Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 March 2021
Time 7.10am to 7.25am
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २३ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
** गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध
झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे संसदेत पडसाद; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आरोप खोटे
असल्याचं स्पष्टीकरण
** भ्रष्टाचाराची निःपक्षपाती, आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी
करण्याची माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची सर्वोच्च
न्यायालयाकडे मागणी
** राज्यात दररोज तीन लाख लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य - आरोग्य मंत्री राजेश टोपे
** राज्यात २४ हजार ६४५ नवीन कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात ४० रुग्णांचा संसर्गानं मृत्यू तर चार हजार ३२३ बाधित
** औरंगाबाद जिल्ह्यात २५ पेक्षा जास्त रूग्ण आढळलेल्या गावांतील सर्व नागरिकांची तातडीनं
कोविड चाचणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे
निर्देश
** कंगणा रनावतला
उत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मनोज वाजपेयी आणि धनुषला उत्कृष्ट
अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
** औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १४ जागा जिंकत शेतकरी विकास पॅनलनं
बहुमत, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे पराभूत
आणि
** औरंगाबाद,
हिंगोली, नांदेड, जालना आणि बीड
जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
****
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध
झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद काल संसदेत उमटले. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन
वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये खंडणी गोळा करायला सांगितलं होतं, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. याप्रश्नी काल राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या
गदारोळामुळे, कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं.
देशमुख यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी भाजपा सदस्य करत होते. त्यावरुन
सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. खंडणी उकळण्यामधे
मुंबई पोलीस कसे गुंतले आहेत, हे साऱ्या देशानं पाहिलं, ही
गंभीर बाब आहे, असं माहिती आणि प्रसारण
मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.
लोकसभेतही या मुद्यावरुन गदारोळ झाला. याप्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी भाजप
सदस्यांनी केली. हा महाराष्ट्र सरकारचा मोठा घोटाळा आहे, असा आरोप भाजप खासदार कपिल पाटील यांनी केला. त्यावर प्रत्त्युत्तर देताना, राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी
भाजपानं अनेक प्रयत्न केले असल्याचा आरोप, शिवसेनेचे खासदार
विनायक राऊत यांनी केला. देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त
परमबीर सिंग यांच्या निष्ठेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर भाजपा
आणि शिवसेना सदस्यांमधे, जोरदार आरोप प्रत्यारोप झाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
खासदार शरद पवार यांनी दिल्लीत काल पत्रकारांशी बोलतांना, गृहमंत्री देशमुख
यांच्यावरचे आरोप खोटे असून, त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच
येत नाही, असं स्पष्ट केलं. परमबीरसिंग यांचं पत्र हे
तपासाची दिशा बदलण्यासाठी असल्याचं सांगून पवार यांनी, त्यांचे
सर्व आरोप फेटाळून लावले. फेब्रुवारी महिन्यात ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी
पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख यांना
कोरोना विषाणूची लागण झाल्यानं, ते नागपूरमध्ये इस्पितळात
दाखल होते, या काळात ते वाझे यांना भेटलेच नाही, असा दाखला त्यांनी दिला. मूळ मुद्दा हा परमबीर सिंग यांचं पत्र नसून, स्फोटकं ठेवली हे प्रकरण असल्याचं,
पवार यांनी नमूद केलं.
****
राज्य सरकार बरखास्त करून राज्यात
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर
सिंग यांच्या पत्रामुळे, राजकारणी आणि प्रशासनातील
गुन्हेगारी तत्वांची टोळी उघड झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, मुंबईच्या पोलीस आयुक्त
पदावरुन हटवून गृह रक्षक दलामध्ये आकसापोटी बदली केल्याचा आरोप करत, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी, गृहमंत्री
अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती, आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
करणारी याचिका, सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. किमान
दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपली बदली बेकायदेशीररित्या केल्याचा आरोप, त्यांनी या याचिकेत केला आहे. बदली आणि पदस्थापना देण्याच्या
प्रकरणासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या
अहवालाचीही सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी परमबीर सिंह यांनी याचिकेत केली आहे.
