Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 February
2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
आत्मनिर्भर
भारत योजना ही नवभारत निर्माण करणारी योजना असून, केवळ देशाच्याच नाही तर जगाच्या गरजेच्या
वस्तू उत्पादित करण्याचं या योजनेचं उद्दीष्ट असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. नीति आयोगाच्या सहाव्या प्रशासकीय बैठकीत ते दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या
माध्यमातून बोलत होते. देशाचा विकास करणं हे सरकारचं मुख्य धोरण असून, त्यासाठी राज्यांच्या
संसाधनांचा योग्य रितीनं वापर केला पाहिजे, असं ते म्हणाले. कोविड काळात राज्य आणि
केंद्र सरकारनं मिळून काम केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारतनेट योजना, जल जीवन
मिशन, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या सरकारच्या विविध योजनांचा, पंतप्रधानांनी
यावेळी उल्लेख केला. कृषी, पायाभूत सुविधा, उत्पादकता, मनुष्यबळ विकास, तळागाळापर्यंत
सेवा सुविधेचा पुरवठा, आरोग्य आणि पोषण या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व
राज्यांचे मुख्यमंत्री, प्रशासकीय परिषदेचे माजी कार्यकारी सदस्य, केंद्रीय मंत्री,
या बैठकीत सहभागी झाले होते.
****
वस्तू
आणि सेवा कर-जीएसटी परताव्याचा पाच हजार कोटी रुपयाचा १७वा हप्ता राज्य सरकारांना प्राप्त
झाला आहे. महाराष्ट्रासह २३ राज्यांना ७३० कोटी रुपये, तर उर्वरित २६९ कोटी रुपये दिल्ली,
जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांना वितरीत करण्यात आला आहे.
****
आद्य
पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जंयतीनिमित्त, मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात, जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं. ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला पत्रकारितेचा वसा आणि
वारसा प्रयत्नपूर्वक जतन करू या’, असंही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटलं आहे.
जांभेकर
यांनी मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा दिला असल्याचं सांगून,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, जांभेकर यांना अभिवादन केलं आहे.
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी, बाळशास्त्री
जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
देशात
काल १३ हजार ९९३ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०१ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी नऊ लाख ७७
हजार ३८७ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५६ हजार २१२ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. तर काल दहा हजार ३०७ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ७८ हजार
४८ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले असून, सध्या एक लाख ४३ हजार १२७ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
दरम्यान,
देशात आतापर्यंत एक कोटी सात लाख १५ हजार २०४ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आल्याचं
आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
देशभरांत
पारपत्रांच्या सेवांसाठी अर्ज करताना आता डिजीलॉकर या डिजीटल सुविधेचा वापर करता येणार
आहे. केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी यासंदर्भातील नव्या योजनेची सुरुवात
केली. डिजीलॉकरमध्ये अपलोड केलेल्या कागदपत्रांची लिंक देऊन पारपत्रांसाठीच्या सेवांचा
लाभ अर्जदाराला मिळणार आहे. कागदविरहित कामकाजाला चालना देण्यासाठी डिजिटल इंडीया अंतर्गत
नागरिकांना डिजिटली सशक्त बनवण्याच्या आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या
उद्देशानं डिजीलॉकर या सुविधेची सुरुवात करण्यात आली आहे.
****
केंद्रीय
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी काल मिशन इंद्रधनुषच्या तिसऱ्या
टप्प्याचा प्रारंभ केला. प्रत्येक आई आणि मुलाच्या लसीकरणासाठी करण्यात आलेल्या तयारीबद्दल
डॉ.हर्षवर्धन यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. कोविड महामारीच्या काळात ज्या मुले
आणि गर्भवतींना लस घेता आली नाही, त्यांच्या लसीकरणावर मिशन इंद्रधनुष तीन मध्ये भर
दिला जाणार आहे. स्थलांतरित क्षेत्रातले लाभार्थी आणि पोहोचण्यास कठीण अशा दुर्गम भागाकडे
विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचंही आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.
****
सर्व
सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या आणि नव्यानं निवडणुका होईपर्यंत सध्याच्या
व्यवस्थापकीय समित्या कायम ठेवण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका
मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या सगळ्या सहकारी संस्थांवर प्रशासक नेमण्याची
मागणी या याचिकेत केली होती.
****
कोरोना
विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात गर्दी
होऊ नये, यासाठी पंढरपूर शहर आणि परिसरातल्या दहा गावांमध्ये २३ फेब्रुवारीला संचारबंदी
लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यासंदर्भातला आदेश जारी केला.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी
दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येतात, मात्र यंदा कोविड प्रादुर्भावामुळे दिंड्या, पालख्या
यांना बंदी घालण्यात आली आहे. भाविकांनी २३ फेब्रुवारीला पंढरपूरला येऊ नये असं आवाहन
जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment