Tuesday, 8 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.12.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

·      सुधारित कृषी कायद्यांविरोधात संयुक्त शेतकरी आघाडीचा आज ‘भारत बंद’.

·      शेतकरी संघटना तसंच अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा बंद मध्ये सहभाग नाही.

·      विरोधी पक्ष राजकीय हेतूनं या आंदोलनात सहभागी झाल्याची भाजपची टीका.

·      गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावं यासाठीचं धोरण विचाराधीन - आरोग्यमंत्री राजेश टोपे.

·      कोविडवर विकसित होणाऱ्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी तीन कंपन्यांचा केंद्राकडे अर्ज.

·      राज्यात काल तीन हजार ७५ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २१७ रुग्णांची नोंद.

आणि

·      रहिवाशांना 'स्मार्ट सिटीझन' करण्यासाठी, औरंगाबाद महापालिकेचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम.

****

केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांविरोधात संयुक्त शेतकरी आघाडीनं आज ‘भारत बंद’चा इशारा दिला आहे. या ‘भारत बंद’ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेसह अनेक राजकीय पक्ष तसंच शेतकरी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य बॅंक कर्मचारी महासंघानेही या देशव्यापी बंदला पाठिंबा दिला आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघानेही या बंदला पाठिंबा देत असल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.

समाजवादी पार्टीच्या वतीनं काल या बंदच्या समर्थनात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली, तर वाशिम जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर, सुधारित कृषी कायद्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आलं.

संभाजी ब्रिगेडनं परभणी इथं एकदिवसीय धरणे आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात केलेल्या या आंदोलनात, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते यांच्या नेतृत्वात, अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास परभणीत चक्काजाम आंदोलनाचा इशाराही, ब्रिगेडनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

 

दरम्यान, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना या बंद मध्ये सहभागी होणार नसल्याचं, संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितलं आहे. घनवट यांनी याबाबत एक प्रसिद्धी पत्रक जारी करून, ही भूमिका स्पष्ट केली. हे कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग, कायमस्वरूपी बंद होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊ नये, असं आवाहन घनवट यांनी केलं आहे. सरकारनं या आंदोलनाच्या दबावामुळे कृषी सुधारणा कायदे मागे घेतले, तर पुढची पन्नास वर्ष तरी, कोणताही राजकीय पक्ष, शेती व्यापाराला स्वातंत्र्य देण्याचं धाडस करणार नाही, असं घनवट यांनी म्हटलं आहे.

 

अखिल भारतीय व्यापारी महासंघ तसंच अखिल भारतीय वाहतुकदार संघटनेनंही या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघही या बंदमध्ये सहभागी होणार नाही. काल झालेल्या बैठकीनंतर महासंघानं, व्यापाऱ्यांना आपली दुकानं आज सुरू ठेवण्यास सांगितलं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनानं योग्य विचार करून लवकर तोडगा काढावा, असं आवाहनही औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं केलं आहे. 

 

सुधारित कृषी कायद्यांबाबत डाव्या संघटना तसंच काँग्रेस प्रणित पक्ष संघटना, समाज आणि शेतकऱ्यांमध्ये चुकीचा प्रचार करत असल्याची टीका, भाजपचे औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केली आहे. हे कायदे शेतकरी हिताचे असल्यानं, शेतकरी कष्टकरी कामगारांनी या बंद मध्ये सहभागी होऊ नये, असं केणेकर यांनी म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष राजकीय हेतुनं या आंदोलनात सहभागी झाल्याची टीका, भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसनं २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात, शेती कायद्यात सुधारणेचं आश्वासन दिलं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी २००५ मध्येच, शेती कायद्यात दुरुस्तीच्या मुद्याचं समर्थन केलं होतं. आता मात्र आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याची टीका रविशंकर प्रसाद यांनी केली.

****

राज्यातल्या गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावं यासाठी धोरण तयार करण्यात येणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते काल जनआरोग्य अभियानाबाबत घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये बोलत होते. यापुढे कुणालाही रक्तासाठी रक्कम मोजावी लागू नये, याबाबतचा निर्णय विचाराधीन असल्याचं ते म्हणाले. आरोग्य विभागातल्या १७ हजार रिक्त पदांपैकी ५० टक्के पदं भरण्यास, मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. राज्यातल्या जुन्या रुग्णवाहिका बदलण्यात येत असून, पुढील आठवड्यात ५०० नवीन रुग्णवाहिका आरोग्य विभागात दाखल होणार असल्याचं, आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या वेबिनारमध्ये बोलताना, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रुपात तयार करण्यासाठी, अभ्यास समिती नेमण्याची सूचना केली. सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी निधीत वाढ, शासकीय रुग्णालयांच्या रुग्णसेवेत गुणात्मक वाढ, यासह आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर, या वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली.

****

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत अनुशेष भरती, शिष्यवृत्ती, विभागाला आवश्यक निधीची उपलब्धता, तसंच विविध सवलतींचा लाभ देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

****

कोविडनंतरचं शिक्षण राज्यातल्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण विभागानं, रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानस्नेही शिक्षकांची मदत घेऊन काम करावं, अशी सूचना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल मुंबईत डिसले यांचा, त्यांच्या पालकांसह सत्कार केल्यानंतर, मुख्यमंत्री बोलत होते. डिसले यांनी पुरस्काराची रक्कम इतर नऊ सहस्पर्धकांमध्ये वाटून दिली, हे ध्येयवेडाचं उदाहरण असून, डिसले यांची शिक्षण क्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन वाशिमचे आमदार अमित झनक यांनी केलं आहे.

