Tuesday, 22 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.12.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात काल नव्या १९ हजार ५५६ रुग्णांची नोंद झाली, तर ३०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटी ७५ हजार ११६ इतकी झाली आहे. देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख ४६ हजार १११ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४५ टक्के इतका आहे. काल ३० हजार ३७६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९६ लाख ३६ हजार ४८७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ९२ हजार ५१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल दहा लाख ७२ हजार २२८ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १६ कोटी ३१ लाख ७० हजार ५५७ चाचण्या करणयात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं. 

****

देशात वाघांपाठोपाठ आता बिबट्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या नागरीकांचं अभिनंदन केलं आहे. हे प्रयत्न असेच सुरु ठेवले पाहिजे आणि प्राण्यांना सुरक्षित निवारा मिळाला पाहिजे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. देशात सध्या १२ हजार ८५२ बिबटे आहेत. २०१४ च्या तुलनेत बिबट्यांच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

****

नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी करण्यासाठी सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती २३ जानेवारी २०२१ पासून वर्षभर राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा तयार करणार आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातल्या नेताजींच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी हे आयोजन करण्यात येत आहे. 

****

केंद्र सरकार मका आणि बाजरी खरेदीसाठी प्रत्येक वर्षी मर्यादा आखून देत असतं, पण या वर्षीच्या अधिक उत्पादनामुळे खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. पीक पद्धतीतल्या बदलांमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका आणि बाजरीचं उत्पादन घेतलं आहे. खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र शासनानं चार लाख चार हजार ९०५ क्विंटल मका खरेदीस महाराष्ट्राला मान्यता दिली आहे. पण मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्पादनामुळे त्यात बदल करून मक्याची खरेदी मर्यादा, १५ लाख क्विंटल, तर बाजरी खरेदीची मर्यादा एक लाख ७०० क्विंटल पर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी, केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा विचार करता लवकरात लवकर ही मागणी मान्य करावी, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

****

सुधारित कृषी कायद्यांच्या समर्थनात रयतक्रांती संघटना आणि भाजपतर्फे राज्यभरात समर्थन फेरी काढण्यात येणार आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांना या कायद्याची माहिती करून देणं, हा या फेरीचा उद्देश असल्याची माहिती, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. ते सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर यावेळी उपस्थित होते. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं सांगताना खोत यांनी, दुग्धव्यवसायाचं उदाहरण दिलं. राज्यात दुग्धव्यवसाय खुला केल्यानंतरही इथल्या पशुपालकांचं नुकसान झालेलं नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, या समर्थन फेरीला २४ डिसेंबरला सकाळी दहा वाजता, सांगली जिल्ह्यात येडे मच्छिंद्र, या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावातून सुरुवात होईल, पहिल्या टप्प्यात ही फेरी सांगली तसंच कोल्हापूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. एकूण सहा टप्प्यांत ही फेरी विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरातून निघणार असल्याचं, खोत यांनी सांगितलं.

****

अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल काल अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीसमोर हजर झाला. एनसीबीनं गेल्या महिन्यात अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकून काही साहित्य जप्त केलं होतं, तसंच त्याच्यासह त्याची मैत्रीण गॅब्रिएलाची चौकशी केली होती.

दरम्यान, अमंली पदार्थ साठवल्याप्रकरणी विनोदी कलाकार भारती सिंह आणि तिचा पती हर्ष काल एमसीबीसमोर हजर झाले.   

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय खेळ प्राधिकरण - साई अंतर्गत असलेल्या जलतरण तलाव आणि हॅाकी मैदानाचं उद्घाटन, येत्या २४ तारखेला केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी आज विद्यापीठात वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. तलवारबाजीच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या कोनशिलेचं अनावरणही रिजिजू यांच्या हस्ते होणार आहे. साई अंतर्गत खेळासंदर्भातला पदविका अभ्यासक्रम, चार ॲथलेटिक ट्रॅक यासह अन्य मागण्या क्रीडा मंत्र्यांकडे करणार असल्याचं खासदार कराड यांनी यावेळी सांगितलं.

****

परभणी शहर आणि जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट होत असून, आज पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागानं ही माहिती दिली.

****

No comments:

Post a Comment