Thursday, 1 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.

****

** राज्यातल्या राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या कामांसाठी दोन हजार ७८० कोटी रुपयांचा निधी जाहीर

** देशात सहा कोटी ४३ लाख नागरिकांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण

** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे १७ रुग्णांचा मृत्यू तर बीडमध्ये संसर्गाचे नवे  ३९३ रुग्ण

आणि

** अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यासंदर्भातला आदेश सरकारकडून रद्द

****

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या कामांसाठी, दोन हजार ७८० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली. जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग `७५३ जे` च्या विस्तारीकरणासाठी, २५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी, १८८ कोटी ६९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, हा पूल राष्ट्रीय महामार्ग ६३ चा भाग असेल. तसंच राष्ट्रीय महामार्ग `३६१ एफ`च्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी, २२२ कोटी ४४ लाख रुपये, आणि राष्ट्रीय महामार्ग ७५२ वर जालना परभणी दरम्यान वाटूर ते चारठाणा रस्त्याच्या दुहेरीकरणासाठी २२८ कोटी मंजूर करण्यात आले असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

देशात आतापर्यंत सहा कोटी ४३ लाख नागरिकांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं आहे. देशव्यापी लसीकरणाच्या ७५ व्या दिवशी काल तेरा लाख चार हजार ४१२ जणांचं लसीकरण करण्यात आलं. दरम्यान, देशात काल नव्या ७२ हजार ३३० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४५९ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी २२ लाख २१ हजार ६६५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ६२ हजार ९२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ४० हजार ३८२ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत एक कोटी १४ लाख ७४ हजार ६८३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या पाच लाख ८४ हजार ५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्समधल्या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राला भेट दिली आणि लसीची पहिली मात्रा घेऊन देशव्यापी लसीकरण कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लस घेतली. ही लस पुर्णपणे सुरक्षीत असून नागरिकांनी सरकारच्या निर्देशानुसार लसीकरण मोहीमेत सहभागी होऊन या संसर्गविरोधातल्या लढाईला अधिक बळ द्यावं असं आवाहन निलंगेकर यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या १७ कोविड बाधित रुग्णांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामध्ये नऊ पुरुष आणि आठ महिला रुग्णांचा समावेश आहे. यात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आत एक हजार ६८७ झाली आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज ८६ नवे रुग्ण दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ८२ हजार ७६५ झाली आहे.

****

बीड जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ३९३ रुग्ण आढळले. यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक १२७ रुग्ण, अंबाजोगाई ६५, आष्टी ४५, माजलगाव आणि परळी प्रत्येकी ३४, केज ३३, पाटोदा २६, गेवराई ११, शिरुर पाच आणि धारुर इथल्या चार रुग्णांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता २५ हजार ८९७ झाली आहे.

****

अभिनय क्षेत्रातला सर्वाधिक प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रसिद्ध सिने अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकार आणि पुरस्कार समितीच्या सदस्यांचं आभार मानले आहे. आपल्या प्रवासात सहभागी असणाऱ्या सर्वांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे यावर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या संदर्भातली घोषणा केली. रजनीकांत यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं असल्याचं, जावडेकर यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांचं या पुरस्काराबद्दल अभिनंदन केलं आहे.

****

केंद्र सरकारानं येत्या १४ तारखेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसा आदेश केंद्रीय आस्थापना मंत्रालायनं जारी केला आहे. १४ एप्रिलला केंद्र सरकारच्या सर्व कार्यांलयांबरोबरच देशभरातल्या औद्योगिक आस्थापनाही बंद राहतील, असं या आदेशात म्हटलं आहे.

****

ृदयावरील शस्त्रक्रियेनंतर आता आपली प्रकृती चांगली असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे त्यांनी त्यांच्या तब्ब्येतीची माहिती दिली आहे. चिकित्सक तसंच सुश्रुषा करणाऱ्यांचं तसंच त्यांना शुभेच्छा देणाऱ्याचं आभारही राष्ट्रपतींनी मानलं आहे.   

****

अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यासंदर्भातला आदेश सरकारनं रद्द केला आहे. अल्प बचत योजनांवरचा व्याजदर मार्च २०२१ च्या स्तरावर कायम राहील असं अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. २०२०- २०२१ च्या शेवटच्या तिमाहीतले व्याजदर तसेच राहतील असं त्यांनी म्हटलं आहे. हा निर्णय अल्पावधीत फिरवण्यात आल्यामुळे विरोधी पक्षांच्या टीकेचं लक्ष्य बनला आहे. बचत खात्यांच्या व्याजदरातील कपात मागं घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय 'एप्रिल फूल' पण असू शकतो, या शब्दांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावर टीका केली आहे. व्याजदर कपातीचा निर्णय नजरचुकीनं घेण्यात आलेला नसून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय मागं घेण्यात आला असावा. निवडणूक संपल्यावर कदाचित आज मागं घेतलेला निर्णय पुन्हा लागू केला जाऊ शकतो, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार प्रत्येकवेळी देशातल्या जनतेची थट्टा करत आलं असल्यामुळे यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीनं घेतले गेले असावेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

****

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातली `सिटीस्कॅन` यंत्रणा त्वरीत सुरु करावी तसंच खाजगी कोवीड रुग्णालयांना तसंच `सिटीस्कॅन` आणि `एक्स-रे` सेवा देणाऱ्या रुग्णालयांना राज्य शासनाच्या निर्देशानुसार शुल्क आकारणी तसंच रुग्णालयाच्या दर्शनी भागांवर दरपत्रक लावणं बंधनकारक करावं अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी आज एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली. दरम्यान, परभणी जिल्ह्या लावण्यात आलेली संचारबंदी तत्काळ रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे. जिंतूर-सेलू मतदार संघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

****

नांदेड-पनवेल-नांदेड विशेष रेल्वेगाडीच्या आजपासून ८ एप्रिल पर्यंतच्या १४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोविड संसर्गाच्या काळात रेमडेसीवीर नावाच्या इंजेक्शनची औषधी दुकानदारांनी कृत्रिम टंचाई निर्माण केली आसून याचा काळाबाजार सुरू असल्याची तक्रार आहे. या औषधी दुकानदारांवर प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे.

****

असंघटित कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात येत्या पाच तारखेला आरोग्य मंत्री, कामगार मंत्री आणि परिवहन मंत्री तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनां बरोबर बैठक घेणार असल्याची माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत दिली. कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या झपाट्यानं वाढायला लागल्यामुळे पुन्हा अनेक असंघटित कामगारांच्या मनात गावी जाण्याचे विचार सुरू झाले असल्याने त्यावर आवश्यकतेनुसार उपाय योजन्यासंदर्भात ही बैठक घेतली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

//********//

 

No comments:

Post a Comment