Monday, 1 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 March 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मार्च २०२१ सायंकाळी .१०

****

** विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरवात

** वैधानिक विकास मंडळांबाबत सरकारच्या भूमिकेचा निषेध करत विरोधी पक्षाचा सभात्याग

** ६० वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचं कोविड लसीकरण आजपासून सुरू

आणि

** हिंगोली जिल्ह्यात आजपासून आठवडाभराची कडक संचारबंदी लागू

****

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने सुरवात झाली. कोविड प्रतिबंधासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेत, कोविड योद्ध्यांना त्यांनी अभिवादन केलं. सीमा भागातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिली. मंदावलेली अर्थव्यवस्था, शिधावाटपासह शिवभोजन, शेतकरी अर्थ साहाय्य, महसुलातील घट, नैसर्गिक आपत्ती, विविध प्रकारच्या मदतीपोटी पंधरा हजार कोटी रुपयांची राज्यभरात मदत, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न हे मुद्देही त्यांनी आपल्या भाषणात मांडले

 

काँग्रेसचे भाई जगताप यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिक्षक सदस्य विक्रम काळे आणि शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी अनुमोदन दिलं. या प्रस्तावावर उद्या आणि परवा चर्चा होणार आहे.

 

वित्तराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी २०२०-२१ च्या पुरवणी मागण्या आज सादर केल्या.

 

विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अधिवेशनासाठी तालिका अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. गोपीकिशन बाजोरिया, सतीश चव्हाण आणि अमरनाथ राजूरकर यांचा समावेश आहे. विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालिका अध्यक्षांची नावं जाही केली. यामध्ये संजय शिरसाट, राजन साळवी, अशोक पवार, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे.

दोन्ही सदनात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

****

वैधानिक विकास मंडळांबाबत सरकारच्या भूमिकेचा निषेध करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज पहिल्याच दिवशी विधानसभेतून सभात्याग केला. मागास भागाच्या विकासाकरता स्थापन वैधानिक विकास मंडळांबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तर विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या बारा नावांना मंजुरी द्यावी, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली, त्यावर या नियुक्त्या हा राज्यपाल आणि सरकार यांच्यातला मुद्दा आहे, त्यासाठी विदर्भ तसंख मराठवाड्यातल्या जनतेला ओलीस धरू नये, असं सांगत विरोधकांनी सभात्याग केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, यावर बोलताना, ही वैधानिक विकास मंडळं असावीत, अशीच सरकारची भूमिका असून, अर्थसंकल्पात या भागाच्या निधी तरतुदीवरून काय ते स्पष्ट होईल, असं नमूद केलं. विदर्भ तंसच मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येतील, अशी घोषणाही पवार यांनी केली. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहितीही दिली.

****

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि अन्य नेते आज सायकलवरून विधान भवनात पोहोचले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन झालं. मंत्रालयासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर या सर्वांनी हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक घेऊन निदर्शनंही केली.

****

पेट्रोल डिझेलच्या किमतीवरून सत्ताधारी पक्ष करत असलेले आंदोलन हा निव्वळ फार्स असल्याची टीका विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. देशातल्या अनेक राज्यांच्या तुलनेत पेट्रोलचे दर महाराष्ट्रात लीटरमागे दहा रुपयांनी जास्ती आहेत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. वाढीव वीज देयकं आणि वीज जोडण्या खंडीत करणं, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, विधानसभाध्यक्ष निवडणूक, या मुद्यांवरून फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.

****

राज्यात एक हजार टुरिस्ट गाईड तयार करण्यासाठी पर्यटन संचालनालयानं पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत राज्याच्या विविध भागातल्या पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना राज्य सरकारचं टुरिस्ट गाईड प्रमाणपत्र दिलं जाणार असून, त्यांना राज्यस्तरावर विविध पर्यटन स्थळी काम करण्याची संधी मिळणार आहे, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी ही माहिती दिली.

