Sunday, 18 April 2021

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१८ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात देशात २ लाख ६१ हजार ५०० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४२३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ८६ पूर्णांक ६२ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात १ हजार  ५०१ रुग्ण या संसर्गानं मरण पावले असून मृत्यू दर १ पूर्णांक २० शतांश टक्के झाला आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत १२ कोटी २६ लाख ५९० लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.

****

स्त्री शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी जीवन समर्पित करणारे थोर समाज सुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज जयंती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी ट्विट संदेशाद्वारे त्यांना अभिवादन केलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक सर्व नियमांचं पालन करत ६८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. येत्या २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

****

लातूर शहरातल्या जुने गुळ मार्केट परिसरात भरणारा भाजीबाजार आजपासून कडबा मार्केट इथं भरवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. या बाजारात खरेदीसाठी येणारे नागरिक मास्कचा वापर तसंच शारीरिक अंतराच्या नियमाचं पालन करत आहेत की नाही याची पाहणी करावी. आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश पालिका आयुक्तांनी बाजार समितीच्या सचिवांना दिल्या आहेत.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मधुकर श्रीरंग जाधव यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. कर्करोगानं आजारी असलेले जाधव यांच्यावर शहरातल्या हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

नांदेडच्या संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव शिंदे वापटीकर यांचं काल निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. वापटीकर यांनी ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालये सुरू करून  विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचं मोलाचं काम केलं आहे.

//***************//

 

No comments:

Post a Comment