Monday, 14 December 2020

Text- आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.12.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झालं. विधानसभेत कामकाज सुरु होण्यापूर्वीच विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर गदारोळ केला. मात्र काही वेळानंतर कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभेत आज काही विधेयकं मांडण्यात आली. यामध्ये मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक, डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ कोल्हापूर विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक, महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या आणि बालकांच्या विरुद्धच्या निश्चित अपराधासाठीचं विधेयक, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ विधेयक या विधेयकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सदनात पुरवणी मागण्या सादर केल्या.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदनातल्या आजी-माजी सदस्यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला. मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारत भालके, माजी मंत्री विष्णू सावरा, जावेद इक्बाल खान, विनायकराव पाटील, सरदार तारासिंह, अनंत देवसरकर, नरसिंहराव घारफळकर, नारायण पाटील, किसनराव खोपडे, सुरेश गोरे, जगन्नाथ ढोणे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक प्रस्ताव मांडल्यानंतर, सदनानं या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

****

दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत, सरकारविरोधी घोषणाबाजी केली. तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विधीमंडळ परिसरात ढोल वाजवून आंदोलन केलं. प्रश्न तेवत ठेवण्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

****

सुधारीत कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आज मंत्र्यांची बैठक होत आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल या बैठकीला उपस्थित आहेत.

****

देशात काल दिवसभरात २७ हजार ७१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३३६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९८ लाख ८४ हजार १०० झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ४३ हजार ३५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ३० हजार ६९५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९३ लाख ८८ हजार १५९ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन लाख ५२ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

पहिला मानाचा हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं आज कोल्हापूर इथं निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातले खंचनाळे यांनी, १९५९ साली पंजाब केसरी बनाता सिंग यांना नमवत हिंदकेसरची गदा पटकावली होती. अनेक मैदानं गाजवणारा कुस्तीपटू, अशी त्यांची ओळख होती.

खंचनाळे यांनी आपलं आयुष्य कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेचलं तसंच अनेक उत्तम मल्ल घडवले, त्यांचं कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खंचनाळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच अरविंद पाटील हेंद्रे यांचं काल रात्री निधन झालं, ते ७९ वर्षांचे होते. माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे चे मामा होत. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही बैलगाडा शर्यतीचं आयोजन केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातल्या काताळवेढे इथं १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काताळवेढे इथं बैलगाडा शर्यती सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक पी टी वाघ हे घटनास्थळी पोहचले, शर्यती तात्काळ थांबवण्यात येऊन आयोजन करणाऱ्या १४ जणांना अटक करण्यात आली.

****

सोलापूर जिल्ह्यात सावळेश्वर पथकर नाक्यावर पोलिसांनी तीन कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटं जप्त केली. विशाखापट्टणमहून आटपाडीला जाणाऱ्या कारमधून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर काल रात्री ही कारवाई करण्यात आली.  

****

राज्यात मुंबईसह अनेक भागात आज पाऊस झाला. मुंबईत सकाळी पाऊस सुरु झाल्यानं चाकरमान्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे मुंबईत गारवा निर्माण झाला आहे. नांदेड जिल्ह्यात आज सकाळी पाऊस झाला. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं पिकांवर अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अवकाळी पावसामुळे आंबा, सुपारी बागायतदार हवालदिल झाले आहेत. सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातही आज सकाळी पाऊस झाला.

****

No comments:

Post a Comment