Sunday, 24 January 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.01.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 January 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      आरोग्य तसंच पोलिस विभागातल्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू; २८ फेब्रुवारीला परीक्षा.

·      राज्यात परवा प्रजासत्ताक दिनापासून तुरुंग पर्यटन सेवेला प्रारंभ.

·      यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प कागदरहित स्वरुपात सादर केला जाणार.

·      नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सर्वत्र अभिवादन.

·      बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

·      राज्यात नवे २ हजार सहाशे सत्त्याण्णव कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २३९ रुग्णांची नोंद.

·      गेवराईचे माजी नगराध्यक्ष राधेशाम अट्टल यांच्यासह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा.

·      दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करणार - पालकमंत्री अशोक चव्हाण यांची ग्वाही.

आणि

·      उस्मानाबाद जिल्ह्यात दर हजारी मुलींच्या जन्माचं प्रमाण एक हजार ५०.

****

राज्यात आरोग्य तसंच पोलिस विभागात रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आरोग्य विभागातल्या साडे आठ हजार तसंच पोलिस विभागातल्या पाच हजार तीनशे पदांसाठी काल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. राज्य सरकारी आरोग्य सेवेशी निगडित सतरा हजार पदं रिक्त आहेत, यामध्ये ग्रामविकास खात्यातल्या दहा हजार तर आरोग्य खात्यातल्या सात हजार पदांचा समावेश आहे. या एकूण १७ हजार पदांपैकी ५० टक्के म्हणजेच साडे आठ हजार पदं भरली जाणार आहेत. आरोग्य तसंच पोलिस विभागातल्या या भरतीसाठी पुढच्या महिन्यात २८ फेब्रुवारीला एकाच दिवशी परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान, या पदांच्या भरतीसाठी २०१९ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार नव्याने प्रसिद्ध भरती प्रक्रियेतही पात्र असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यात परवा प्रजासत्ताक दिनापासून तुरुंग पर्यटन सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक थोर नेत्यांना राज्यात तुरुंगवास भोगावा लागला, पुण्यातलं येरवडा कारागृह देखील अशाच अनक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारं कारागृह असल्याचं गृहमंत्री म्हणाले. परवा २६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत येरवडा कारागृहात तुरुंग पर्यटनाची सुरुवात होणार असून, असं पर्यटन चालू करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य असल्याचं ते म्हणाले. राज्याच्या इतर कारागृहातही हळूहळू ही सुविधा सुरु करणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी विद्यापीठात महिलांसाठी स्वतंत्र इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मार्गदर्शन करणं, अर्थसहाय्य करणं, विकसित स्टार्टअप्सचा गुंतवणूकदारांशी समन्वय साधून देणं, विशेष अनुदान पुरवणं, आदी कामांसाठी हे इन्क्युबेशन सेंटर काम करेल, असं मलिक यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात मोठ्या प्रमाणावर फेरबदलाची गरज असून, कायदा विद्यार्थी केंद्रीत करण्याची आवश्यकता महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा मूल्यांकन समितीच्या सभेतून व्यक्त झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसंच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत काल औरंगाबाद इथं विद्यापीठाच्या नाट्यगृहात ही सभा झाली, समितीचे अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्यासह अनेक तज्ज्ञ या सभेत सहभागी झाले होते.

****

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प कागदरहित स्वरुपात सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थ मंत्रालयात हलवा महोत्सवात ही माहिती दिली. यासाठीच्या मोबाईल अॅपचं लोकार्पणही सीतारामन यांनी यावेळी केलं. येत्या एक फेब्रुवारीला अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संसदेचे सदस्य तसंच नागरिकांना या ॲपवर अर्थसंकल्पाशी निगडित १४ दस्तऐवज पाहता येणार आहेत.

****

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्री निवासस्थानी नेताजी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, मुंबईत फोर्ट परिसरात उभारलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

****

औरंगाबाद इथं मातृभूमी संस्थेतर्फे सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस- पराक्रम दिन साजरा करण्यात आला. CMIA आणि AURANGABAD FIRST या संस्थांचं या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मिळालं. शंखनाद, देशभक्तीपर गीत गायन, पथनाट्या तसेच रोलर स्केटिंग संघटनेच्या सदस्यांनी विविध प्रात्यक्षिकं दाखवली. शहरात नव्यानं उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

लातूर इथं शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह परिसरात १०१ वृक्ष लावून साजरी करण्यात आली.

धुळे जिल्ह्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी दुचाकी फेरी, महिलांना साडी वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले.

****

राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. विविध टप्प्यांतील पक्षांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परीघात जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट आणि इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणं आणि रोग नियंत्रणासाठी, एक कोटी ३० लाख रुपये मंजूर केले असल्याचं केदार यांनी सांगितलं. 

बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत दहा मोरांचा मृत्यू झाला आहे. मोरांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

****

राज्यात काल २ हजार सहाशे सत्त्याण्णव नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ६ हजार तीनशे चोपन्न झाली आहे. काल ५६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार सातशे चाळीस झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे. तर काल ३ हजार सहाशे चौऱ्याण्णव रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख १० हजार ५२१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक २२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ४३ हजार आठशे सत्तर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल परभणी जिल्ह्यात एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या २३९ रुग्णांची नोंद झाली.

