Wednesday, 23 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.12.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

·      राज्यात २५ भारतीय कंपन्यांसोबत ६१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार; दोन लाख ५३ हजार जणांना रोजगार मिळणार.

·      युरोपात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन.

·      येत्या फेब्रुवारीतल्या नियोजित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

·      आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ.

·      राज्यात तीन हजार १०६ नवीन कोविड बाधित रुग्ण तर मराठवाड्यात सहा जणांचा मृत्यू.

आणि

·      धर्माबाद- मनमाड- धर्माबाद विशेष एक्स्प्रेस रेल्वेगाडी येत्या शुक्रवारपासून सुरु होणार तर नांदेड- बंगळुरु -नांदेड या उत्सव विशेष गाडीला एक फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.

****

२५ भारतीय कंपन्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत ६१ हजार कोटी रुपयांचे काल मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान, औषधी निर्मिती, वाहन उद्योगांसह विविध क्षेत्रात ही गुंतवणूक केली जाणार आहे.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी तसंच विविध कंपन्याचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करुन राज्यानं दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. कोविड संकटाच्या सहा महिन्यातच्या काळात एक लाख बारा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी एक उत्तम उदाहरण आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

****

इंग्लंडसह युरोपमधल्या अन्य काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार, त्याअनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदीबाबत त्यांनी यावेळी आढावा घेतला. द्रवरुप प्राणवायु, व्हेंटिलेटर्स, औषधं यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगानं पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

****

दरम्यान, राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला असून, कोणत्याही प्रकारच्या विषाणूजन्य आजारासाठी हे वातावरण पोषक ठरणारं असल्यानं या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करणारा अहवाल कृती पथकानं जिल्हा आणि राज्य प्रशासनाला सादर केला. कृती पथकाचे सदस्य असलेल्या डॉ. शशांक जोशी यांनी यासंदर्भातली माहिती दिली. आगामी नाताळपासून ते पुढील २६ जानेवारीपर्यंतचा महिन्याभराचा कालावधी अतिशय महत्वाचा असून या काळात गर्दी टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारे सर्व उपाय अतिशय काटेकोरपणे अंमलात आणण्याची गरज असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, इंग्लंडमधून निघालेल्या पाच विमानांपैकी तीन विमानं काल मुंबईत दाखल झाली. या विमानांतून आलेल्या ६०० प्रवाशांपैकी एकही प्रवासी बाधित आढळला नाही. मात्र खबरदारी म्हणून या प्रवाशांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

औरंगाबाद शहरात काल ब्रिटन इथून नऊ नागरिक दाखल झाले. या सर्वांची कोविड चाचणी करण्यात आली.

****

राज्यात महानगर पालिका श्रेत्रात काल रात्री ११ वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे.

संचारबंदीच्या काळात औरंगाबाद शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकाराच्या आस्थापना रात्री साडेदहा वाजेपासूनच बंद करण्याचे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. रस्त्यावर पाच पेक्षा जास्त लोक आढळून आले आणि आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. महामार्गावर रात्री ११ नंतर ढाबे, हॉटेल्स सुरु असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी यावेळी दिली.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाची सद्य स्थिती लक्षात घेता येत्या फेब्रुवारीत नियोजित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईची परीक्षा न घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्गामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेऊ नयेत अशी विनंती असंख्य पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी केली होती. परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील असं त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज भरता येणार आहेत. यंदा एप्रिल - मे मध्ये दहावीची परिक्षा होण्याची शक्यता मंडळानं वर्तवली आहे. ११ जानेवारीपर्यंत हे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील.

दरम्यान, शिक्षण मंडळानं २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणार आहे. हा निकाल दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.

****

संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ या वर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत, पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मानपत्र, पुणेरी पगडी आणि एक लाख रुपये गौरवनिधी असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या २५ तारखेला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माशेलकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

****

स्पंदन या संस्थेतर्फे दिला जाणारा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. तर प्रसिद्ध गायक शब्बीर कुमार यांना रफी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मोहम्मद रफी यांच्या ९६ व्या जयंती निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती माजी शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांनी काल दिली.

****

राज्यात स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळवण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल मुंबईत सांगितलं. पहिल्या टप्प्यात साधारण १२५ ते १५० स्टार्टअप्सना २ ते १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे मलिक यांनी सांगितलं.

