Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
· ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा
नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री
११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू; ब्रिटन- भारत विमानसेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत
रद्द.
· ग्राहकांना समाधानकारक सेवा
न देणाऱ्या वीज सेवा दात्यास शिक्षा करण्याची वीज ग्राहक अधिकार नियमात तरतूद.
· काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ
नेते मोतीलाल व्होरा यांचं निधन.
· अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची
केंद्रीय पथकाकडून औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्यक्ष पाहणी.
· मागण्यांवर चर्चेतून मार्ग
काढण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे आणि खासदार डॉ. भागवत कराड यांची
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा.
· सावित्रीबाई फुले महिला एकात्म
समाज मंडळाचा मयुरी राजहंस यांना ‘रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार’ तर महात्मा गांधी मिशन
अभिमत विद्यापीठातल्या महागामी अकादमीच्या संचालक डॉ पार्वती दत्ता यांना ‘डॉ भीमराव
गस्ती प्रबोधन पुरस्कार’.
आणि
· केशर आंब्याच्या ब्रँडिंगसाठी
‘महाकेशर आंबा बागायतदार संघा’ची स्थापना.
****
राज्यात
आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू
करण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी काल बैठक घेतली, त्यावेळी
हा निर्णय घेण्यात आला. पाच जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. कोरोनाच्या
या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून, पुढील १५ दिवस अधिक
सतर्क रहावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. राज्यात होणाऱ्या विवाह
समारंभात कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
दरम्यान,
ब्रिटनमध्ये कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, केंद्र सरकारनं ब्रिटनची विमानसेवा येत्या
३१ डिसेंबरपर्यंत रद्द केली आहे. आज रात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. आज रात्रीपर्यंत
ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानप्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात
आलं आहे. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस
संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. अशा प्रवाशांची विलगीकरणाच्या पाचव्या अथवा
सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. युरोपातून आलेल्या प्रवाशांमध्ये नव्या
विषाणूची लक्षणं दिसल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची व्यवस्था करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून
त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना गृह विलगीकरणात राहण्याची सूचना केली जाणार
आहे.
****
सरकार
ग्राहकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असून ग्राहकांना समाधानकारक सेवा
न देणाऱ्या वीज सेवा दात्यास शिक्षा केली जाईल, असं केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा
मंत्री राजकुमार सिंह यांनी म्हटलं आहे. वीज ग्राहकांचे अधिकार निर्धारित करणाऱ्या
नियमांची घोषणा मंत्री सिंह यांनी काल केली, त्यावेळी ते बोलत होते. नव्या नियमांच्या
माध्यमातून सरकार सर्वसामान्य ग्राहकांना शक्तीशाली बनवत आहे. आपल्या अधिकारांची आणि
अधिकारांच्या अंमलबजावणीची सर्वांना माहिती असली पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. ग्राहकांना
केंद्रस्थानी ठेऊन प्रथमच कायदे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहकांना सेवा देतांना
निर्धारित वेळेची मर्यादा ओलांडल्यास सेवादात्यास दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचं
ऊर्जा मंत्री सिंह यांनी सांगितलं.
****
अनुसूचित
जाती जमातींसाठी सूचवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांसंदर्भात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया
गांधी यांनी लिहिलेलं पत्र घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांनी अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणकारी योजनांबाबत
केलेल्या सूचना रास्त असून, सरकारचा घटकपक्ष म्हणून आम्ही कायम या समाजघटकांना न्याय
देण्यासाठी कार्यरत आहोत, असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं
आहे. ते या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक
प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं.
****
काँग्रेस
पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ९३ वर्षाचे होते.
