Tuesday, 15 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

·       विधानसभेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत पुरवणी मागण्यांवर चर्चा; मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विधान परिषदेचं कामकाज बाधित 

·       शेतकरी आंदोलनाबाबत आपल्या विधानाचा विपर्यास - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

·       औरंगाबाद इथं दोन तर जालना इथं एका कोविडग्रस्ताचा मृत्यू

आणि

·        ई कॉमर्स कंपन्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याची उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाची मागणी

****

विधानसभेत आज दुपारच्या सत्रात विरोधक आणि सत्ताधारी पक्षात आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या समितीच्या नेमणुकीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर शेतकरी आणि कोविडयोद्ध्यांना मदत न करता, वाईन उद्योग तसंच रयत शिक्षण संस्थेला निधी देण्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली. या सरकारचा कारभार म्हणजे 'घोषणा थांबणार नाही अन् अंमलबजावणी होणार नाही’ असा असल्याची टीका फडणवीस यांनी केली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असून, ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातले मंत्रीच प्रश्न निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सारथी अंतर्गत सुरु असलेल्या सर्वच योजना बंद असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. केंद्रसरकारकडून मोठ्या निधीची  अपेक्षा असताना निधी मिळत नाही, पीक विम्याबाबत केंद्राची भूमिका महत्त्वाची होती, पण कंपन्यांवर विम्याबाबत सक्ती करण्यात आली नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. मराठा आरक्षण प्रकरणी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं स्पष्ट करत, याप्रकरणी विनाकारण संभ्रम निर्माण करुन ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र उभं केलं जात असल्याचं चव्हाण म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या कोविड परिस्थितीबाबत सदनाला माहिती दिली. कोविड उपचारांसाठी रुग्णालयांनी रुग्णांकडून अधिकचे घेतलेले कोट्यवधी रुपये रुग्णांना परत केल्याची माहिती टोपे यांनी दिली. कोविड चाचणीच्या दरात आणखी दोनशे रुपये कपात करून या चाचणीचा दर ७८० रुपये करत असल्याचं, आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केलं.

****

विधान परिषदेचं कामकाज आजही विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं.

मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन प्रस्तावाची मांडलेली सूचना,  सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणारं काळ्या रंगाचं कापड परिधान केलं होतं, ते कापड काढण्याचे निर्देश देत सभापतींनी सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केलं. रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी तसंच अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरूद्ध मांडण्यात आलेल्या हक्कभंग ठरावाचा अहवाल सादर करण्यासाठी पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यात आली, यावेळेसही मोठा गदारोळ झाल्यामुळे सभापतींनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. जागतिक शिक्षक पुरस्कार मिळालेले सोलापूर जिल्ह्यातले शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा अभिनंदन प्रस्ताव विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी आज मांडला. डिसले गुरूजी यांच्या सन्मानार्थ सरकारने त्यांना विधान परिषदेचं सदस्यत्व द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी डिसले गुरूजींना आगाऊ दोन वेतनवाढी देण्याची मागणी केली.

****

दरम्यान, आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशीही विरोधी पक्षाचे नेते तसंच आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. शेतकरी, कष्टकरी, मराठा आरक्षण, महिला अत्याचार या सर्व विषयांवर महाविकाआघाडी सरकार अपयशी ठरत असल्याची टीका विरोधकांनी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार प्रसाद लाड, आमदार अतुल सावे यांच्यासह अनेक आमदारांनी यावेळी निदर्शनं करत घोषणाबाजी केली.

****

मराठा आरक्षण प्रकरणी मुंबईत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन, त्यांचा प्रश्न विधीमंडळात लावून धरणार असल्याचं, आश्वासन दिलं, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यावेळी उपस्थित होते.

मुंबईतल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून परभणी इथं मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आज एकदिवसीय धरणे आंदोलन केलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी केलं आहे. 

   ****

शेतकरी आंदोलनाबाबत आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. आपण स्वत: हाडाचे शेतकरी असून शेतकऱ्यांचा अवमान करण्याचा आपला कुठलाही हेतू नसल्याचं दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाला सुधारित शेतकरी कायदे पूरक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी आणलेली तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, असं माजी खासदार अमर साबळे यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर इथं बोलत होते. या कायद्यांचा अर्थ आणि उद्देश समजून न घेता विरोध केला जात असल्याचं, सांगत, हा कायदा समजून घेण्याचं आवाहन साबळे यांनी केलं.

****

औरंगाबाद शहरातल्या दोन कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार १७६ झाली आहे. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज नवे तीन कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ४३२ झाली आहे. जिल्ह्यात ४६४ रुग्णांवर उपचार सुरु असून ४४ हजार ४२९ रुग्णांनी आतापर्यंत या विषाणू संसर्गावर मात केली आहे.

****

जालना जिल्ह्यात आज एका कोविड बाधिताचा मृत्य झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ३३४ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ३७ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार ७९२ झाली आहे. कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १६ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले बारा हजार १५१ रुग्ण संसगमुक्त झाले असून, सध्या ३०७ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

****

ई कॉमर्स कंपन्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं केली आहे. या मागणीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीचं निवेदन महासंघानं जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांच्याकडे आज सादर केलं. या कंपन्यांनी कायद्यातल्या अनेक पळवाटा शोधून किरकोळ व्यापार ताब्यात घेत, केंद्र शासनाच्या लोकल फाॕर व्होकल तसंच आत्मनिर्भर भारत संकल्पनेलाच आव्हान दिलं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. ई कॉमर्स कंपन्यांमुळे देशातला किरकोळ व्यापार उद्धस्त होत आहे, याकडे महासंघानं लक्ष वेधलं आहे.

****

कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना वनविभागाचं सुवर्ण पदक जाहीर झालं आहे. धुळे वनविभागात काम करताना त्यांनी आपल्या कामकाजातून सुवर्ण पदकाचे निकष पूर्ण केले होते. वन्यजीव सुरक्षा, अवैध लाकूडतोडीला प्रतिबंध, वनालगत असलेल्या सर्व गावांमध्ये एलपीजी गॅस वाटप तसंच इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांना हे सुवर्णपदक जाहीर झालं आहे.

//*************//

No comments:

Post a Comment