Tuesday, 8 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.12.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०८ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांविरोधात संयुक्त शेतकरी आघाडीनं आज ‘भारत बंद’चा पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. किसान महासंघानं सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद पाळण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबईच्या काही भागात उस्फुर्त बंद पाळण्यात येत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बंदला प्रतिसाद मिळाला असून, अजून व्यवहार सुरु झाले नाही. नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या पाचही मार्केटमध्ये कृषी मालाची आवक आणि खरेदी विक्री बंद आहे. अहमदनगर जिल्ह्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

शेतीमालाच्या बाजार व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, अकाली दलासह डाव्या पक्षांनीही यापूर्वी वेळोवेळी पाठिंबा दिला आहे, मात्र आता केवळ मोदी सरकारला विरोध करुन दिल्लीतल्या आंदोलनाद्वारे अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या अपप्रचाराला सामन्य शेतकरी बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

अनुसूचित जमातीचं विभागीय जात पडताळणी कार्यालय औरंगाबाद हून नांदेड जिल्ह्यात किनवट इथं स्थलांतराचा निर्णय गैरसोयीचा असल्याचं, भारतीय जनता पक्षाच्या लातूर जिल्हा शाखेनं म्हटलं आहे. हा निर्णय रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा एका निवेदनातून देण्यात आला आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात पानेवाडी सज्जाचा तलाठी रवींद्र वैद्य याला, काल दोन हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. जमिनीचा फेर लावण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडून लाच मागितली होती.

****

लातूर जिल्ह्यात दिव्यांगांकरता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, काल जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुधाकर घारापूरकर, संजय कांबळे आणि शाम गोडभरले यांना यावेळी गौरवण्यात आलं. कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.

****


No comments:

Post a Comment