****
राज्यात लसीकरणाचा वेग वाढवून दररोज तीन लाख
लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. पुढच्या तीन महिन्यात लसीकरण पूर्ण
करण्याचा उद्देश आहे. ग्रामीण भागात उपकेंद्रांमधेही लसीकरणाची सोय उपलब्ध करुन
दिली जाईल. तसंच खाजगी रुग्णालयानं मागणी केली तर लसीकरणाला परवानगी दिली जाईल,
असं ते म्हणाले.
मुंबई, पुणे नागपूर, या शहरांमधे दररोज आढळणारी
कोरोना विषाणू बाधितांची आकडेवारी चिंता
वाढवणारी आहे. त्यामुळे कोरोना नियमांची सक्तीनं अंमलबजावणी केली पाहिजे, सर्व स्थानिक प्रशासनांना तसे
आदेश दिले असल्याचं टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
२५ आणि ३० हजारांच्या दरम्यान या केसेस जास्त दिवस अश्याच
राहिल्या तर हे योग्य नाही आपल्याला फार कडक पद्धतीनं याच्यामध्ये जावं लागेल. काही
सिटीजमध्ये लॉकडाऊन करावे लागतील.एखादवेळेस राज्यामध्ये सुद्धा आपल्याला जर मोठ्या
पद्धतीनं काही स्पाईक हा जास्त कालावधीपर्यंत राहणार असेल तर आपल्याला एक यामध्ये अजून
कठोर पद्धतीनं जावं लागेल.आता जनतेलाच मी अपील करेल की, खऱ्या अर्थानं आपण अतिशय उत्तम
प्रतिसाद द्यावं आणि कोरोना अनुषंगानं मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं. जर
आपल्याला लॉकडाऊन टाळायचं असेल तर.
****
राज्यात काल २४ हजार ६४५ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविडबाधितांची एकूण संख्या २५ लाख चार हजार ३२७ झाली आहे. काल ५८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण
संख्या, ५३ हजार ४५७ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १५ शतांश टक्के झाला
आहे. काल १९ हजार ४६३ रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २२ लाख ३४ हजार ३३० रुग्ण, कोरोना विषाणू
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८९
पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात दोन
लाख १५ हजार २४१ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार ३२३ कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातल्या २०, नांदेड जिल्ह्यातल्या १०, जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी तीन, तर बीड आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ४०६ रुग्ण
आढळले, तर नांदेड जिल्ह्यात १ हजार २९१ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. जालना जिल्ह्यात ५६२, परभणी ३१५, लातूर २४६, बीड २३९,
उस्मानाबाद १७३ तर हिंगोली
जिल्ह्यात ९१ नवे रुग्ण आढळून आले.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी, २५ पेक्षा जास्त रूग्ण आढळलेल्या गावांतील
सर्व नागरिकांची तातडीनं कोविड चाचणी करण्याचे निर्देश, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कोविड
रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा
दक्षता संनियंत्रण समितीची काल बैठक झाली. या बैठकीत
बोलतांना ते म्हणाले…
पेशंटच्या
संख्येत वाढ होत असतांना ग्रामीण भागात प्रायव्हेट हॉस्पीटल सीसीसी करणे, आणि पेशंट
तपासणीची मोहिम घेणे आणि प्लस सीसीसी बेडसची संख्या वाढवणे तसंच मोठ्या प्रमाणात आम्ही
टेस्टींगच्या मागे लागणार आहे. कारण पॉझिटीव्हीटी आजही १७ ते १८ च्या दरम्यान आहे.
