Friday, 4 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.12.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांपैकी औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे निकाल हाती आले असून, दोन्ही जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. वैध ठरलेल्या २ लाख १८ हजार ८१६ मतांपैकी सतीश चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ मतं मिळाली. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मतं मिळाली.

पुणे पदवीधर मतदार संघातही महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले. लाड यांना एक लाख २२ हजार १४५ मतं मिळाली, तर भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मतं मिळाली.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अभिजित वंजारी आघाडीवर असून, त्यांचा विजय निश्चित आहे. भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले असून, प्रचंड परिश्रम घेऊनही विजय मिळू शकला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

****

दरम्यान, हा विजय महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय असून, गेल्या वर्षभरात राज्य सरकारनं केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

****

पुढील काही महिने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचे असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना ते आज बोलत होते. रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसून, तो चार टक्क्यांवर कायम असल्याचं दास यांनी सांगितलं. रिव्हर्स रेपो दरही तीन पूर्णांक ३५ टक्क्यांवर, बँक रेट ४ पूर्णांक २५ टक्क्यांवर, तर कॅश रिझर्व्ह रेशो तीन टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. पुढील काळात महागाई दर नियंत्रणात येईल, तसंच पुढील तिमाहित एकूण देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर सकारात्मक राहण्याची अशी शक्यताही पतधोरण समितीनं वर्तवली आहे.

****

गंभीर स्वरूपातल्या गुन्ह्यात दोषी लोकप्रतिनिधींवर आजीवन बंदी घालण्यास केंद्र सरकारनं विरोध केला आहे. दोषी लोकप्रतिनिधींना आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारकडून मत मागवलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्व आणि निकालांच्या संदर्भाप्रमाणेच लोकप्रतिनिधी कायद्यातल्या तरतुदीनुसार लोकप्रितिनिधींवर बंदी घातली जाते, असंही केंद्र सरकारनं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. केंद्र सरकारने कायद्याची अंमलबजावणी ही सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रितनिधींसाठी समान असल्याचंही न्यायालयाला सांगितलं आहे.

****

देशात काल दिवसभरात ३६ हजार ५०० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५४० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९५ लाख ७१ हजार ४६५ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ३९ हजार १८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल जवळपास ४३ हजार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात सध्या चार लाख १६ हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंदर्भातलं शिक्षण वर्गाबाहेर आणि प्रात्यक्षिकाद्वारे देण्याचा प्रयत्न व्हावा, असं पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि युनिसेफ यांच्यामध्ये सहा ते १४ वयोगटातल्या शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण पर्यावरण विषयक शालेय अभ्यासक्रम तयार करण्यासंदर्भात उद्देशीय करार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंबंधी महत्वाच्या मुद्यांवर प्रभावी उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्यासोबत पर्यावरण शिक्षण, पाणी, स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या विविध घटकांचं एकत्रीकरण करण्यासंदर्भातलं काम या कराराच्या माध्यमातून केलं जाणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पाथरी पोलिस ठाण्यातल्या एका फौजदाराला आणि एका पोलिस कर्मचाऱ्याला जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी निलंबित केलं आहे. फौजदार टोपाजी कोरके यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तर पोलिस कर्मचारी रमेश पांडुरंग मुंडे यानं लाच मागितल्या प्रकरणी ही पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली.

****

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रक्तदान करण्याबाबत आवाहन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या रक्तपेढीत रक्तसाठा आणि रक्त घटकांची कमतरता जाणवत असल्यानं रक्तपेढीला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. एस. नागरगोजे यांनी केलं आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कॅनबेरा इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी सामना सुरू होईल. टी-ट्वेंटी मालिकेनंतर चार कसोटी सामन्यांची मालिका या दौऱ्यात होणार आहे.   

****

No comments:

Post a Comment