▼

Sunday, 21 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 March 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०

****

** गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचं ठिकठिकाणी आंदोलन

** मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणी दोन अटकेत

** औरंगाबाद इथं सहा, जालन्यात चार तर हिंगोलीत एका कोविडग्रस्ताचा मृत्यू, बीडमध्ये ३६६ नवे रुग्ण

आणि

** शाळकरी मुलांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्याला सर्वोच्च प्राधान्यक्रम - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

****

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं खासदार डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं. लातूर इथं शहराध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. उस्मानाबादमध्ये जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. परभणी इथंही पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या नेतृत्वात आंदोन करण्यात आलं, त्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. नांदेड इथं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत, गृहमंत्र्यांवर कारवाईची मागणी केली. मुंबई, नागपूर, नाशिक, सिंधुदुर्ग, वाशिम आदी ठिकाणीही भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

****

गृहविभागासंदर्भात यापूर्वीही झालेल्या आरोपांवर सरकारनं काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप, विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पोलिस दलातील बदल्या तसंच नेमणुकीसाठी होणाऱ्या गैरव्यवहारासंदर्भात तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनीही मुख्यमंत्र्यांना एक अहवाल सादर केला होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनीही गृह विभागाच्या कारभाराबद्दल अहवाल सादर केला होता, मात्र या बाबत सरकारनं काहीही कारवाई केली नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेला सोपवायची नसेल तर न्यायालयाच्या देखरेखीमध्ये चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणी भाजप आंदोलन करतच राहील, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या प्रकरणाची निवृत्त पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांच्या मार्फत चौकशी करण्याची सूचना केली आहे. मात्र एक माजी पोलिस महासंचालक, पदावर असलेल्या गृहमंत्र्याची चौकशी करू शकणार का, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला.

****

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय घेऊ, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप हे गंभीर आहेत. राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. सरकारवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

****

नैतिकेच्या दृष्टीनं अनिल देशमुख यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी या प्रकरणी देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून काढण्याची तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

 

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना, गृहमंत्र्यांवरचे आरोप गंभीर असून यामुळे या सरकारवर शिंतोडे उडवले गेले आहेत, त्यामुळे काही बाबतीत आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. या आरोपांसंदर्भात चौकशी करण्याची मागणी स्वतः गृहमंत्री देशमुख यांनी केली आहे, त्याचप्रमाणे या पत्राबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे योग्य ती चौकशी करतील असंही राऊत म्हणाले.

****

मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकानं दोघांना अटक केली, त्यांना आज न्यायालयासमोर हजर केलं असता, येत्या तीस तारखेपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींमधील एकजण `लखन भय्या` खोट्या चकमकी प्रकरणी निलंबित पोलिस कर्मचारी असून दुसरा बुकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

****

देशातल्या काही राज्यांमधे कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्ण वाढीचा वेग दररोज झपाट्यानं वाढत असून  महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात ७७ पूर्णांक सात शतांश टक्के नवे रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, देशात चार कोटी ४० लाखांहून अधिक जणाचं लसीकरण झालं आहे. काल २५ लाखांपेक्षा अधिक जणांना, कोविड लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात सध्या या संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या तीन लाख नऊ हजार असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ पूर्णांक ९६ शतांश टक्के आहे.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज सहा कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातल्या एका महिलेचा समावेश असून, औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान आज घाटी रुग्णालयात सकाळच्या सत्रात ९२ नवे कोविडग्रस्त उपचारासाठी दाखल झाले. तर २८ रुग्णांना सुटी देण्यात आली.

****

जालना जिल्ह्यात आज चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४३४ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ५२७ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता हजार २१ हजार ७२८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ३८७ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १९  हजार ४५७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या एक हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात या संसर्गामुळे मृत्यू दगावलेल्यांची संख्या ७४ झाली आहे. जिल्ह्यात आज नवे ७० कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर ५२ जणांना सुटी देण्यात आली

****

बीड जिल्ह्यात आज ३६६ नवे रुग्ण आढळले. यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक १५८, अंबाजोगाई ७१, माजलगाव २३, केज २०, आष्टी १८, परळी तसंच पाटोदा प्रत्येकी १५, गेवराई ८, वडवणी ५, धारूर २, तर शिरूर तालुक्यात एका रुग्णाचा समावेश आहे.

****

शाळकरी मुलांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात येत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. जागतिक कथाकथन दिवसाच्या औचित्यानं ‘गोष्टींचा शनिवार’ या कथा वाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसंच एकात्मिक बाल विकास सेवा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन परिसंवादाच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आला. मुलांची सकारात्मक वाढ आणि विकासाचा भाग असलेल्या कथाकथनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं, वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. या कार्यक्रमात राज्यातले २५ लाख विद्यार्थी, २ लाख ६० हजार शिक्षक आणि अंगणवाडी सेवक, तसंच राज्यभरातल्या एक लाख शाळा आणि अंगणवाडयांनी सहभाग घेतला.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविडसंदर्भात गंभीर परिस्थिती उद्भवू नये यासाठी नागरिकांनी गर्दी टाळावी तसंच मास्कचा वापर करा, असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे. वारंवार सूचना देऊन, तसंच कारवाई करूनही ५०% पेक्षा अधिक लोक विना मास्क फिरत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत ९० % रुग्ण लक्षणं नसलेले आहेत. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर गंभीर रुग्णांना रुग्णखाटा मिळण्यात अडचणी येतात, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता कोविड लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असंही जिल्हाधिकारी म्हटलं आहे.

****

जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून वनविभाग आणि पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद शहरात धर्मवीर संभाजी महाराज उद्यान आणि जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात 'ओंजळभर पाणी - मूठभर धान्य' या उपक्रमांतर्गत पक्ष्यांसाठी ४० ठिकाणी दाणापाण्याची सोय करण्यात आली. वनविभाग आणि पक्षीमित्र यांच्या सहकार्यातून एक हजार ठिकाणी यंदा पक्ष्यांसाठी दाणा पाण्याची सोय करण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात सेलू-पाथरी मार्गावर काल एका अपघातात दोन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास, देऊळगाव पाटीजवळ वाळूनं भरलेल्या ट्रकनं दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातग्रस्त दुचाकीवरचे तिघं  सेलूहून राधे धामणगावाकडे जात होते.

****

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं. सिल्लोड इथं सर्वच्या सर्व एकूण १०५ मतदारांनी मतदान केल्यानं, १०० टक्के मतदान नोंदवलं गेलं.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी एक हजार ५२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९७ पूर्णांक १४ टक्के मतदानाची नोंद झाली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आजही अनेक भागात गारपिटीसह पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात घाटनांद्रा, अंभई, गोळेगाव परिसरात गारपीट झाल्याचं वृत्त आहे.

//********//

 

No comments:

Post a Comment