Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 March 2021
Time 7.10am to 7.25am
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २१ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
** कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर
भर देण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश
** कोविड लस उत्पादनात हाफकिन इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा - मुख्यमंत्र्यांची सूचना
** दहावी बारावीच्या परीक्षा आपापल्या शाळा महाविद्यालयांत ऑफलाईन पद्धतीने होणार
** गृहमंत्र्यांसंदर्भात आलेल्या पत्राची
मुख्यमंत्री कार्यालयाकडून तपासणी सुरू
** राज्यात नवे २७ हजार १२६ कोविडग्रस्त;
मराठवाड्यात ३७ रुग्णांचा मृत्यू तर नव्या चार
हजार २६२ रुग्णांची नोंद
** लातूर, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात
कोविड प्रतिबंधासाठी विविध निर्बंध लागू
आणि
** पाचव्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा
इंग्लंडवर ३६ धावांनी विजय; मालिकाही जिंकली
****
केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि
केंद्रशासित प्रदेशांना कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याचे
निर्देश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य
सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. कोविड संक्रमण रोखण्यासाठी सूचनांचं काटेकोरपणे
पालन केलं गेलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड १९ संबंधी मार्गदर्शक सूचनांबाबत
जनजागृती करावी, असंही भल्ला यांनी सांगितलं आहे.
****
कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटने पुढाकार
घ्यावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल मुंबईत परळ इथं हाफकिन
इन्स्टिट्यूटला भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केल्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री
बोलत होते.हाफकिन आणि हैदराबाद इथल्या भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत
कोविड लसीची छोट्या सुलभ मात्रांच्या स्वरुपात बांधणी करण्यात येणार असून, त्यासाठी
१५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्रकल्प मुंबईत सुरु करण्यात येत आहे.
****
दहावी बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार यंदा
आपापल्या शाळा महाविद्यालयांमध्येच ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा
गायकवाड यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ४० ते ५० गुणांच्या परीक्षेसाठी
१५ मिनिटं, ८० गुणांपेक्षा अधिक गुणांच्या परीक्षेसाठी ३० मिनिटं तर, दिव्यांग परीक्षार्थींना
दर तासाला २० मिनिटं वाढीव वेळ दिला जाणार आहे. कोविड संसर्ग किंवा प्रतिबंधित क्षेत्रामुळे
जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जून महिन्यात स्वतंत्रपणे परीक्षा
घेण्यात येईल. ही पुरवणी परीक्षा नसेल, तर मुख्य परीक्षा म्हणूनच ओळखली जाईल, या परीक्षेसाठी
कोणतंही स्वतंत्र शुल्क घेतलं जाणार नाही. यंदा दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा गृहपाठ
स्वरुपात घेतली जाईल, हा गृहपाठ लेखी परीक्षेनंतर शाळेत जमा करायचा आहे.
****
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री
अनिल देशमुख यांच्यावर पुराव्यासह केलेले आरोप पाहता, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा
द्यावा, आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा विषय महाराष्ट्र पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारा असल्याची
टीका त्यांनी केली. गृहमंत्री देशमुख हे दरमहा शंभर कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा
आरोप परमबीरसिंग यांनी राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
गृहमंत्री देशमुख यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले
आहेत. परमबीर सिंग यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला आणि महाविकास आघाडी सरकारला
बदनाम करण्यासाठी रचलेलं षडयंत्र असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, परमबीरसिंग यांचं नाव असलेलं पण, स्वाक्षरी
नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात
आलं आहे. परमबीरसिंग यांचा नियमित वापरात असलेला ईमेल पत्ता आणि पत्र ज्यावरून आलं,
तो ईमेल पत्ता वेगवेगळा आहे. सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं,
मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
****
औरंगाबाद
ग्रामीण पोलिसांच्या ‘अभिन्न’ या उपक्रमाला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ
कॉमर्स अँड इंडस्ट्रीज -फिक्की या संस्थेच्या राष्ट्रीय
पातळीवरील स्मार्ट पोलिसिंग २०२० या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या
या उपक्रमात राबवलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत
****
राज्यात काल २७ हजार १२६ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविडबाधितांची एकूण संख्या २४ लाख ४९ हजार १४७ झाली आहे. काल ९२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण
संख्या, ५३ हजार ३०० झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १८ शतांश टक्के झाला
आहे. काल १३ हजार ५८८ रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २२ लाख ०३ हजार ५५३ रुग्ण, कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८९ पूर्णांक ९७ शतांश टक्के झाला आहे. सध्या
राज्यभरात एक लाख ९१ हजार ०६ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार २६२ कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३७ रुग्णांचा
या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २०, नांदेड जिल्ह्यातल्या सात, जालना जिल्ह्यातल्या पाच, बीड जिल्ह्यातल्या
दोन, तर लातूर, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार सहाशे एकोणऐंशी रुग्ण
आढळले. नांदेड जिल्ह्यात ९४७, जालना ५२०, परभणी ३२३, लातूर २८४, बीड २६५, उस्मानाबाद १२५ तर हिंगोली जिल्ह्यात
११९ नवे रुग्ण आढळून आले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात ‘सप्ताहांत टाळेबंदीला’ काल नागरिकांचा उत्स्फुर्त
प्रतिसाद
मिळाला. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात आजही टाळेबंदी पाळली जाणार आहे. दरम्यान, शहराच्या सीमांवर तीन ठिकाणी तपासणी नाके कालपासून
सुरू झाले, या चाचणीत १२ कोविडरुग्ण आढळले. उद्यापासून आणखी तीन तपासणी नाके सुरू होणार
आहेत.
