Friday, 11 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.12.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारने आयुर्वेदाच्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी दिलेली परवानगी मागे घेण्याच्या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशननं आज एकदिवसीय बंद पुकारला आहे. या बंदला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालिका रुग्णालयाच्या आणि खाजगी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण सेवा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात आल्या आहेत. पालिका रुग्णालयातील डॉक्टर काळ्या फिती लावून काम करीत आहेत, तर होमिओपॅथी डॉक्टर गुलाबी फिती लांबून केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत. पालिकेच्या रुग्णालयात कोविड सेंटर आणि महत्वाच्या शस्त्रक्रिया सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे.

****

देशातला कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून, तो आता ९४ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. काल दिवसभरात देशात ३७ हजार ५२८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत ९२ लाख ९० हजार ८३४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल २९ हजार ३९८ नवे रुग्ण आढळले, तर ४१४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९७ लाख ९६ हजार ७७० झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ४२ हजार १८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीन लाख ६३ हजार ७४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासंदर्भात प्रशासनाच्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय आणि पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याठिकाणी फक्त २०० निमंत्रित असणार आहेत. नागरिकांनी याठिकाणी न येता सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनो विषाणू लसीकरणासंदर्भात प्रशासनानं पूर्ण तयारी केली असून, मिशन मोड वर हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. या पाणीपुरवठा योजनेसह शहरातल्या मिटमिटा परिसरात प्राणी संग्रहालयासाठी सफारी पार्क, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक तथा स्मृतीवन आणि शहरात सुरू असलेल्या तसंच प्रलंबित १५२ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार आहे. 

****

अभियांत्रिकी क्षेत्रातल्या नवीन पिढीने संशोधनातून आयातीला पर्याय निर्माण करून देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावे, असं आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. दहाव्या एम एस एम ई अधिवेशनात ‘एम एस एम ई साठी नावीन्यपूर्ण संशोधन-आव्हानं आणि संधी’या विषयावर ते काल बोलत होते. छोटे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान, विज्ञान, कौशल्य या माध्यमातून कमी किंमतीत दर्जेदार उत्पादन त्यांच्या माध्यमातून होऊ शकतं, असं गडकरी म्हणाले.

****

आगामी महानगरपालिका, नगरपालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय काल शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. नेत्यांनी त्या अनुषंगानं निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या निवडणुकांसंदर्भातल्या रणनीतीवर विचार सुरू असून, याबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दिली. कोरोना विषाणू संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

****

वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणं गरजेचं असून, यासाठी बांबू लागवड आवश्यक असल्याचं मत राष्ट्रीय बांबू विकास बोर्डाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं आहे. ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हवेतलं ऑक्सीजनचं प्रमाण वाढवण्यासाठी वड, पिंपळ, तुळस यांची लागवड प्रत्येक भागात होणं गरजेचं आहे, यासोबतच बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न सुरु होतं आणि वातावरण देखील शुद्ध राहण्यास मदत होते, असं ते म्हणाले. यासाठी पृथ्वीरक्षण चळवळ सुरु करण्यात आली असून, बांबू लागवड चळवळ शासकीय पातळीपुरती सिमीत न राहता, महाराष्ट्रात जनचळवळ व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही पटेल यांनी सांगितलं.

****

रायगड जिल्ह्यात आज पहाटेपासून पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अलिबाग, महाड, म्हसळा, पेण, खोपोली, माणगाव, रोहा, मुरुड या भागात पहाटे पासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. तर इतर ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला.  अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं वातावरणात बदल झाल्याचं सांगण्यात येत आहे.

नवी मुंबई परिसरातही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. पालघर, नाशिक, सातारा जिल्ह्यातही आज पाऊस पडला. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण आहे. 

****

No comments:

Post a Comment