Saturday, 19 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.12.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

·      सुधारित कृषी कायद्यातही किमान हमी भाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार - पंतप्रधानांचा निर्वाळा.

·      वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ७०:३० कोटा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयात कायम.

·      राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड.

·      प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींबाबत तोडगा काढण्यासाठी अभ्यासगट नियुक्त केला जाणार.

·      राज्यात तीन हजार ९९४ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २८३ रुग्णांची नोंद.

·      शैक्षणिक संस्थामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातल्या बंदला संमिश्र प्रतिसाद.

आणि

·      ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारतीय संघ दुसऱ्या डावात ६२ धावांनी आघाडीवर.

****

सुधारित कृषी कायद्यातही किमान हमी भाव - एमएसपी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती - एपीएमसी पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचा निर्वाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मध्यप्रदेशात रायसेन इथं काल झालेल्या शेतकरी महासंमेलनाला ते दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून संबोधित करत होते. नव्या कृषी कायद्यांमुळे एमएसपी आणि एपीएमसी बंद होईल असा अपप्रचार करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवला जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या वावड्यांकडे दुर्लक्ष करून सरकारवर विश्वास ठेवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पूर्वी राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यात कृषी सुधारणांची घोषणा करत होते. परंतु, आता या सुधारणांचं श्रेय घेता येत नसल्यानं, ते शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून वार करत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. कृषी सुधारणांचं सर्व श्रेय या पक्षांनी घ्यावं, मात्र शेतकऱ्यांच्या प्रगतीत बाधा आणू नये, असं आवाहन पंतप्रधानांनी या पक्षांना केलं.

****

चालू खरीप हंगामात ४५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत दरानं धान्य खरेदी करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं ही माहिती दिली. या माध्यमातून शेतकऱ्यांना ७५ हजार २६३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांमधून ३९८ लाख टन तर एकट्या पंजाब राज्यातून २०२ लाख टन धान्य खरेदी करण्यात आली आहे.

****

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ७०:३० कोटा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या या अध्यादेशाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात मराठवाड्याबाहेरच्या काही पालकांनी चार याचिका दाखल केल्या होत्या. खंडपीठाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत, कोटा रद्द करण्याचा शासन निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. या निर्णयाचं आमदार पाटील यांनी स्वागत केलं आहे.

****

कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या सोयीकरता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणं आवश्यक आहे.

****

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड झाली आहे. महासंघाच्या संचालक मंडळाच्या २१४ व्या शिखर बैठकीत एकमतानं दांडेगावकर यांची निवड झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं, त्यांनी महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दांडेगावकर हे सध्या राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी केलं आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातल्या तिघा पर्यटकांचा काल दुपारी आंजर्ले इथल्या समुद्रात बुडून मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातले सहा पर्यटक काल दुपारी आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं हे सर्वजण समुद्रात बुडाले. त्यातल्या तिघांना वाचवण्यात स्थानिकांना आलं, तर इतर तिघांचे मृतदेह थोड्या वेळाने किनाऱ्याला लागल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

प्लास्टर ऑफ पॅरीस - पीओपीच्या मूर्तींबाबत अभ्यास करुन तोडगा काढण्यासाठी अभ्यासगट नियुक्त केला जाणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही मागणी मान्य केली असल्याची माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली. पीओपी वापरावर आणलेली बंदी, केंद्र सरकारनं कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका वर्षासाठी शिथिल केली होती. त्यानंतर ही बंदी कायम राहणार आहे, या पार्श्वभूमीवर मूर्तीकार, आणि कारखानदारांच्या शिष्टमंडळाने काल आमदार शेलार यांच्या नेतृत्वात जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली. पीओपी मूर्तींवर बंदीमुळे मूर्तीकार तसंच कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे, शाडू मातीच्या मूर्तीला अनेक मर्यादा आहेत, नव्या तंत्रज्ञानानुसार पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळवता येते, या आणि अशा अनेक मुद्यांकडे या शिष्टमंडळाने पर्यावरण मंत्र्यांचं लक्ष वेधलं. या पार्श्वभूमीवर अभ्यास गट स्थापन करुन मध्यममार्ग काढावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली, ती जावडेकर यांनी मान्य केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

दिल्ली इथं सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात राज्यातले शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी दिली आहे. किसान सभेच्या नेतृत्वात २१ डिसेंबर २०२० रोजी नाशिक इथून शेतकरी दिल्लीकडे प्रस्थान करतील, २४ डिसेंबरला हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचतील, राजस्थान हरियाणा सीमेवर शहाजहानपूर कडून दिल्लीकडे जाणारा महामार्ग हे शेतकरी रोखून धरणार असल्याची माहिती नवले यांनी दिली. स्वयंपाक आणि निवासाची व्यवस्था सोबत घेऊन हे शेतकरी बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जाणार असल्याचं नवले यांनी सांगितलं.

दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासोबत मुंबई इथं अंबानींच्या कार्यालयावर येत्या २२ तारखेला मोर्चा काढणार असल्याचं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

****

वस्तू आणि सेवा कर विभागाच्या पथकानं ६२१ कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल यवतमाळ जिल्ह्यातून चार भामट्यांना अटक केली. या चौघांनी कोणताही व्यवसाय नसताना, बनावट कागदपत्रांच्या आधारे ६२१ कोटी ६० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं निदर्शनास आलं आहे.

****

राज्यात काल तीन हजार ९९४ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ८८ हजार ७६७ झाली आहे. काल ७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४८ हजार ५७४ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका झाला आहे. काल चार हजार ४६७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ७८ हजार ७२२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक १७ दशांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ६० हजार ३५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २८३ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात काल तीन तर, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ९१ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ४३, जालना ३९, लातूर ३४, उस्मानाबाद ३१, नांदेड २३, परभणी १९, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले तीन नवे रुग्ण आढळले.

****

औरंगाबाद शहरात पर्यटनासाठी पुढच्या महिन्यात पाच इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ही माहिती दिली. या वातानुकूलित बसचं तिकीट घेतलेल्या पर्यटकांना कोणत्याही स्थळावरून बसमध्ये बसता तसंच उतरता येईल.

****

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघानं काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दुसऱ्या डावात ६२ धावांची आघाडी घेतली, काल सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर भारतीय संघ २४४ धावांवर सर्वबाद झाला, त्यानंतर खेळायला आलेला ऑस्ट्रेलियाचा संघही १९१ धावांतच तंबूत परतला. काल सायंकाळी दुसऱ्या डावाचा खेळ थांबला तेव्हा भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ चार धावांवर बाद झाला होता, तर मयंक अग्रवाल पाच धावांवर खेळत होता.

****

राज्यातल्या शैक्षणिक संस्थामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला काल औरंगाबाद जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये जिल्ह्यातल्या सर्व शैक्षणिक संघटना तसंच शहरातल्या ८६५ खासगी शाळांमधले कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष वाल्मिक सुरासे यांनी दिली. हा आदेश पूर्णत: अन्यायकारक असून यामुळे बेरोजगारीत आणखी वाढ होणार असल्याचं ते म्हणाले.

भाजप शिक्षक आघाडीने औरंगाबाद इथं शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात याबाबतच्या शासन निर्णयाची होळी केली. शिक्षणासारख्या विषयातही महाविकासआघाडी सरकारचं धोरण उदासीन असल्याची टीका भाजप नेते प्रवीण घुगे यांनी यावेळी केला. हा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारं एक निवेदन शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांना सादर करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्याच्या गंगोखड विधानसभा मतदारसंघात बिनविरोध निवडल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींना आमदार विकास निधीतून प्रोत्साहनपर विशेष रक्कम देण्याची घोषणा आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे. एक हजाराच्या आत मतदारसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ११ लाख रुपये, एक हजार ते २ हजार मतदार संख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २१ लाख रुपये तर दोन हजाराहून जास्त मतदारसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ३१ लाख रुपये विकास निधी देण्यात येणार असल्याचं, आमदार गुट्टे यांनी सांगितलं. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन आमदार गुट्टे यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी नागरिकांना कोरोना विषाणू प्रादुर्भावापासून बचावासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे यांच्या नेतृत्वात काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. आपल्या विविध मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात गेल्या अनेक दिवपासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला काल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठार केलं. करमाळा तालुक्यात राखुंडे वस्ती जवळ ही कारवाई करण्यात आली. या बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात करमाळा तालुक्यात तिघांचा बळी गेला आहे. तालुक्यात आणखी काही बिबटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

****

बीड शहरात काल एका प्लायवुडच्या गोदामात रसायनाच्या टाकीचा भीषण स्फोट होऊन एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. हा स्फोट कशामुळे झाला, याचं कारण अद्याप कळू शकलं नाही.

****

लातूर जिल्ह्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने संभाव्य नुकसानाच्या २५टक्के रक्कम तातडीनं अदा करावी, अशी अधिसूचना लातूर जिल्हा प्रशासनानं जारी केली आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला वस्तूस्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या अहवालात यंदा तूर पिकाचं उत्पादन सरासरीपेक्षा ५० टक्के कमी होईल, असं नमूद आहे.

****

लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत नवमतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती केल्याबद्दल, औरंगाबाद निवडणूक विभागाच्या ब्रँड अँबेसेडर नवेली देशमुख यांचा काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या दोन्ही निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यात नवेली देशमुख यांची भूमिका नक्कीच उपयुक्त ठरली, असं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नमूद केलं.

****

No comments:

Post a Comment