Tuesday, 2 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.02.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

अर्थसंकल्पानंतर संसदेचं कामकाज आज सुरु होत आहे. लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडला जाणार आहे. तर राज्यसभेत प्रमुख बंदर प्राधिकरण विधेयक, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था, उद्योजकता आणि व्यवस्थापन विधेयक, वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयकावर चर्चा होणार आहे.

****

संसदेत काल सादर झालेला अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचं ऐतिहासिक अर्थसंकल्प असून, यामुळे विविध क्षेत्रात मोठी प्रगती होणार असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या अर्थसंकल्पामुळे लोकांच्या राहणीमानात सुलभता येईल; त्याच बरोबर सर्व सामान्य नागरिक, गुंतवणूकदार, उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी अनेक सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशातून व्यक्त केला आहे. 

आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ‘आत्मनिर्भर भारत, अर्थव्यवस्थेची पाच ट्रिलीयन डॉलर्सची भरारी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निश्चय’ अशा सर्व संकल्पांच्या पूर्तीचा मार्ग प्रशस्त करणारा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

अर्थसंकल्पात विविध योजना आणि मूलभूत गरजा, विविध क्षेत्रात प्रत्येक प्रवर्गाला आणि क्षेत्राकडे विशेष लक्ष दिलं असल्याचं लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी म्हटलं आहे.

अर्थसंकल्पात मागासवर्गीय तसंच तरूणांसाठी विशेष तरतूद करण्यात आली असून, शेतकर्यांसाठी विशेष पॅकेजचा देखील यात समावेश केल्याबद्दल, केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अर्थमंत्री निर्मला सिताराम यांचं अभिनंदन केलं आहे.

****

यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातल्या कोपरी इथं बालकांना पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर पाजल्याचं उघडकीस आलं. सॅनिटायझर पाजल्यामुळे प्रकृती बिघडल्यानं १२ बालकांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव चौकशी समितीनं दिला आहे.

****

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या सहा कोंबड्यांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्व कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment