▼

Saturday, 20 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.02.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

राज्यांच्या संसाधनांचा योग्य रितीने वापर केला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नीति आयोगाच्या सहाव्या प्रशासकीय बैठकीत ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत आहेत. कोविड काळात राज्य आणि केंद्र सरकारनं मिळून काम केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी, पायाभूत सुविधा, उत्पादकता, मनुष्यबळ विकास, तळागाळापर्यंत सेवा सुविधेचा पुरवठा आणि आरोग्य आणि पोषण या विषयांवर या बैठकीत चर्चा होत असून, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, प्रशासकीय परिषदेचे माजी कार्यकारी सदस्य, केंद्रीय मंत्री या बैठकीत सहभागी झाले आहेत.

****

भारत चीन दरम्यान कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी आज होणार आहे. पॅनगॉंग तलावावरील सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रीयेनंतर प्रथमच ही चर्चा होत आहे. दोन्ही देशाचे लष्करी अधिकारी संवाद साधत असून, भारत हा एक महत्त्वाचा शेजारी आहे आणि स्थिर संबंध प्रस्थापित करणं हे लोकांच्या हिताचं असल्याचं, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चुनयिंग यांनी म्हटलं आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत आपले चार सैनिक मारले गेल्याची कबुली पहिल्यांदाच चीनने दिली असून, आज होणाऱ्या चर्चेशी याचा काहीही संबध नसल्याचं चुनयिंग यांनी म्हटलं आहे.  

****

औरंगाबाद शहरात खासगी प्रवासी बसना सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. वाहनांची वाढती संख्या, अरुंद तसंच खराब रस्ते आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात रेणा सहकारी साखर कारखाना इथं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसंच ग्रंथालयाचं लोकार्पण दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. शेतकरी सभासदांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून केलं जाईल, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.

****

लातूर रेल्वे स्थानकावर काल खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी कोल्हापूर - धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेसचं स्वागत केलं. सुधारित मार्गानुसार ही रेल्वे आता लातूर मार्गे धावणार आहे. खासदार श्रृंगारे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

****

No comments:

Post a Comment