Monday, 5 April 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०५ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात आजपासून ३० एप्रिलपर्यंत रात्रीची टाळेबंदी लावण्यात येत असून, सप्ताहांत पूर्ण टाळेबंदी लावली जाणार आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत आता दररोज रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत सगळे व्यवहार बंद राहणार आहेत. दर शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण टाळेबंदी असेल. या सप्ताहांत टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा तसंच वाहतुक वगळता सर्व व्यवहार बंद राहतील.

३० एप्रिल पर्यंत उद्योग तसंच उत्पादन क्षेत्रं, वृत्तपत्र छपाई आणि वितरण, ई कॉमर्स सेवा सुरू राहतील. लग्न सोहळ्यासाठी ५० जणांना तर अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी राहील, शेती, शेतीविषयक कामं आणि शेतमालाची वाहतूक सुरु राहणार, किराणा, औषधी, भाजीपाला आदी अत्यावश्यक वस्तुंची दुकानं सुरु राहणार आहेत. 

या काळात प्रार्थना स्थळं, मनोरंजन स्थळं, चित्रपट गृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, केश कर्तनालयं, ब्यूटी पार्लर्स, स्पा, क्रीडा संकुलं, जलतरण तलाव पूर्णपणे बंद राहतील. उपाहारगृहं पूर्णपणे बंद राहतील, घरपोहोच सेवा मात्र सुरू राहणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवण्या बंद राहतील, केवळ दहावी आणि बारावीच्या परिक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असं या आदेशात म्हटलं आहे.

****

मराठवाड्यात काल नव्या पाच हजार २९२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३०, नांदेड जिल्ह्यातल्या २७, लातूर दहा, परभणी आठ, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार, तर हिंगोली जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ५०८ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार १८६, लातूर ६८५, जालना ५६७, परभणी ५२२, बीड ४८६, उस्मानाबाद २५२, तर हिंगोली जिल्ह्यात ८८ नवे रुग्ण आढळून आले.

****

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांची संख्या २२ झाली आहे. तर ३० जवान जखमी झाले आहेत. सुकमा आणि विजापूर जिल्ह्याच्या सीमेवर जगरगुंडा भागात हा हल्ला झाला असून, काल या भागात १७ बेपत्ता जवानांचे मृतदेह सापडले. नक्षल्यांनी ७०० जवानांना घेरुन हल्ला केला, जवळपास तीन तास चाललेल्या या चकमकीत १५ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलं. 

****

No comments:

Post a Comment