Friday, 16 April 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १६ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१६ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदी संदर्भातली चिंता दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी जनजागृती करावी, असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. यासाठी एक हेल्पलाईन नंबर तयार करुन नागरीकांच्या समस्यांचं निराकरण करावं, असंही केंद्रानं सांगितलं आहे.

****

वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत असलेले सर्व संरक्षित स्मारकं, स्थळं आणि संग्रहालयं १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली.

****

केंद्र सरकारने वैद्यकीय पद्व्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट-पीजी 2021 परीक्षा देखील पुढे ढकलली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल समुहमाध्यमातून याबाबत माहिती दिली.

****

परभणी जिल्ह्यातल्या सर्व बॅंका, किराणा सामान दुकानं, भाजी बाजार, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य वस्तुंसह सर्व प्रकारची दुकानं, उद्या १७ तारखेपासून येत्या २२ तारखेपर्यंत बंद राहणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नव्यानं प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.

****

औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं जम्बो कोविड लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून, काल या मोहिमेत तीन हजार ३१६ जणांना लस देण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या ११५ वार्डात दोन हजार ९४८, शासकीय लसीकरण केंद्रांवर २७८ आणि खाजगी दवाखान्यात ९० जणांनी लस घेतल्याचं, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कळवलं आहे.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ५९६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९१ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३२९ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार २२८, लातूर एक हजार ६६३, बीड ९६३, उस्मानाबाद ७६४, जालना ७०२, परभणी सहाशे शहॅत्तर, तर हिंगोली जिल्ह्यात २७१ नवे रुग्ण आढळून आले.

****

औरंगाबाद शहरातल्या सिद्धार्थ उद्यानातल्या भक्ती वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचाही काल रात्री मृत्यू झाला. गेल्या ३ तारखेला या वाघिणीनं दोन पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता.

//*******//

 

No comments:

Post a Comment