विभागात नांदेड जिल्ह्यात काल ५५ नवे रुग्ण आढळून आले. बीड जिल्ह्यात ५०, लातूर ४२ औरंगाबाद ३८, जालना २८, उस्मानाबाद १६, परभणी सहा, तर हिंगोली जिल्ह्यात काल नवे चार रुग्ण आढळून आले.

****

राज्यात काल २४ हजार २८२ कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. यामध्ये जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबादसह दहा जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण करण्यात आलं. आतापर्यंत राज्यात सुमारे एक लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे. उद्या सोमवारपासून राज्यभरात मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण केलं जाणार आहे.

****

कोविड लसीकरणामुळे आपल्याबरोबर इतरांचंही संरक्षण होईल, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग यांनी केलं आहे. डॉ बंग यांनी त्यांच्या पत्नी डॉ राणी बंग यांच्यासह काल गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड लस घेतली. कोविड लसीसंदर्भात कोणतीही शंका न बाळगता लस घेण्याचं आवाहन डॉ बंग यांनी यावेळी केलं.

कोविडची साथ जगभरापेक्षा भारतामध्ये आपण अधिक चांगली नियंत्रित केली आहे. आणि त्याची लस हे अतिशय प्रभावी, परिणामकारक साधन आपल्या हाती आलं आहे. जसाजसा क्रम येईल, तसं प्रत्येकाने ही लस खर म्हणजे टोचून जर घेतली तर कोविडच्या प्रती आपल्या भोवती एक संरक्षक भिंत तयार होईल, स्वत:चही रक्षण होईल आणि ईतरांचही रक्षण होईल.

****

बीड जिल्ह्यात पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरु करण्यापूर्वी काल ८८२ शिक्षकांची कोविड तपासणी करण्यात आली. यापैकी १८ शिक्षक कोविड बाधित आढळले असून १५२ अहवाल प्रलंबित आहेत. बाधित शिक्षकांना कोविड केंद्रावर हलवण्यात आलं असून शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या घोडज इथल्या कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या बालकाला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. मनार नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या तीन बालकांचे प्राण वाचवल्याबद्दल कामेश्वरची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामेश्वरची भेट घेऊन, त्याचा गौरव केला. लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यावेळी उपस्थित होते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षभरात आत्महत्या केलेल्या ९४ शेतकऱ्यांच्या प्रकरणांची छाननी करून त्यापैकी ७६ प्रकरणं मदतीस पात्र ठरली आहेत. या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने घेतला आहे. याबाबतचे आदेशही संबंधित तहलसीलदारांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

****

बीड जिल्ह्यातील गेवराई इथं माजी नगराध्यक्ष राधेशाम अट्टल यांच्यासह पाच जणांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई इथल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या जमिनीची बनावट कागदपत्रं तयार करुन, जमिनीच्या विविध व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी, गेवराई न्यायालयाच्या आदेशावरून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या इतरांमध्ये अनुपम अट्टल, अनिकेत अट्टल, लक्ष्मीनारायण अट्टल आणि प्रल्हाद गणपतराव खटावकर यांचा समावेश आहे.

****

दिव्यांगांना सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी नांदेड इथं एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात कौठा इथं दिव्यांग तसंच वरिष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक उपकरण वितरण समारंभात ते काल बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत या कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. राज्य शासनातर्फे दिव्यांगाच्या विविध योजनांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरु असल्याचा गेहलोत यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला

****

उस्मानाबाद जिल्ह्यात दर हजारी मुलींच्या जन्माचं प्रमाण एक हजार ५० झालं आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी हे प्रमाण ८२१ होतं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षण अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –

उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासह बेटी बचाव - बेटी पढाव, माझी कन्या भाग्यश्री, सुकन्या समृद्धी योजना या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली गेली. त्यामुळे भारत सरकारच्या निती आयोगाने देशभरातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केलेला उस्मानाबाद हा जिल्हा आकांक्षीत  जिल्ह्याच्या यादीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे.

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.

****

आजच्या युवकामध्ये देशाला गतवैभव मिळवून देण्याची क्षमता असल्याचं, दारिद्र्य विरोधी अभियानाचे संस्थापक अध्यक्ष अभंगराव सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे. लातूर इथल्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त, “महापुरुषांचे वैचारिक साम्य” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं

****

परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल जिंतूर तालुक्यात कोक आणि बोरी ग्रामपंचायतीला भेट देऊन गावातल्या घरकुल लाभार्थ्यांशी संवाद साधला. कोक इथं लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या बांधकामाचा शुभारंभही करण्यात आला. आडगाव बाजार इथं, प्राथमिक आरोग्य केंद्रालाही टाकसाळे यांनी भेट देऊन पाहणी केली.

****

गावस्तरावर सांडपाणी तसंच घनकचऱ्याचं शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापनाची आवश्यकता लातूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी व्यक्त केली आहे. गोयल यांनी काल पानचिंचोली इथं कुटूंब भेटी, गावफेरी, तसंच गटार सफाई केली, त्यानंतर ते बोलत होते. पुनर्वापर, चक्रीकरण आणि पुनर्प्रक्रिया या तीन तत्त्वांवर घनकचऱ्याचं परिणामकारक व्यवस्थापन अवलंबून असल्याचं, गोयल यांनी म्हटलं आहे.

****

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांसाठी जालना शहरात आज सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरवात होईल, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या मोर्चात राज्यभरातल्या प्रमुख ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी होत असल्याची माहिती समन्वय समितीनं दिली आहे.

****

No comments:

Post a Comment