****
लातूर जिल्ह्यातील
सर्व सरकारी, खाजगी शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवण्या आणि व्यवसाय प्रशिक्षण संस्था
३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी दिले आहेत.
यासंदर्भातील पत्रक जिल्हाधिकारी कार्यालयानं जारी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातली सर्व भोजनालयं, उपाहारगृहं, चहाची
दुकानं तसंच पानपट्ट्या उद्या सोमवारपासून ३१ मार्चपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल जारी केले. या सर्व आस्थापनांना स्वयंपाकघरं सुरू
ठेवून पार्सल सेवा चालू ठेवता येणार आहे. आंतरजिल्हा तसंच जिल्ह्यांतर्गत एसटीसह खासगी
बससेवाही सोमवारपासून ३१ मार्चपर्यंत पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात सायंकाळी ७ ते पहाटे पाच पर्यंत
संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल याबाबतचे
आदेश दिले. पुढच्या सूचनेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरची
दुकानं सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू राहातील.
****
क्रिकेट -
अहमदाबाद इथं काल झालेल्या पाचव्या आणि अंतिम
टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३६ धावांनी विजय मिळवत, मालिकाही जिंकली.
प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं दिलेल्या २२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना,
इंग्लंड संघ निर्धारित षटकांत १८८ धावाच करू शकला. भुवनेश्वर कुमार सामनावीर तर विराट
कोहली मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
दरम्यान, दोन्ही संघादरम्यान तीन एकदिवसीय
क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला २३ मार्चपासून पुण्यात प्रारंभ होत आहे. या मालिकेसाठी
सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश करण्यात आला
आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल अनेक भागात पाऊस झाला. सिल्लोड
तालुक्यात शिवना, वडाळा, पैठण तालुक्यात पाचोड तसंच औरंगाबाद नजिक गाडीवाट इथं गारपीट
झाल्याचं वृत्त आहे.
परभणी जिल्ह्यात पूर्णा शहर आणि परिसरात काल जोरदार पाऊस
झाला. जालना जिल्ह्यात बदनापूर आणि घनसावंगी तालुक्यातल्या बहुतांश भागात वादळी वारा
आणि गारपिटीसह पाऊस झाला. या पावसामुळे गहू, कांदा बियाण्यांसह द्राक्ष बागांचं नुकसान
झालं. दरम्यान, मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पुढचे दोन दिवस पाऊस होण्याचा अंदाज
आहे.
****
औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचे
निवृत्त प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचं शुक्रवारी रात्री अल्पशा आजारानं निधन झालं,
ते ७९ वर्षांचे होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था आणि मराठवाडा जनता
विकास परिषदेचे सचिव म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी अंत्यसंस्कार
करण्यात आले.
****
शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा देण्यासाठी विमा कंपन्या
असमर्थता दर्शवत आहेत, तर दुसरीकडे नियमित न दिलेल्या वीजेची बिलं सक्तीने वसूल केली
जात असल्याचा आरोप, आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी जनतेनेच
सत्ताधाऱ्यांना थेट जाब विचारवा असं पाटील म्हणाले.
दरम्यान, कृषी पंपाची विज कापून शेतकऱ्यांना अजून अडचणीत
आणू नका, असं भाजप किसान मोर्चाचे मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी म्हटलं
आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रुईभर इथं समर्थ बुथ सशक्त बुथ या अभियानात ते बोलत होते.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात एका तरुणाने लग्न
करून देण्याच्या कारणावरून आई, मावशी आणि आजीवर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये त्याच्या
मावशी तसंच आजीचा मृत्यू झाला, तर आईवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रोहिदास चऱ्हाटे असं या तरुणाचं नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी
दोन आरोपींना तीन वर्ष कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरीक्त
सह जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपींना सहा महिने अतिरिक्त
कारावास भोगावा लागणार आहे.
//***************//
No comments:
Post a Comment