मला ती पाच टक्क्यांच्या आत आणायची आहे. त्याच्यामुळेच मोठ्या प्रमाणात टेस्टींग करणार,
टेस्टींग आणि ट्रेकिंग आणि त्याच्यापुढे व्हॅक्सीनेशन या चार पाच प्रकारे काम केल्यानं
माझा विश्वास आहे की औरंगाबाद मध्ये जी संख्या वाढते आहे ती कमी करणार
वाढीव चाचण्यांसाठी लागणाऱ्या किट
महानगरपालिकेकडून मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिल्या जातील, उपलब्ध मनुष्यबळ आणि
उपचार सुविधांचा पुर्ण क्षमतेने वापर करून वाढता संसर्ग रोखण्याचे निर्देश, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी,
यावेळी दिले. डॉ. मंगेश गोंदावले यांनी, ग्रामीण
भागातील संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण, उपजिल्हा
रूग्णालयांमार्फत करण्यात येणाऱ्या वाढीव चाचण्यांना, प्राथमिक
आरोग्य केंद्र तसंच स्थानिक यंत्रणा, स्थानिक लोकप्रतिनिधी
यांच्यामार्फत आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिलं जाईल,
असं सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी कोविड तपासणी करुन
घेण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले
आहेत. महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी
आज, पोलिस विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी
उद्या, जिल्हा परिषद विभागाच्या अधिनस्त सर्व विभागाचे अधिकारी,
कर्मचार्यांनी २५ आणि २६ मार्चला, न्यायालयातल्या सर्व न्यायीक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २७ मार्चला, आणि
जिल्ह्यातल्या सर्व विभागातल्या अधिकारी,
कर्मचाऱ्यांनी, २८ आणि २९ मार्च या दिवशी अँन्टीजन,
आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी असं या निर्देशात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा
वाढता प्रादुर्भाव पाहता उद्या बुधवार सायंकाळी सात वाजल्यापासून ते ३१ मार्चपर्यंत
जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल हे
आदेश जारी केले. परभणी जिल्ह्यात परजिल्ह्यातून ये - जा करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना
आजपासून ३१ मार्चपर्यंत बंदी घालण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
परभणी शहरात आजपासून रस्त्यावर विनामास्क
फिरणाऱ्या व्यक्तींवर
दंडात्मक कारवाई सोबतच, त्याला एक दिवस विलगीकरणात ठेवण्याची,
आणि आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देशही,
जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही काही जण नियमांचं पालन करत नसल्यानं ही कारवाई
करण्यात येत असल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या
आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह आयुक्त यांच्यावर टाकण्यात
आली आहे.
****
अभिनेत्री कंगणा रनावतला ‘मणिकर्णिका’साठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट अभिनयासाठी
मनोज वाजपेयी आणि धनुषला पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ६७ व्या राष्ट्रीय
चित्रपट पुरस्कारांची काल माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश
जावडेकर यांनी घोषणा केली. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘मरक्कर-अरबिक्कड लिंटे-सिंहम’ हा
उत्कृष्ट, तर मुथुकुट्टी झेविअर’ दिग्दर्शित हेलेन हा पदार्पणातल्या उत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. हे दोन्ही मल्याळम चित्रपट आहेत. पदार्पणातला उत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटासाठीचा पुरस्कार राज मोरे दिग्दर्शित मराठी
चित्रपट ‘खिसा’ला जाहीर झाला आहे, तर विवेक वाघ दिग्दर्शित ‘जक्कल’ या चित्रपटाला उत्कृष्ट शोध
चित्रपटासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.
‘बर्डो’ या मराठी चित्रपटातल्या ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सावनी रविंद्रला उत्कृष्ट
पार्श्वगायिकेचा, तर बी. प्राकला ‘केसरी’ चित्रपटातल्या ‘तेरी
मिट्टी’ या गाण्यासाठी उत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार
जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार आनंदी गोपाळ या
चित्रपटाला जाहीर झाला आहे.
****
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलनं १४ जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. शेतकरी सहकार बँक विकास पॅनेलला पाच जागा मिळाल्या आहेत
तर एक जण अपक्ष निवडून आला आहे. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये बँकेचे
विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील, महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार सतीश
चव्हाण, आमदार अंबादास दानवे, माजी
जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी पाटील, सुहास शिरसाठ, जगन्नाथ काळे, आप्पासाहेब पाटील, मंदाबाई माने, दिनेशसिंह परदेशी यांचा समावेश
आहे. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे आणि किरण
पाटील हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत माजी विधानसभा अध्यक्ष
आमदार हरिभाऊ बागडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे
यांच्यासह अशोक मगर, जयराम साळूंके, दिलीप
बनकर, एकनाथ जाधव यांचा पराभव झाला आहे.
****
मराठवाड्यातील
औरंगाबाद, हिंगोली, नांदेड,
जालना आणि बीड या जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागानं वर्तवली
आहे. उद्या देखील मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटसह पाऊस
पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
//**************//
No comments:
Post a Comment