस्ट्रेलियावर अकरा धावांनी विजय

****

देशात पुढच्या काही आठवड्यात कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. देशात सध्या आठ ठिकाणी सुरू असलेलं या लसीबाबतचं संशोधन, विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये आहे. शास्त्रज्ञांकडून या लसीला मान्यता मिळाल्यानंतर लसीकरण सुरू केलं जाईल, असं पंतप्रधानांनी सांगितलं. या लसीची साठवणूक तसंच पुरवठ्यासाठी शीतगृहांची उभारणी केली जात असून, आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांना प्राधान्यानं लस दिली जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. लस येईपर्यंत कोविड त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, द्रविड मुनेत्र कळघमचे टी आर बालू यांच्यासह अनेक पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

****

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. या निवडणुकीसाठी विजयासाठी आवश्यक असलेली ६० हजार ७४७ मतं पहिल्या फेरीत एकही उमेदवार मिळवू न शकल्यानं, १७ व्या फेरीपर्यंत मतमोजणी करावी लागली, त्यानंतर अभिजित वंजारी यांना ६१ हजार ७०१ तर भाजपचे संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मतं मिळाली.

****

पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड विजयी झाले. लाड यांना पहिल्या पसंतीची १ लाख २२ हजार १४५ मतं मिळाली तर, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३ हजार २२१ मतं मिळाली. मनसेच्या रुपाली पाटील यांना ६ हजार ७१३ तर जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील यांना ४ हजार २५९ मत मिळाली.

****

धुळे - नंदूरबार विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाचं शीर्षस्थ नेत्यांनी गांभिर्याने आत्मपरिक्षण करावं आणि फुटीरांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केली आहे. महाविकास आघाडीला किमान १९५ मतं मिळणं अपेक्षीत असताना, अभिजित पाटील यांना फक्त ९८ मतं मिळाली. त्यामुळे आघाडीतले घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९७ मतदारांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. या निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलं आहे.  

****

मुंबईत शहर बस वाहतुक करणाऱ्या बेस्ट कंपनीच्या ताफ्यात २६ वातानुकुलित इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या बसचं लोकार्पण केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या बसमधून प्रवास करून बसची पाहणी केली. शहरातल्या वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या 'फेम II' या इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातल्या उपक्रमांतर्गत ही योजना राबवली जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यावेळी हजर होते, या योजनेअंतर्गत 'फेम'कडून ३४० बस गाड्या मंजूर झाल्या असून, उर्वरित बसगाड्या लवकर उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

****

गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागानं घेतला आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास रक्तपेढीवर पाच पट दंड आकारला जाईल. रक्ताशी निगडित आजार असलेल्या रुग्णांकडे राज्य रक्त संक्रमण परिषदेचं ओळखपत्र असेल, तर त्यांना मोफत रक्त पुरवठा केला जातो. मात्र, अशा रुग्णांकडून प्रक्रिया शुल्क आकारल्यास, रक्तपेढीला तीन पट दंड केला जाणार आहे. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

****

केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांविरोधात राजकीय हेतूने गैरसमज पसरवला जात असून, दिल्लीतलं शेतकरी आंदोलनही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप, माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ते आज  नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या तीनही कायद्यांचं समर्थन करण्यासाठी परवा रविवारी ६ डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर रयत क्रांती संघटना निदर्शनं करणार असल्याची माहिती, खोत यांनी यावेळी दिली. हे तीनही कायदे शेतकरी हिताचे आहेत, या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती तथा हमीभाव खरेदी केंद्र यंत्रणेला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही, उलट शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवाराबाहेरही आपला शेतमाल विकण्याचे विविध पर्याय निर्माण होतील, असं खोत यांनी सांगितलं.

****

किल्ले रायगडावर जाण्यासाठीची रोप वे ची सुविधा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. जागेच्या वादावरून गेली आठ महिने ही सुविधा बंद होती. वादग्रस्त जागा वगळून रोप वे सुरू करण्याची परवानगी महाड न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिली, त्यानंतर रोप वे ची, दुरुस्ती चाचणी घेतल्यानंतर आज सकाळपासून ही सुविधा पुन्हा सुरू झाली.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज एका ७७ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार १५४ जणांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. या विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या आठ रुग्णांना उपचारानंतर आज सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजार ५१६ जणांना आतापर्यंत सुटी देण्यात आली असून ९८६रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ४३ हजार ६५६ झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आज आज दिवसभरात ४७ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार ५४७ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २७ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार ८४० रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं यजमान ऑस्ट्रेलियावर अकरा धावांनी विजय मिळवला, यजमान संघानं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं, भारतानं निर्धारित २० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १६१ धावा केल्या, मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना, १५० धावाच करू शकला. चार षटकांत २५ धावा देत, तीन बळी घेणारा यजुवेंद्र चहल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना सहा डिसेंबरला तर तिसरा सामना आठ डिसेंबरला होणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातून विदेशी पिस्तुल आणि रायफल बाळगणाऱ्या दोन जणांना दहशतवादविरोधी पथकानं आज अटक केली. बोडखा तांडा इथले रहिवासी धनसिंग राठोड याच्या घरावर छापा टाकत पोलिसांनी एक विदेशी बनावटीचे पिस्टल, जीवंत काडतुसं, आणि एक रायफल जप्त केली.

****

जालना इथं आज ट्रक आणि टॅम्पोच्या धडकेत दोन जण ठार झाले, अंबड मार्गावरच्या पेट्रोलपंपाजवळ आज सकाळी हा अपघात झाला. सोलापूर शहरातही आज सकाळी भरधाव ट्रकखाली चिरडून दोघा भाजीव्रिकेत्यांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.

//************//

No comments:

Post a Comment