Thursday, 17 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.10.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१७ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिकांवर आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावर काल झालेल्या सुनावणीत, आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून; शांततामय मार्गानं त्यावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. या समितीमध्ये भारतीय किसान संघटना, केंद्र सरकार आणि इतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.

****

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे मोनोरेलची वाटचाल स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेकडे सुरु आहे. काल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी स्वदेशी सुट्ट्या भागांनी बनलेल्या मोनोरेलला हिरवा झेंडा दाखवून वडाळा मोनो रेल्वे स्थानकावरून रवाना केलं. स्थानिक पातळीवर स्वदेशी सुट्ट्या भागांचा वापर करून मोनोरेल युनिटने गाडी क्र.०५ ची पुनर्बांधणी केली आहे. तसेच सुट्ट्या भागांच्या खरेदीचा खर्च परदेशी विक्रेत्यांच्या किंमतीच्या तुलनेत ७४ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

****

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अठराशे पानी आरोपपत्राची दखल घेत अलिबागच्या न्यायालयानं पत्रकार अर्णब गोस्वामी यांना सात जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ही माहिती दिली.

****

नाशिक जिल्ह्यात लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून वर्षभरात दहा लाखांपेक्षा अधिक सेवा पुरवल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या कार्याची राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दखल घेतली आहे. सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकाभिमुख कार्य असल्याचं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यात स्वयंस्फूर्तीने ८१ सेवा अधिक अधिसूचित आणि ऑनलाईन केल्या आहेत.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिल्या कसोटी क्रिकेट सामना ॲडलेड इथं सुरु झाला असून, भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या १६ षटकांत एक बाद २१ धावा झाल्या होत्या. मयंक अग्रवाल १६, चेतेश्वर पुजारा १४ धावांवर खेळत आहे.

****

No comments:

Post a Comment