****

राज्यात काल तीन हजार १०६ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख ०२ हजार ४५८ झाली आहे. काल ७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार ८७६ झाली आहे. काल चार हजार ११२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ९४ हजार ८० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ३ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५८ हजार ३७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३०६ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर लातूर आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ९२ नवे रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ६०, लातूर ४८, जालना ३७, बीड ३३, उस्मानाबाद १८, परभणी १३, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले ५ नवीन रुग्ण आढळले.

****

केंद्र सरकारनं पारित केलेल्या कृषी कायद्यांविषयी शेतकऱ्यांमध्ये विरोधकांकडून भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहेत, मात्र हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेचं असल्याचं, भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीनं मराठवाडा विभागीय कार्यकर्ता संवाद आणि शेतकरी मेळावा परभणीत काल घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या तीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मालाची विक्री करता येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं शोषण थांबणार असल्याचं ते म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्याभरात शेतकरी विधेयकाबाबत जनजागृती यात्रा काढण्यात येणार असल्याचं पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी यावेळी सांगितलं.

****

केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर येत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय खेळ प्राधिकरण - साई अंतर्गत असलेल्या जलतरण तलाव आणि हॅाकी मैदानाचं उद्घाटन, त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी काल विद्यापीठात वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. तलवारबाजीच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या कोनशिलेचं अनावरणही रिजिजू यांच्या हस्ते होणार आहे.

****

राज्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आजपासून सुरु होत आहे. ३० डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करत येईल, अर्जांची छाननी ३१ डिसेंबरला होईल. या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान, तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद जिल्ह्यातले लोककलावंत जालिंदर केरे यांनी केलं आहे.

****

धर्माबाद- मनमाड- धर्माबाद विशेष एक्स्प्रेस रेल्वेगाडी येत्या शुक्रवारपासून सुरु होणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं काल जाहीर केलं. ही विशेष रेल्वे संपूर्णपणे आरक्षित असणार आहे. धर्माबाद इथून सकाळी चार वाजता ही गाडी सुटेल आणि दुपारी एक वाजून २० मिनिटांनी मनमाड इथं पोहोचेल. तर मनमाड इथून दुपारी तीन वाजता निघून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी धर्माबादला पोहोचेल.

दरम्यान, नांदेड- बंगळुरु -नांदेड या उत्सव विशेष गाडीला एक फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

हिंगोली लोकसभा मतदार संघातल्या ग्रामपंचायतींनी आगामी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निवडून आणल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीला विकास कामं करण्यासाठी पाच लाख रुपयांचा खासदार निधी देण्यात येणार असल्याची घोषणा खासदार हेमंत पाटील यांनी केली. यामागे दर पाच वर्षांनी निवडणुकीच्या दरम्यान होणारे भांडण तंटे, वाद यापासून गावाला मुक्त करण्याचा हेतू असून, कोणतंही छुपं राजकारण नसल्याचं त्यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जळालेली रोहीत्र तात्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करण्याचे निर्देश लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. रोहित्र जळाल्यामुळे वीज पुरवठा बंद असल्यानं शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावं लागत आहे, या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत.

****

राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार बेकायदेशीर पाणी जार निर्मितीचे उद्योग बंद करावेत अशी मागणी, लातूर बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशननं, एका निवेदनाद्वारे, जिल्हाधिकारी तसंच पालिका आयुक्तांकडे केली आहे. जिल्ह्यात पाणी विक्रीचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, या बेकायदेशीर प्रकल्पांवर कारवाई करणं आवश्यक असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या हातमाली इथं शेताच्या ऑनलाईन फेरफारमध्ये दुरुस्ती करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठी आणि कोतवालाला काल पोलिसांनी अटक केली. संशय आल्यानं या दोघांनीही लाच स्वीकारली नव्हती, मात्र त्यांच्याविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

औरंगाबाद शहरात सिडको बसस्थानकासमोर काल झालेल्या बस आणि दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन एसटी बसच्यामध्ये येऊन दुचाकीचा अपघात झाला असून जखमी व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात वन विभागात कार्यरत ३५ कामगारांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी कारेगाव रस्त्यावरील वन विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. काल या उपोषणाचा दुसरा दिवस होता.

****

No comments:

Post a Comment