Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22 March 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
** आयुष्याच्या अर्थव्यवस्थेसाठी पाण्याचं संवर्धन आवश्यक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
** गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची
निःपक्षपाती आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण
विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल;
देशमुख प्रकरणावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ
** ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कारांची घोषणा; मनोज बाजपेयीला सर्वोत्कृष्ट अभिनेता
तर कंगना रानावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
** औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेच्या निवडणुकीत १५ जागा जिंकत शेतकरी
विकास पॅनलला बहुमत; बँकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री
अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण तसंच आमदार
अंबादास दानवे विजयी तर माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे पराभूत
आणि
** २५पेक्षा जास्त कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रूग्ण आढळलेल्या गावांतील सर्वांच्यांच तातडीनं कोविड चाचण्या करण्याचे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
****
आयुष्याच्या अर्थव्यवस्थेसाठी पाण्याचं संवर्धन
आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक जल दिनाच्या
निमित्तानं जलशक्ती अभियान - कॅच द रेन या अभियानाचा शुभारंभ आज पंतप्रधानांच्या
हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाला, त्यावेळी ते बोलत होते. “पाऊस जेव्हा
आणि जिथे पडेल त्यानुसार जलसंचय” या संकल्पनेसह हे अभियान
देशभरात राबवलं जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जीवनातील पाण्याच्या
अपरिहार्यतेचा विचार करुन आवश्यक मर्यादित प्राकृतिक संसाधनांचा आवश्यक तेवढाच
उपयोग करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यैंकय्या नायडू यांनी
ट्विटसंदेशातून केलं आहे.
****
देशातल्या काही राज्यांमधे कोरोना विषाणू
संसर्गाच्या रुग्ण वाढीचा वेग दररोज झपाट्यानं वाढत असून महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक,
गुजरात आणि मध्य प्रदेशात एकूण ८० पूर्णांक पाच शतांश टक्के नवे
रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ४६ हजार ९५१ नवीन कोवीड बाधीतांची नोंद झाली. यात महाराष्ट्रात
सर्वात जास्त ३० हजार ५३५ रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन हटवून
गृह रक्षक दलामध्ये आकसापोटी बदली केल्याचा आरोप करत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून
केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग
- सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च
न्यायालयात दाखल केली आहे. किमान दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण
होण्याआधीच आपली बदली चुकीच्या आणि बेकायदेशीररित्या केल्याचा आरोप त्यांनी या याचिकेत केला आहे. बदली आणि पदस्थापना
देण्याच्या प्रकरणासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला
यांनी सादर केलेल्या अहवालाचीही सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.
दरम्यान, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री
देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. या
मुद्यावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी
लोकसभेत गदारोळ केला. गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप खासदारांनी केली. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहीली
नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची
मागणी भाजप खासदार गिरीष बापट यांनी केली.
खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात
असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. जो व्यक्ती १६ वर्ष निलंबित होता, सात दिवस तुरुंगात राहिला, त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतलं, असा
प्रश्न राणा यांनी उपस्थित केला. या सर्व प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी
व्हावी, अशी मागणी भाजप खासदार राकेश सिंह यांनी केली.
राज्यसभेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
यांनी हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात, हे सगळ्या देशाने पाहिलं असल्याचं
ते म्हणाले. शिवसेना खासदारांनी परमबीर सिंग यांची चौकशी करण्याची मागणी केली.
यामुळे सदनात गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात
आलं होतं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
खासदार शरद पवार यांनी दिल्लीत आज पत्रकारांशी बोलतांना गृहमंत्री देशमुख
यांच्यावरचे आरोप खोटे असून, त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच
येत नाही, असं स्पष्ट केलं. परमबीरसिंग
यांचं पत्र हे तपासाची दिशा बदलण्यासाठी असल्याचं सांगून पवार यांनी, त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. फेब्रुवारी महिन्यात ज्या दिवसांचा
परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल
देशमुख यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानं ते नागपूरमध्ये इस्पितळात दाखल
होते, या काळात ते वाझे यांना भेटलेच नाही, असा
दाखला त्यांनी दिला. मूळ मुद्दा हा परमबीर यांचं पत्र नसून, स्फोटकं
ठेवली हे प्रकरण असल्याचं, पवार यांनी नमूद केलं.
****
६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज
घोषणा करण्यात आली. अभिनेता मनोज बाजपेयी यांना भोसले या चित्रपटासाठी आणि तामिल
चित्रपट असूरन साठी धनुष याला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार तर मनकर्णिका आणि पंगा या
चित्रपटासाठी अभिनेत्री कंगना रानावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
घोषित झाला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट छिछोरे तसंच मल्याळम चित्रपट मरक्कर यांना सर्वोत्कृष्ट
चित्रपटाचा पुरस्कार, सावनी रविंद्र हिला सर्वोत्कृष्ट
गायिका आणि बी प्राक याला सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि संगीतकार
डी इम्मान यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार पुरस्कार घोषित झाला आहे.
****
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
निवडणुकीत शेतकरी विकास
पॅनलनं १५ जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. यामध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील महसूल
ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
देवयानी पाटील, सुहास शिरसाठ, जगन्नाथ
काळे, आप्पासाहेब पाटील, मंदाबाई माने,
दिनेशसिंह परदेशी हे विजयी झाले आहेत. राज्याचे रोजगार हमी योजना
मंत्री आमदार संदिपान भुमरे आणि किरण पाटील हे
यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. या
निवडणुकीत माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ
काळे यांच्यासह अशोक मगर, जयराम
साळूंके, दिलीप बनकर, एकनाथ जाधव यांचा
पराभव झाला आहे.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी २५ पेक्षा जास्त रूग्ण
आढळलेल्या गावांतील सर्वांच्याच तातडीनं कोविड चाचण्या करण्याचे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्ह्यात
कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा
दक्षता संनियंत्रण समितीची आज बैठक झाली.
या बैठकीत बोलतांना ते म्हणाले…
पेशंटच्या संख्येत वाढ होत असतांना ग्रामीण भागात
प्रायव्हेट हॉस्पीटल सीसीसी करणे, आणि पेशंट तपासणीची मोहिम घेणे आणि प्लस सीसीसी बेडसची
संख्या वाढवणे तसंच मोठ्या प्रमाणात आम्ही टेस्टींगच्या मागे लागणार आहे. कारण पॉझिटीव्हीटी
आजही १७ ते १८ च्या दरम्यान आहे. मला ती पाच टक्क्यांच्या आत आणायची आहे. त्याच्यामुळेच
मोठ्या प्रमाणात टेस्टींग करणार, टेस्टींग आणि ट्रेकिंग आणि त्याच्यापुढे व्हॅक्सीनेशन
या चार पाच प्रकारे काम केल्यानं मला विश्वास आहे की औरंगाबाद मध्ये जी संख्या वाढते
आहे ती कमी करणार
महापालिका आयुक्त पाण्डेय यांनी वाढीव चाचण्यांसाठी लागणाऱ्या किट
महानगरपालिकेकडून मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिल्या जातील.
उपलब्ध मनुष्यबळ आणि उपचार सुविधांचा पुर्ण क्षमतेने वापर करून वाढता संसर्ग
रोखण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी दिले. डॉ. गोंदावले यांनी ग्रामीण भागातील
संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयांमार्फत
करण्यात येणाऱ्या वाढीव चाचण्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच स्थानिक यंत्रणा, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत
आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिल्या जाईल, असं सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज १४ कोविड बाधितांचा
मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं दगावणाऱ्यांची संख्या ही एक हजार ४३३ झाली
आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालय
घाटीत आज ८२ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. यामुळे जिल्ह्यातल्या
एकूण रुग्णांची संख्या आता ६७ हजार ४३६ झाली आहे. तीस जणांना आज सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात आतापर्यंत ५४ हजार ८९६ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे.
****
बीड जिल्ह्यात आज २३९ नवे कोविड बाधित रुग्ण
आढळले. यामध्ये बीड १०६, अंबाजोगाई ४३, केज २०, परळी १५,
धारुर १२, माजलगाव ११, गेवराई
१०, शिरुर तीन आणि पाटोदा - वडवणी इथल्या प्रत्येकी दोन
रुग्णांचा समावेश आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८५७
नवीन कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची
संख्या आता चार हजारापर्यंत पोहोचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १४ जणांना
कोविडची बाधा झाली आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ६ हजार ७२३ एवढी झाली आहे.
//************//
No comments:
Post a Comment