आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
दिनांक १ मार्च २०२१
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी आज कोविड लसीची पहिली मात्रा घेतली. आजपासून ६० वर्षांवरील नागरीकांसाठी
लसीकरणाला सुरुवात झाली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत पंतप्रधानांनी भारत बायोटेकची
कोवॅक्सिन लस घेतली. त्यानंतर त्यांनी ट्विट संदेशाद्वारे, जे नागरिक पात्र आहेत त्यांनी लसीकरण
करून घ्यावं, एकत्र
आपण भारतास कोरोना मुक्त करू, असं आवाहन केलं. आपल्या चिकित्सक आणि वैज्ञानिकांनी ज्याप्रकारे
कोरोना युद्धात कार्य केलं, ते उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
राज्य
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होईल. तत्पूर्वी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुतळ्याला अभिवादन केलं आहे.
****
वस्तू आणि सेवा
कर -जीएसटीआर- नऊ आणि जीएसटीआर- नऊ सी वार्षिक आयकर विवरण पत्र भरण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी हे विवरणपत्र भरण्यासाठी
२८ फेब्रुवारी ही मुदत होती, ती आता ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानं
जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.
****
मराठवाड्यात काल
नव्या ६३९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली,
तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या दोन, बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश
आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात
२५६ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९०, लातूर ८६, जालना ७९, बीड ४३, परभणी ३३, हिंगोली ५१, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २० नवे रुग्ण आढळून आले.
****
राष्ट्रीय जंतनाशक
मोहीम एक मार्च ते आठ मार्च या कालावधीत राबवण्यात येणार असून, लातूर जिल्ह्यातल्या चार लाख ७९ हजार
९२० मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेमध्ये एक ते १९ वर्षे वयोगटातल्या
सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन, त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं,
पोषण स्थिती, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावणं हा
या मोहिमेचा उद्देश आहे.
****
No comments:
Post a Comment