व्होरा यांना ऑक्टोबर महिन्यात कोविडची लागण झाली होती, त्या संसर्गातून ते बरे होऊन
घरी परतले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना मूत्राशयाच्या संसर्गावर उपचारासाठी
रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्होरा हे मध्यप्रदेश विधानसभेवर सहा वेळा निवडून
गेले होते. त्यांनी दोन वेळा मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रिपद तसंच उत्तर प्रदेशचं राज्यपाल
पदही भूषवलं होतं. ते चार वेळा लोकसभेवर तर एकदा राज्यसभेवर निवडून गेले होते. केंद्रीय
मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण, तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाचे मंत्री म्हणूनही
त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन अमरावतीचे
नवनिर्वाचित शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात
अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकानं काल प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकात
राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सहसचिव रमेशकुमार, केंद्रीय ग्रामविकास खात्याचे
उपसचिव यशपाल, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. कौल, नागपूर कृषी विभागाचे संचालक
आर. पी. सिंग, मुख्य अभियंता तुषार व्यास, अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे या अधिकाऱ्यांचा
समावेश आहे. एका पथकाने औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी
करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. औरंगाबाद तालुक्यात निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यात
शेकटा, गाजीपूर, निलजगाव तसंच गंगापूर तालुक्यात ढोरगाव, मुरमी, वरखेड या ठिकाणी या
पथकानं पाहणी केली.
जालना
जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी, बाजार वाहेगाव, रोशनगाव तसंच जालना तालुक्यातल्या
नंदापूर इथं या पथकानं काल पाहणी केली. नुकसानग्रस्त कपाशी पिकासह द्राक्ष तसंच मोसंबी
बागा आणि पडझड झालेल्या विहिरींची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. जालना
बाजार समितीमधील धान्य बाजाराला भेट देऊन सोयाबीन, कापूस, मका, मूग आदी पिकांची आवक
आणि दराबाबतही पथकानं माहिती जाणून घेतली.
दुसऱ्या
पथकाने काल उस्मानाबाद तालुक्यात पाटोदा आणि केशेगाव इथं पाहणी केली. केशेगाव इथं अतिवृष्टीमुळे
भिंत फुटून वाहून गेलेला साठवण तलाव, तसंच नुकसानग्रस्त शेताची तर पाटोदा इथं खरडून
गेलेल्या शेतीची तसंच नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची पाहणी करून या पथकानं शेतकऱ्यांशी
संवाद साधला. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
विजयकुमार फड, आमदार राणाजगजितसिंह पाटील यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या आपत्ती
प्रतिसाद दलाच्या नियमानुसार शेतजमीन दुरुस्ती तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या
नियमांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करावी, या
मागणीचं निवेदन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या पथकाकडे सादर केलं.
दरम्यान,
हे पथक आजपासून २६ तारखेपर्यंत राज्यात सोलापूर, पुणे, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर
आणि भंडारा जिल्ह्याचा दौरा करणार आहे. २६ डिसेंबरला नागपूर इथं आढावा बैठक घेऊन हे
पथक दिल्लीकडे रवाना होईल.
****
उत्तरेतल्या
शीत लहरीमुळे मराठवाड्यात पारा खाली घसरला असून, काल सकाळी परभणीत पाच पूर्णांक सहा
दशांश सेल्सियस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या
हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली. औरंगाबाद मध्येही काल या हंगामातलं सर्वात
निचांकी नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात धुळे जिल्ह्यात
काल सहा पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस तापमानाची तर नाशिक मध्ये काल नऊ अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
शेतकरी
प्रश्नावर उपोषणाचा इशारा दिलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची काल
विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे आणि राज्यसभेचे भाजप खासदार डॉ. भागवत
कराड यांनी राळेगणसिद्धी इथं भेट घेतली. अण्णांनी केलेल्या मागण्यांवर चर्चेतून योग्य
मार्ग काढण्यात येईल, मात्र अण्णांचं वय पाहता त्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबून
नये, या सर्व प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला
काही वेळ द्यावा, अशी विनंती या नेत्यांनी त्यांना केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे. हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी गेल्या आठवड्यात केंद्रीय
कृषी मंत्र्यांना पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता. केंद्रीय पातळीवर चर्चा करून
अण्णांच्या मागण्यांसंबंधी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं खासदार डॉ. कराड
यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात
काल दोन हजार ८३४ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१८ लाख ९९ हजार ३५२ झाली आहे. काल ५५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार ८०१ झाली आहे. काल
सहा हजार ५३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख
८९ हजार ९५८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक २४
शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५९ हजार ४६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २०४ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल तीन, परभणी जिल्ह्यात दोन, तर बीड जिल्ह्यात एका रुग्णांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल ५९ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ४६, नांदेड २९, लातूर २६, जालना २१,
उस्मानाबाद १५, परभणी सहा, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले दोन रुग्ण
आढळले.
