Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या संसद मार्ग परिसरातल्या संसद भवनाच्या नवीन इमारतीचं भूमीपूजन
करणार आहेत. ही नवीन इमारत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल. २०२२ साली स्वातंत्र्याच्या
७५व्या वर्धापनदिनी नवीन संसद भवन नवभारताच्या अपेक्षांना पूर्ण करेल. लोकसभेचे अध्यक्ष
ओम बिरला यांच्यासह केंद्रीय मंत्री भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत.
****
देशातला
कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून तो आता ९४ पूर्णांक ६६ शतांश
टक्क्यांवर पोहोचला आहे. काल दिवसभरात देशात ३७ हजार ७३५ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत
९२ लाख ५३ हजार ३०६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल ३१ हजार ५२२ नवे कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४१२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण
रुग्णसंख्या ९७ लाख ६७ हजार ३७२ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक
लाख ४१ हजार ७७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीन लाख ७२ हजार २९३ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत. काल नऊ लाख २२ हजार ९५९ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत
जवळपास १५ कोटी सात लाख ५९ हजार ७२६ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन
परिषदेनं सांगितलं.
****
पुण्याची
सिरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादची भारत बायोटेक यांनी कोरोना विषाणूवरील लसीच्या आपत्कालीन
वापरासाठी मागितलेली परवानगी भारतीय औषध नियंत्रण प्राधिकरणानं फेटाळली असल्याचं वृत्त
काही माध्यमांमधून प्रसिद्ध झालं आहे; हे वृत्त खोट असून, आरोग्य मंत्रालयानं हे वृत्त
फेटाळलं आहे. पत्र सूचना कार्यालयानं आज याबाबत खुलासा केला आहे. सीरम इन्स्टिट्यूटनं
कोविशील्डच्या आपत्कालीन वापरासाठी गेल्या रविवारी; तर भारत बायोटेक नं कोवक्सीनच्या
आपत्कालीन वापरासाठी गेल्या सोमवारी परवानगी मागितली होती.
****
भारतातल्या
आघाडीच्या औषध कंपन्या बनवत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीचा आढावा घेण्यासाठी
जगभरातील ६० हून अधिक देशांचे प्रतिनिधी काल भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पहिल्यांदा
ते हैदराबाद इथल्या भारत बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत. त्यानंतर इतर शहरांमधल्या
लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ते भेट देतील. अशा प्रकारच्या परदेशी प्रतिनिधींचा
हा पहिलाच भारत दौरा आहे.
****
मानवाधिकार
दिवस आज पाळण्यात येत आहे. मानव अधिकाराच्या सार्वभौमिक घोषणा केल्याच्या निमित्तानं
हा दिवस पाळण्यात येतो. १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघानं या घोषणेचा जगात मानवाधिकाराच्या
रक्षणासाठी उपाययोजना म्हणून स्वीकार केला आहे. यंदाचा मानवाधिकार दिनाचा विषय कोविड
१९ महामारीशी संबंधित आहे.
****
प्रसिद्ध
संगीतकार नरेंद्र भिडे यांचं आज पुणे इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ४७
वर्षांचे होते. पेशाने इंजिनिअर असलेल्या भिडे यांनी अनेक नाटकं, मालिका, मराठी चित्रपट
संगीतबद्ध केले. ‘मुळशी पॅटर्न’, ‘रानभूल’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘हिप हिप हुर्रे’,
‘पाऊलवाट’, ‘देऊळ बंद’, ‘कलम ३०२’, ‘साने गुरुजी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘यशवंतराव चव्हाण’,
‘हरिशचंद्राची फॅक्टरी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. भिडे यांना दोन वेळा राज्य
नाट्य पुरस्कार तसंच व्ही. शांताराम पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
****
नवउद्योजकांना
आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक पायाभूत सुविधा आणि पूरक वातावरण मिळावं यासाठी
राज्य शासन जागतिक दर्जाचं इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणार आहे. यासाठी न्युयॉर्क
इथल्या कॉर्नेल विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात येणार असून, अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय
विद्यापीठासोबत करार करून इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातलं
पहिलं राज्य ठरणार आहे.
****
औरंगाबाद
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी १२ डिसेंबरला
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
सुभाष देसाई यांनी काल ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पाणीपुरवठा योजनेसह
शहरातल्या मिटमिटा परिसरात प्राणी संग्रहालयासाठी सफारी पार्क, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे यांचं स्मारक तथा स्मृतीवन आणि शहरात सुरू असलेल्या तसंच प्रलंबित १५२ कोटी रुपयांच्या
रस्ते कामांचा शुभारंभही मुख्यमंत्री करणार आहेत.
****
उस्मानबाद
जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या एकूण ६२२ सरपंच आणि उपसरपंच पदांचं आरक्षण सोडत काल
काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी १०१ ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या असून, त्यातली
५३ पदं महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी १४, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी
१६८, तर खुल्या प्रवर्गासाठी ३३९ पदं आरक्षित असतील.
****
किमान
आधारभूत खरेदी अंतर्गत कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे परभणी इथं कालपासून कापूस खरेदी
सुरू करण्यात आली. काल पहिल्या दिवशी कापसाला ५ हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात
आला.
****
No comments:
Post a Comment