Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** राज्यात गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावं यासाठी धोरण
आखणार - आरोग्यमंत्र्यांची माहिती
** शेतीसंदर्भात सुधारित कायदे रद्द करण्याच्या मागणीला
विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा; शेतकरी संघटनेकडून मात्र शेतकऱ्यांना आंदोलनात
सहभागी, 'न' होण्याचं आवाहन
** औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यात
आज प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू
आणि
** रहिवाशांना 'स्मार्ट सिटीझन'
करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
****
राज्यातील गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावं यासाठी धोरण तयार करण्यात येत असल्याचं,
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते आज जनआरोग्य अभियानाबाबत घेण्यात आलेल्या
वेबिनारमध्ये बोलत होते. यापुढे कुणालाही रक्तासाठी रक्कम मोजावी लागू नये, याबाबतचा
निर्णय विचाराधीन असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्य विभागातल्या १७ हजार
रिक्त पदांपैकी ५० टक्के पदं भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे
आरोग्य विभागातल्या पदभरतीला चालना मिळेल, अशी माहिती टोपे यांनी दिली. राज्यातल्या
जुन्या रुग्णवाहिका बदलण्यात येत असून, पुढील आठवड्यात ५०० नवीन रुग्णवाहिका आरोग्य
विभागात दाखल होणार असल्याचं, आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, या वेबिनारमध्ये बोलताना,
क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रुपात तयार करण्यासाठी, अभ्यास समिती नेमण्याची
सूचना केली. सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी निधीत वाढ, शासकीय रुग्णालयांच्या रुग्णसेवेत
गुणात्मक वाढ, यासह आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर या वेबिनारमध्ये चर्चा करण्यात
आली.
****
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या प्रश्नांविषयी चर्चा
करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक घेण्यात
आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि
नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत अनुशेष भरती, शिष्यवृत्ती,
विभागाला आवश्यक निधीची उपलब्धता तसंच विविध सवलतींचा लाभ
देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
****
केंद्र सरकारने शेतीसंदर्भात सुधारित कायदे रद्द करावेत
या मागणीला पाठिंबा म्हणून संभाजी ब्रिगेडनं आज परभणी इथं एकदिवसीय धरणे आंदोलन केलं.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात केलेल्या या आंदोलनात, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष
बालाजी मोहिते यांच्या नेतृत्चात अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनाची
दखल न घेतल्यास परभणीत चक्काजाम आंदोलनाचा इशाराही ब्रिगेडनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर
केलेल्या निवेदनात दिला आहे.
समाजवादी पार्टीच्या वतीनं आज धुळे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली, तर वाशिम जिल्हा काँग्रेसच्या वतीनं
जिल्हाधिकारी कार्यालयावर सुधारित कृषी कायद्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन
करण्यात आलं.
संयुक्त
शेतकरी आघाडीनं उद्या पुकारलेल्या भारत बंदला राजकीय पक्षांसह अनेक शेतकरी संघटनांनी
पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनेही या बंदला सक्रीय पाठिंबा दिला
आहे.
महाराष्ट्र
राज्य बॅंक कर्मचारी महासंघानेही उद्याच्या या देशव्यापी बंदला पाठिंबा दिला आहे. डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संघानेही या बंदला पाठिंबा
देत असल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
दरम्यान,
शेतकरी संघटना या बंद मध्ये सहभागी होणार नसल्याचं, संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी
सांगितलं आहे. हे कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग, कायमस्वरूपी
बंद होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊ नये, असं आवाहन घनवट यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. सरकारनं या आंदोलनाच्या दबावामुळे कृषी सुधारणा कायदे
मागे घेतले, तर पुढची पन्नास वर्ष तरी, कोणताही राजकीय पक्ष, शेती व्यापाराला स्वातंत्र्य
देण्याचं धाडस करणार नाही, असं घनवट यांनी म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज एका ७० वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण मृतांची
संख्या एक हजार १५९ झाली आहे. घाटी रुग्णालयातून आज सहा रुग्णांना बरे झाल्यानं सुटी
देण्यात आली. जिल्ह्यात ४१ हजार ८६९ जणांना आतापर्यंत सुटी देण्यात आली असून,
९११ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ४३ हजार
९३२ इतकी झाली आहे.
****
जालना जिल्ह्यात आज एका कोविड बाधित
रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या एकूण मृतांची संख्या
आता ३२६ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ३० नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले.
जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार ६३६ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झालेल्या ६५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार
९२० रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या बाधित असलेल्या ३९० रुग्णांवर उपचार सुरू
आहेत.
दरम्यान, कोवीड-१९
लसीकरणाच्या अनुषंगानं जालना जिल्हा
कृतीदल समितीची आज पहिली बैठक
झाली. जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या
लसीचे डोस, प्रत्येकापर्यंत सुरक्षितपणे पोहचवण्यासाठी
शासकीय दवाखान्यांसह शाळांमध्ये लसीकरण केंद्रांची व्यवस्था करावी, लसीकरणाच्या तयारीसाठी शासनानं तयार केलेल्या कोवीन सॉफ्टवेअरच्या
वापराबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावं, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी दिले.
****
हिंगोली जिल्ह्यात आज पाच नवे कोरोना
बाधित रुग्ण आढळले, तर दोन रुग्णांना कोविडमुक्त झाल्यानं सुटी देण्यात आली. जिल्ह्यात
सध्या ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं
पालन करण्याचं आवाहन कृषी पर्यटनाचे प्रणेते चंद्रशेखर भडसावळे यांनी केलं आहे.
****
धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या २४८
शाळांमध्धे आजपासून नववी ते बारावी पर्यंतचे शाळांचे वर्ग सुरु करण्यात आले. पहिल्या
टप्प्यात धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यांमध्ये पाच हजार पेक्षा कमी लोकसंख्या
असलेल्या गावांमधले वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी १५ हजार २२८ पालकांनी संमतीपत्र
दिले आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या रहिवाशांना 'स्मार्ट
सिटीझन' करण्यासाठी महापालिका एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. या अंतर्गत
रहिवाशांना पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वाहनं योग्य ठिकाणी उभी करणं, वाहतुक
नियमांचं पालन करणं, आदी संदर्भात प्रशिक्षित करून एक विशिष्ट बिल्ला देण्यात येणार
आहे. देशात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात आहे. ही मोहीम राबवण्यासाठी महापालिका,
महात्मा गांधी मिशन रुग्णालय आणि औरंगाबाद फर्स्ट टीमची मदत घेण्यात येणार असल्याचं,
महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं. एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे
उप अधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी या मोहिमेच्या अंमलबजावणीविषयी सादरीकरण केलं.
व्याख्यानमाला, जनजागृतीपर दृकश्राव्य कार्यक्रम आणि पथनाट्यांच्या माध्यमातूनही नागरिकांना
त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार असल्याचं डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलं.
****
सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात
बिबट्याच्या हल्ल्यात आज एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. फुलाबाई कोठले असं या मुलीचं
नाव असून, करमाळा तालुक्यात आठवडाभरातली ही तिसरी घटना आहे.
****
कांद्याच्या भावात सातत्यानं घट होत
असल्याच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी नाशिकचे खासदार हेमंत
गोडसे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. नाशिक जिल्ह्यात
लासलगाव इथं कांद्याला आज क्विंटलमागे चौदाशे ते सोळाशे रुपये भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांनी
बाजार समितीत आंदोलन केल्यानं, आज सकाळी कांदा लिलाव काही काळासाठी बंद पडले होते.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनीही कांदा निर्यात बंदी
उठवावी अन्यथा राज्यातील कांदा लिलाव बंद करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
//************//
No comments:
Post a Comment