Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 March 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
** देशात एक एप्रिलपासून ४५ वर्ष वयापेक्षा अधिक वयाच्या
सर्व नागरिकांना कोविड लस दिली जाणार
** महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने सत्तेवर राहण्याचा
नैतिक अधिकार गमावला - भाजपची टीका
** मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझेचा ताबा घेण्यासाठी
एटीएस एनआयए न्यायालयात अर्ज
** औरंगाबाद इथं घाटी रुग्णालयात आज १५ कोविडग्रस्तांचा
मृत्यू
आणि
** परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत
वरपुडकर गटाला १० तर बोर्डीकर गटाला ९ जागा
****
देशात एक एप्रिलपासून ४५ वर्ष वयापेक्षा अधिक वयाच्या
सर्व नागरिकांना कोविड लस दिली जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश
जावडेकर यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली.
यापुढे कोविड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमध्ये ४ ते आठ आठवड्यांचं अंतर असेल,
अशी माहिती जावडेकर यांनी दिली.
देशात कोविडच्या दोन्ही लसींचा पुरेसा साठा असून, सर्वांनी
आपलं नाव नोंदवून लस घ्यावी, असं आवाहन जावडेकर यांनी केलं.
दरम्यान, ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड लस देण्याची
मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले
आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन
बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यात
लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.
****
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने सत्तेवर राहण्याचा
नैतिक अधिकार गमावला असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ
नेते केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत, तीन पक्षांची
ही महाविकास आघाडी नसून वसूली आघाडी असल्याचा आरोप केला. गृहमंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या
आरोपावरून तीनही पक्ष एकमेकांकडे बोट दाखवतात, इतिहासातलं सर्वाधिक गोंधळलेलं सरकार
असल्याचं प्रसाद म्हणाले. अनिल देशमुख यांनी खासजी विमानाने नागपूर मुंबई प्रवास केल्याची
कागदपत्रं दाखवत, जर देशमुख हे जर कोविड बाधित होते, तर त्यांनी हा प्रवास कसा केला,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असा कोणता दबाब आहे, की त्यांना
सर्व पुरावे असूनही देशमुख यांची पाठराखण करावी लागते, असा प्रश्न प्रसाद यांनी विचारला.
****
मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझेचा ताबा घेण्यासाठी
२५ तारखेला राष्ट्रीय तपास संस्था एनआयए न्यायालयात अर्ज करणार असल्याचं, महाराष्ट्र
दहशतवादविरोधी पथक एटीएस प्रमुख जयजीतसिंग यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार
परिषदेत बोलत होते. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याचा जबाब नोंदवला असून,
तो चुकीचा असल्याचे पुरावे मिळाले आहेत, त्या संदर्भात अधिक चौकशीसाठी सचिन वाझे यांचा
ताबा हवा असल्याचं एटीएस प्रमुखांनी सांगितलं. गुन्ह्याचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर
आला असून, मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा एटीएसचा प्रयत्न असल्याचं, त्यांनी सांगितलं.
या गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी गाडी एटीएसने दीव दमणहून ताब्यात घेतली असल्याची
माहिती त्यांनी दिली. पोलिस कर्मचारी विनायक शिंदे याचा हत्येत सहभागाचे पुरावे मिळाले
असून, यासाठी वापरलेले सिमकार्ड नरेश रमणिकलाल नावाच्या बुकीकडून मागवण्यात आल्याची
माहिती त्यांनी दिली. या चौकशीत इतरही अनेक नावं समारे आली असून, तपासानंतर आणखी काही
जणांना अटक होणार असल्याचं एटीएस प्रमुखांनी सांगितलं.
****
राज्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोटाळा सुरु आहे, त्यासंदर्भात आपण
केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचं विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
गुप्तचर विभागाच्या
माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी यासंदर्भात काही राजकीय नेते आणि आयपीएस
अधिकाऱ्यांमधल्या संवादाचा छडा लावला होता. त्याचा अहवाल तयार करून, ही बाब त्यावेळचे पोलीस महासंचालक
सुबोध जयस्वाल यांच्या निदर्शनाला आणली होती, अशी माहिती फडणवीस
यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याबाबतची माहिती
मिळूनही त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
****
आज शहीद दिनानिमित्त क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि
सुखदेव यांच्या स्मृतींना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी आज वर्षा शासकीय निवासस्थानी या क्रांतिकारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या महान क्रांतिकारांनी बलिदान दिले
आहे. त्यांची प्रेरणा घेऊन देशाच्या रक्षणासाठी आणि देशाला बलशाली करण्यासाठी सदैव
सज्ज राहूया, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
औरंगाबाद महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम
यांच्या हस्ते तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी
भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात
आज सकाळी १५ कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये आठ पुरुष तर सात स्त्रियांचा समावेश
आहे. दरम्यान आज सकाळच्या सत्रात घाटी रुग्णालयात ८० नवे कोविड बाधित रुग्ण उपचारासाठी
दाखल झाले.