****

६० वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांचं कोविड लसीकरण आजपासून सुरू झालं. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी चेन्नईत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत जेजे रुग्णालयात लस घेतली. औरंगाबाद इथं माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी कोविडची लस घेतली.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४५ वर्षीय पुरुष आणि ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान घाटी रुग्णालयात आज सकाळपर्यंत २३ नवे कोविडबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

****

क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोच्या वतीनं आयोजित कोविड 19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत योजनेच्या जनजागृती अभियानाला लातूर जिल्ह्यात आजपासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी या बहुमाध्यम प्रदर्शन वाहनाचं उद्घाटन केलं. लातूर इथल्या मुक्ताई बहुउदेशिय सेवा भावी संस्था तसंच सर्वधर्म समभाव कला मंडळाच्या कलापथकाने यावेळी जनजागृतीपर कार्यक्रम सादर केले. जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये पुढचे दहा दिवस या बहुमाध्यम वाहनाद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात आजपासून आठवडाभराची कडक संचारबंदी लागू झाली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातल्या एसटी बस आगारातल्या सर्व बस वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून जाणाऱ्या बसच्या वाहतुकीला मात्र परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार हिंगोली, कळमनुरी, आखाडा बाळापुर, तसंच वसमत या बसस्थानकामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची rt-pcr चाचणी करण्यात येत आहे. त्या त्याअंतर्गत हिंगोली बसस्थानकात तपासलेल्या प्रवाशांपैकी चार जण कोविड बाधित आढळले आहेत. दिवसभरात सुमारे दीडशे प्रवाशांची चाचणी करण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यात कोविड लसीकरण केंद्रांवर आजपासून ६० वर्षावरील नागरिकांना कोविड लस देण्यास सुरवात झाली. कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात माजी आरोग्यमंत्री रजनी सातव यांनी कोविड लस घेतली.

****

परभणी जिल्ह्यातही ६० वर्षावरील नागरिक तसंच ४५ वर्षांवरील अनुषंगिक आजार असलेल्या व्यक्तींना आजपासून कोविड लस देण्यास सुरवात झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली. जिल्हा शासकीय रुग्णालयासह सर्व ग्रामीण तसंच उपजिल्हा रुग्णालयं, तसंच महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना इत्यादी अंतर्गत नोंदणीकृत केंद्रातही कोवीड लसीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

****

लातूर जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता, जिल्हा प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. शहरातल्या एका वसतीगृहात गेल्या आठवड्यात ४५ विद्यार्थी कोविडग्रस्त आढळले होते, या पार्श्वभूमीवर शहरातल्या सगळ्याच वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोविड चाचण्या करण्यात येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ सुधा राजूरकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली.

लातूरमध्ये काही दिवसांपुर्वी एका वसतीगृहावर मोठ्या संख्येने मुले पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही इथे ज्यांना लक्षणे आहेत. सगळ्यांची टेस्टिंग करत आहोत. इथे १०२ हॉस्टेल आहेत. मॅग्झीमम बालक बाहेर गावाहून इथे ट्युशनसाठी येतात. तर प्रादुर्भाव अजून होऊ नये, वाढु नये याचा खबरदारीचा उपाय म्हणून इथे टेस्टिंग केली आहे. त्यांचे रिपोर्ट जीएमसीकडून जसे आम्हाला येतील, तसे आवशक्यतेनुसार आम्ही आमची टेस्टिंग वाढवू. त्याच्यासाठी महानगरपालिकेची आमची सर्व टीम सुसज्ज आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्रावाचा नमुना स्वॅब विलासराव देशमुख वैद्यकीय संस्थेत पाठवला जात आहे. तपासणी अहवाल आल्या नंतर बाधित विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवायचं की कोवीड केंद्रात, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

****

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा तसंच इसापूर उजव्या कालव्या मार्फत पाणीपाळ्यांचे नियोजन जलसंपदा विभागानं जाहीर केलं आहे. यानुसार दोन्ही कालव्यातून पहिली पाणीपाळी आज एक मार्च रोजी, दुसरी पाणीपाळी २७ मार्चला, तिसरी २३ एप्रिलला तर चौथी पाणीपाळी १९ मे रोजी सोडण्यात येईल. इच्छुकांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात तसंच विहीत दिनांकापूर्वी संबंधित शाखा कार्यालयात दाखल करावेत. विनापरवानगी पाणी उपसा केल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाईचा इशारा कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी दिला आहे.

//********//

 

No comments:

Post a Comment