Sunday, 13 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.12.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१३ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

२००१ साली संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १९ वर्षे पूर्ण होत आहेत. संसदेवर झालेला भ्याड हल्ला देश कधीच विसरणार नाही आणि या हल्ल्यात शौर्याचं प्रदर्शन करत संसदेचं रक्षण करणाऱ्या तसंच बलिदान देणाऱ्या शूरांचं स्मरण करूया, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ३० हजार २५४ रुग्ण आढळले आहेत तर ३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ३३ हजार १३६ रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.

****

राज्यात काल कोरोना विषाणू संसर्गाचे चार हजार दोनशे एकोणसाठ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख शहात्तर हजार सहाशे नव्व्याण्णव झाली आहे.

****

मराठवाड्यात काल कोरोना विषाणू संसर्गामुळे आठ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २७४ रुग्णांची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातले तीन, औरंगाबाद जिल्ह्यातले दोन, तर जालना, लातूर आणि परभणी इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा मृतांत समावेश आहे. 

****

नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातल्या आस्तेगावच्या मेजर सुरेश घुगे यांना जम्मू काश्मीरच्या नवसेरा भागामध्ये देशसेवा करत असताना वीरमरण आलं. मेजर घुगे यांच्या पार्थिव देहावर उद्या संध्याकाळी त्यांच्या आस्तेगाव या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

बीड शहरातल्या पालवण चौकात एका हॉटेलमध्ये काल रात्री दहा वाजेच्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन आग लागली. शिवाजी नगर पोलीसांनी अग्नीशामक दलाच्या सहकार्यानं ही आग आटोक्यात आणली.

****

परभणी इथं जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीनं काल घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये ७२१ प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. यात आठ कोटी ८६ लाख २ हजार ९८६ इतक्या रक्कमेच्या प्रकरणांची तडजोड यात झाली.

****

नांदेड जिल्ह्यातही काल राष्ट्रीय लोकअदालतीमधे २ हजार ८१ प्रकरणं सामोपचारानं निकाली काढण्यात आली. यात ९ कोटी ३२ लाख ६ हजार ५५१ एवढ्या रक्कमेच्या प्रकरणांची तडजोड झाली.

****

No comments:

Post a Comment