▼

Saturday, 20 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 March 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 March 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.

****

केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. कोविड संक्रमण रोखण्यासाठी सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं गेलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड १९ संबंधी दिशा निर्देशांविषयी जनजागृती करावी, असंही भल्ला यांनी सांगितलं आहे. 

****

भारतानं कोविड लसीकरण मोहीमेत चार कोटींची संख्या ओलांडून एक नवा टप्पा काल पार केला. आतापर्यंत देशात चार कोटी ११ लाख ५५ हजार ९७८ जणांचं लसीकरण झालं आहे.

दरम्यान, देशात काल नव्या ४० हजार ९५३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १८८ नागरीकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी १५ लाख ५५ हजार २८४ झाली असून, आतापर्यंत या संसर्गानं एक लाख ५९ हजार ५५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल २३ हजार ६५३ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी ११ लाख सात हजार ३३२ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ८८ हजार ३९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

आज जागतिक चिमणी दिवस आहे. या पक्ष्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दर वर्षी वीस मार्चला जागतिक चिमणी दिवस आयोजित केला जातो. हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्यानं त्याच्या अस्तित्वाबाबत जागरूकता महत्त्वाची असल्यानं या दिवसाचा उपक्रम सुरू करण्यात आला. भारतीय पर्यावरणतज्ज्ञ मोहंमद दिलावर यांनी स्थापन केलेल्या नेचर फॉरेव्हर सोसायटीतर्फे हा उपक्रम आयोजित केला जातो.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मार्चला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७४वा भाग असेल.

****

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सेवानिवृत्त उपसचिव अनिस शेख यांची तीन वर्षाकरता नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या मान्यतेनंतर या नियुक्तीसंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली.

****

औरंगाबाद आणि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. सकाळी आठ ते दुपारी चार यावेळेत मतदान होईल. परवा २२ मार्चला सकाळी नऊ वाजता मतमोजणी होणार आहे.

****

दरम्यान, बीड जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानावर बहीष्कार घालत असल्याची घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. बीड जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा फार मोठा अवमान झाला आहे. निवडणूकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्यानं बहीष्कार टाकत असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल वार्ताहरांशी बोलत होत्या. कोरम पूर्ण होतील एवढे उमेदवारच होणार नाहीत असं सांगून त्यांनी, सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा डाव असल्याचा आरोप केला.

****

हिंगोली जिल्ह्यात कोविड १९ बाधित रुग्ण असलेल्या घरांवर गृहविलगीकरणाचे स्टीकर लावण्याची सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, त्यावर प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.   

****

जालना ते औरंगाबाद रेल्वे मार्गावर बदनापूर ते करमाड रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामामुळे २५ एप्रिलपर्यंत दर रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे औरंगाबाद ते हैदराबाद विशेष गाडी दोन तास पाच मिनिटे उशीरा, म्हणजे दुपारी सव्वा चार ऐवजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी वाजता सुटेल.

****

परभणी जिल्ह्यात सेलू इथं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतला ८० क्विंटल तांदूळ एका ट्रकमधून काल ताब्यात घेतला. हा तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय आहे.

****

आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताचे अचंत शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी काल दोहा इथं झालेल्या सामन्यात सिंगापूरच्या कोएन पँग यू एन आणि लिन ये यांचा चार-दोन असा पराभव केला. अचंत आणि मनिका यांची आज कोरियाच्या जोडीसोबत लढत होईल. या सामन्यात जिंकणारा संघ टोकियो ऑलिंपिक्समध्ये प्रवेश करणार आहे.

****

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिनं ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं काल जपानची अकेन यामागुची हिला उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत करून आगेकूच कायम ठेवली आहे. तिची आज थायलंडची पॉर्नपावी चोचुवोंग हिच्याबरोबर लढत होईल. दरम्यान, पुरुषांच्या एकेरी उपांत्यपूर्व फेरीत भारताचा लक्ष्य सेन नेदरलँड्सचा मार्क काल्जो याच्याकडून पराभूत झाला. 

****

भारत आणि इंग्लंड संघात अहमदाबाद इथं सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे.

****

 

 

 

No comments:

Post a Comment