****

जलदुर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी सांस्कृतिक कार्यविभाग प्रयत्नशील असेल, असं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी काल या संदर्भात देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी देशमुख बोलत होते. या किल्ल्यांपर्यंत सुलभ प्रवासासाठी क्रूझ सेवा सुरू करावी, प्रत्येक जलदुर्गात जेटीच्या सुविधेला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी यावेळी केली.

****

येत्या २१ डिसेंबरला आकाशात शनी, मंगळ आणि गुरु ग्रहाची युती पहायला मिळणार आहे. शनी आणि गुरू हे दोन्ही ग्रह दर २० वर्षांनी एकमेकांच्या जवळ येतात, यंदा मात्र २१ डिसेंबरला या दोन्ही ग्रहातलं अंतर गेल्या आठशे वर्षांतलं सर्वात कमी अंतर असणार आहे. येत्या २३ तारखेपर्यंत दररोज सूर्यास्तानंतर तासभर पश्चिम क्षितीजावर हे तीन ग्रह पाहता येणार आहेत.

****

कोविडवर लस विकसित करणाऱ्या तीन कंपन्यांनी या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय औषधी महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. हैदराबाद इथली भारत बायोटेक, पुण्यातली सीरम इन्स्टिट्यूट तसंच फायजर या अमेरिकी कंपनीचा यात समावेश आहे. फायजर कंपनीला ब्रिटन तसंच बहारीन या दोन देशांनी या लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी दिली आहे.

****

राज्यात काल तीन हजार ७५ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ५५ हजार ३४१ झाली आहे. काल ४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४७ हजार ७७४ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल सात हजार ३४५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ३० हजार ७१५ रुग्ण, कोरोना विषाण मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक २८ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ७५ हजार सातशे सदूसष्ठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २१७ रुग्णांची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यात रविवारी झालेल्या दोन मृत्यूंची काल नोंद घेण्यात आली. तर औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे ५२ रुग्ण आढळले, बीड जिल्ह्यात ३८, लातूर ३६, नांदेड ३२, जालना ३०, उस्मानाबाद १६, परभणी आठ तर हिंगोली जिल्ह्यात काल नव्या पाच रुग्णांची नोंद झाली.

****

दरम्यान, कोविड-१९ लसीकरणाच्या अनुषंगानं जालना जिल्हा कृतीदल समितीची काल पहिली बैठक झाली. जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या लसीचे डोस, प्रत्येकापर्यंत सुरक्षितपणे पोहचवण्यासाठी शासकीय दवाखान्यांसह शाळांमध्ये लसीकरण केंद्रांची व्यवस्था करावी, लसीकरणाच्या तयारीसाठी शासनानं तयार केलेल्या कोवीन सॉफ्टवेअरच्या वापराबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावं, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी दिले.

****

औरंगाबाद इथंही अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी, जिल्हा कृती दल समितीची बैठक घेऊन कोविड लसीकरणाच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. जिल्ह्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनास तत्काळ उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

****

औरंगाबाद शहरातल्या रहिवाशांना 'स्मार्ट सिटीझन' करण्यासाठी, महापालिका एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. या अंतर्गत रहिवाशांना पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वाहनं योग्य ठिकाणी उभी करणं, वाहतुक नियमांचं पालन करणं, आदी संदर्भात प्रशिक्षित करून, एक विशिष्ट बिल्ला देण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात आहे. ही मोहीम राबवण्यासाठी महापालिका, महात्मा गांधी मिशन रुग्णालय आणि औरंगाबाद फर्स्ट टीमची मदत घेण्यात येणार असल्याचं, महापालिकेचे प्रशासक, तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं. एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी काल या मोहिमेच्या अंमलबजावणीविषयी सादरीकरण केलं. व्याख्यानमाला, जनजागृतीपर दृकश्राव्य कार्यक्रम आणि पथनाट्यांच्या माध्यमातूनही, नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार असल्याचं, डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलं.

****

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात काल एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. फुलाबाई कोठले असं या मुलीचं नाव असून, करमाळा तालुक्यात आठवडाभरातली ही तिसरी घटना आहे.

दरम्यान, वनविभागानं काल या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. हा बिबट्या लपलेला सुमारे पाच एकरावरचा ऊस काल सायंकाळी पेटवून देण्यात आला, त्याचवेळी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाची तीन पथकं सज्ज होती, मात्र या सगळ्यांना चुकवत, बिबट्या पसार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा माजी खासदार जनार्दन वाघमारे यांनी केलं आहे. 

****

परभणी जिल्ह्यात एका अठरा वर्षाच्या तरुणाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. परभणी तालुक्यात बोबडे टाकळी शिवारात काल सकाळी ही घटना घडली. ओंकार वैद्य असं या तरुणाचं नाव असून, पाण्याची मोटर सुरू करत असताना त्याला वीजेचा धक्का बसला. ग्रामस्थांनी त्याला तत्काळ परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणलं, मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

****

लातूर शहरातले मुख्य रस्ते आणि इतर रस्त्यांवरच्या दुभाजकात कचरा टाकणाऱ्यांवर महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. वारंवार सूचना देऊनही दुभाजकात कचरा टाकला जात असल्यानं, महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात काल शेतकऱ्यांनी मोर्चा काढत तुरीच्या पिकाच्या झालेल्या नुकसानापोटी, भरपाई देण्याची मागणी केली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश रोकडे यांच्या नेतृत्वात, हा मोर्चा काढण्यात आला. तुरीच्या पीकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊन पीक वाळून गेलं आहे, या नुकसानाचे पंचनामे करून, शासनानं आर्थिक मदत करावी, आणि विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

****

बीड इथं काल जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. प्रकल्प संघ विभाग अधिकारी डी.जी.मुळे यांच्यासह माजी सैनिक यावेळी उपस्थित होते.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सिडनी इथं होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

****

No comments:

Post a Comment