▼

Saturday, 20 March 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र दिनांक २० मार्च २०२१

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

दिनांक २० मार्च २०२१

****

केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. कोविड संक्रमण रोखण्यासाठी सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं गेलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

****

कोविड काळात भारतीय स्टेट बँकेच्या डिजिटल व्यवहारात साडे ११ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कोविडपूर्वी ६० टक्क्यांच्या आसपास असलेले डिजीटल व्यवहार आता ६७ टक्क्यांवर पोहोचले आहेत. साथरोग आणि त्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात ग्राहकांनी डिजिटलचा पर्याय निवडल्याचं, बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी सांगितलं. सध्या बँकेच्या योनो ॲपचे ३५ दशलक्ष वापरकर्ते आहेत. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता स्टेट बँक आपल्या सर्व डिजिटल व्यवहारासाठी पायाभूत सुविधा वाढवत असल्याचं खारा यांनी सांगितलं.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था आणि मराठवाडा जनता विकास परिषदेचे सचिव, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचं काल रात्री अल्पशा आजारानं निधन झालं, ते ७९ वर्षांचे होते. प्राचार्य महासंघाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. मराठवाड्यातल्या अनेक सामाजिक संस्था आणि चळवळींशी अदवंत यांचा जवळून संपर्क होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

बुलडाणा- सैलानी ही बस सैलानीकडे निघाली असता, या बसचा स्टेरींगचा रॉड अचानक तूटल्यानं सागवन पूलाजवळ अपघात घडला. आज सकाळी हा अपघात झाला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. बसचे चालक, वाहक आणि पाच ते सहा प्रवासी सुखरूप आहेत, बस मात्र क्षतिग्रस्त झाली आहे. 

****

मराठवाड्यातल्या काही भागात काल गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. परभणी जिल्ह्यात काल सोनपेठ तसंच गंगाखेड परिसरात, तसंच जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या सिपोरा बाजार, बोरगाव जहागीर, परिसरात गारपीट झाली. वाशीम जिल्ह्यातल्या मंगरूळ, कारंजा, मालेगाव, रिसोड मानोरा आणि वाशीम तालुक्यातही काल गारपीट झाली.

****

 

No comments:

Post a Comment