****
बीड जिल्ह्यात आज २०७ नवे कोविडग्रस्त आढळले. यापैकी
अंबाजोगाई तालुक्यात ५६, बीड तालुक्यात ४२, माजलगाव २५, आष्टी १७, परळी १५, पाटोदा
१२, केज ११, गेवराई ९, धारूर आणि शिरुर प्रत्येकी ८, तर वडवणी तालुक्यातल्या ४ रुग्णांचा
समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी
रुग्ण व्यवस्थापन चोखरित्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले
आहेत. ते आज जिल्हा सामान्य रुग्णालयात घेतलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. लक्षणं नसलेल्या
तसंच सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना कोविड सुश्रुषा केंद्रात पाठवावं, आणि उपचारांची
जास्त गरज असलेल्या रुग्णांना मिनी घाटीतील रुग्णखाटा उपलब्ध होतील याची खबरदारी घेण्याची
सूचना त्यांनी केली. या रुग्णालयात उपलब्ध एकूण रुग्णखाटा, अतिदक्षता विभागातल्या रुग्णखाटा,
तसंच रिक्त रुग्णखाटा याबाबतची अद्ययावत माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे
निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या
निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या गटाला २१ पैकी १० जागा तर ज्येष्ठ नेते
रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या आहेत. भाजपचे नेते गणेश रोकडे स्वतंत्रपणे
निवडणूक लढवून विजयी ठरले. तर पूर्णेतून बालाजी देसाई हे बिनविरोध निवडून आले आहेत.
हे दोन्ही उमेदवार कोणत्या गटाचे, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे
यंदा २५, २६ आणि २७ मार्चला फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे.
यंदा ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत यशवंत मनोहर, विधीज्ञ
असीम सरोदे, साहित्यिक डॉ मिलिंद आव्हाड हे आपले विचार मांडणार आहेत. दररोज सायंकाळी
साडे पाच वाजता देवगिरी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर या व्याख्यानमालेत नागरिकांना
सहभागी होता येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात वीज देयकाची वसुली
थांबवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. या मागणीचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या
कार्यकर्त्यांनी उपकार्यकारी अभियंता गैरहजर असल्याने, त्यांच्या खुर्चीला चपलांचा
हार घालून निवेदन चिकटवलं. ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वात
हे आंदोलन करण्यात आलं.
****
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, रिपब्लिकन
पक्षाचे नेते डी एन गायकवाड यांचं आज दुपारी अल्पशा आजारानं निधन झालं, ते ५८ वर्षांचे
होते. आज सायंकाळी बक्षी हिप्परगे या गावी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले
जाणार आहेत.
****
क्रिकेट
भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात सुरू असलेल्या पहिल्या
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर ३१८ धावांचं लक्ष्य ठेवलं
आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं, शिखर धवनच्या ९८, के एल राहुलच्या ६२, कृणाल
पांड्याच्या नाबाद ५८, कर्णधार विराट कोहलीच्या ५६, आणि रोहित शर्माच्या २८ धावांच्या
बळावर ३१७ धावा केल्या आहेत.
****
हजरत निझामुद्दीन-नांदेड दरम्यान होळी अतिजलद विशेष गाडीच्या
दोन फेऱ्या होणार आहेत. हजरत निझामुद्दीन येथून ही गाडी २५ मार्च आणि १ एप्रिलला तर
नांदेड इथून ही गाडी २७ मार्च आणि ३ एप्रिलला सुटेल. ही गाडी अकोला, भोपाळ मार्गे धावणार
आहे.
बंगळुरू - नांदेड
- बंगळुरू या उत्सव विशेष गाडीलाही ३० मार्च ते १ जुलै पर्यंत मुदत वाढ देण्यात आली
आहे. रामेश्वर-ओखा - रामेश्वर या साप्ताहिक उत्सव विशेष गाडीलाही ०२ एप्रिल ते ते २९
जून दरम्यान १३ फेऱ्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
विभागीय कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
//********//
No comments:
Post a Comment