****
सावित्रीबाई
फुले महिला एकात्म समाज मंडळाचे यंदाचे डॉ रखमाबाई राऊत आणि डॉ भीमराव गस्ती पुरस्कार
काल जाहीर झाले. बीड जिल्ह्यात ब्रह्मनाथ येळंब इथल्या मयुरी राजहंस यांना रखमाबाई
राऊत सेवा पुरस्कार तर महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठातल्या महागामी अकादमीच्या
संचालक डॉ पार्वती दत्ता यांना डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार देण्यात येणार आहे.
मयुरी राजहंस या ब्रह्मनाथ येळंब इथं तमाशा कलावंतांच्या मुलामुलींसाठी वसतीगृह चालवतात,
सध्या या वसतीगृहात ४६ मुलंमुली राहात आहेत. डॉ पार्वती दत्ता यांनी महागामी अकादमीच्या
माध्यमातून अभिजात संगीत आणि नृत्य परंपरा जिवंत ठेवत, या कलांना व्यापक जनाधार मिळवून
दिल्याबद्दल त्यांना संस्थेचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह,
आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप असून, येत्या तीन जानेवारीला सावित्रीबाई
फुले यांच्या जयंतीदिनी औरंगाबाद इथं समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार
आहेत. पुरस्काराचं हे तिसरं वर्ष आहे.
****
मराठवाड्यातल्या
केशर आंब्याच्या ब्रँडिंगसाठी आंबा बागेच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महाकेशर आंबा बागायतदार
संघाची स्थापना केली आहे. यामाध्यमातून मराठवाड्यासह राज्यात महाकेशर आंबा लागवडीसाठी
काम करणार असून, याच नावाने यापुढे ब्रँडिंग करणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष
सुशील बलदवा यांनी दिली.
****
अंबाजोगाई
इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्रोत्सवाला काल सकाळी वर्णी महापूजेनं
प्रारंभ झाला. तहसीलदार विपिन पाटील यांनी योगेश्वरी देवीची सपत्निक विधीवत महापूजा
केली. मंदिरात आराध बसण्याची परंपरा यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रथमच खंडित झाली
आहे. २९ डिसेंबरला नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
****
कोविड
प्रतिबंधासाठी नागरिकांनी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार
धीरज देशमुख यांनी केलं आहे.
****
सियाचीन
इथं सीमेवर गस्त घालत असताना गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जवान शहीद झाले.
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या उमरगा हाडगा इथले सैनिक नागनाथ लोभे आणि सातारा
जिल्ह्यातल्या चिंचनेर निंब इथल्या सुजित किर्दत यांचा मृतांमध्ये समावेश आहे. रविवारी
२१ तारखेला ही घटना घडली. त्यांचा पार्थिव देह आज उमरगा इथं आणण्यात येणार आहे.
****
जालना
जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या भिवपूर इथले सैनिक गणेश गावंडे हे काल पुणे इथं
कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्यानं शहीद झाले. मागील पंधरा वर्षांपासून ते
मराठा बटालीयनमध्ये कर्तव्य बजावत होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या भिवपूर इथं शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यात महसूल विभागानं काल १२५ ब्रास अवैध वाळूसाठा जप्त
केला. या वाळूचं बाजारमूल्य सुमारे १० लाख रुपये आहे. जप्त केलेली वाळू तहसील कार्यालय
परिसरात जमा करण्यात येत आहे.
****
लातूर
शहरातून संकलित होणाऱ्या हजारो टन कचऱ्यावर वरवंटी परिसरात प्रक्रिया करून सेंद्रीय
खत निर्मिती केली जाते. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल या प्रकल्पाला
भेट देऊन कचरा संकलन, विघटन, सेंद्रिय खत निर्मिती, कचरा व्यवस्थापन आदी कामाची पाहणी
करून आवश्यक सूचना केल्या.
****
No comments:
Post a Comment