Saturday, 10 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** राजकीय व्यक्तींच्या घरपोच कोविड लसीकरणाची मुंबई उच्च न्यायालयाकडून गांभीर्यानं दखल

** राज्यात पेयजल टंचाई निवारणार्थ कार्यान्वयीत उपाययोजनांना मुदत वाढ

** ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक तु. शं. कुलकर्णी यांचं आज नांदेड इथं वार्धक्यामुळे निधन

आणि

** केंद्रीय पथकाकडून उस्मानाबाद तसंच परभणी जिल्ह्यात कोविड स्थितीचा आढावा

****

काही राजकीय व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन कोविड लसीकरण केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं गांभीर्यानं दखल घेतली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शय्येला खिळलेले रुग्ण यांच्यासाठी अद्याप घरपोच लसीकरण सुविधा उपलब्ध नसताना काही राजकीय नेत्यांना मात्र या सेवेचा लाभ मिळतो, अशा आशयाची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली, त्यावर झालेल्या सुनावणीत, न्यायालयानं याबाबत नापसंती दर्शवली. राष्ट्रपती आणि पंप्रधान, जर लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेत असतील, तर राज्यातले राजकारणी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत का, असा प्रश्न मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या पीठानं विचारला.  राज्य सरकारच्या संबंधित विभागानं या प्रकाराची गांभीर्यानं दखल घ्यावी, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. लसीकरणाचं धोरण हे सर्वांसाठी एकसारखंच असायला हवं, केवळ राजकीय नेत्यांसाठी फारकत केली जात असेल, तर त्यामुळे समाजात अत्यंत चुकीचा संदेश जात आहे, असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं.

****

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य शासनाच्या टाळेबंदीच्या निर्णयाविरोधात आज आंदोलन केलं. शहरातल्या पोवाईनाका इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर खासदार भोसले यांनी भीक मागा आंदोलन केलं. चिन वाझे प्रकरणासह इतर अनेक मुद्यांवरून त्यांनी राज्यसरकारवर टीका केली. या आंदोलनादरम्यान जमा झालेली साडेचारशे रुपये रक्कम, खासदार भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली.

****

राज्यात पिण्यासाठीच्या पाणी टंचाई निवारणार्थ कार्यान्वयीत उपाययोजनांना मुदत वाढ देण्यात आल्याचं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगीतलं आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, नळ योजना, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती इत्यादी उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचा कालावधी शिथील करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या कामांकता येत्या ३० एप्रिल पर्यंत मंजूरी देण्यात आली आहे. टंचाई कालावधीत याचा उपयोग होण्याच्या दृष्टीनं सदर कामं येत्या ३१ मेपर्यंत पूर्ण करणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. 

****

प्रसिद्ध साहित्यिक प्रेमानंद गज्वी यांनी नागरिकांना कोविड संसर्गापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे.

गेले वर्षभर आपण कोरोनाने अत्यंत हैरान झालेलो आहोत. तेव्हा आपली सगळ्यांचीच एक मोठी जबाबदारी आहे. सरकार तर प्रयत्न करतेच, पण आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले आणि सरकार ज्या पध्दतीने आपल्याला सांगतं त्या पध्दतीने आपण जर वागलो, तर आपल्या जिवनात आलेला हा कोरोनाचा आजार लवकरात लवकर आपल्या जिवनातून हद्दपार होईल. तेव्हा नियमीतपणे मास्क लावा, हात स्वच्छ करा आणि कोरोनाच्या बरोबर आपली लढाई चालू ठेवा.

****

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येत्या १४ एप्रिल रोजी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कुठेही गर्दी न करता, घरा-घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं आवाहन, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. कोरोनाला रोखण्याच्या शासकीय नियमावलीचं पालन करावं, असं मुंडे म्हणाले. मुंबई इथं चैत्यभूमीतून मुख्य अभिवादन कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपणही होणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं

****

ख्खन चा ताज म्हणून प्रसिध्द असलेल्या औरंगाबाद इथल्या बीबी-का-मकबरा परिसरात पर्यटकांसाठी 'ध्वनी आणि प्रकाश' कार्यक्रमाच्या सादरीकरणासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची सूचना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आमदार अंबादास दानवे यांनी यासंदर्भात आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यासाठी अंदाजपत्रकासह आवश्यक प्रस्ताव त्काळ सादर करण्याचे आदेश निर्गमित झाले आहेत.

****

ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक तु. शं. कुलकर्णी यांचं आज नांदेड इथं वार्धक्यामुळे निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन महाविद्यालयातून मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले तुशं यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचं तसंच मराठवाडा साहित्य परिषदेच्या संमेलनाचं अध्यक्षपद भुषवलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान या मासिकाचे संपादक म्हणून ही त्यांनी काम पाहिलं. त्यांचे "तृणाची वेदना’, ‘ग्रीष्मरेखा’, ‘अखेरच्या वळणावर’ हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता’ या ग्रंथाचं त्यांनी साहित्य अकादमीसाठी संपादन केलं आहे. मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार समितीचे सदस्य, नव लेखकांना अनुदान देणाऱ्या साहित्य संकृती मंडळाचे तज्ज्ञ परीक्षक, राज्य नाट्य प्रयोग परीक्षक, राज्य साहित्य आणि संकृती मंडळाचे सदस्य अशा विविध जबाबादाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या होत्या. साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना, मसापचा जीवन गौरव पुरस्कार तसंच नांदेड जिल्हा परिषदेच्या नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या देहदानाच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह, डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुपूर्द करण्यात आला.

****

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव इथले साहित्यिक प्रदीप पाटील कामरसपल्लीकर यांच आज सकाळी नांदेड इथं निधन झालं. ते ५० वर्षांचे होते. रुग्णालयात त्यांच्यावर कोविडसाठीचे उपचार सुरु होते. पाटील यांचा 'गावकळा' हा कथासंग्रह, 'गावगोठा' ही कादंबरी, तसंच 'संदर्भ शोधतांना' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहाला 'प्रसाद बन वाङमय पुरस्कार' ही मिळाला होता. प्रदीप  पाटील यांनी एका दैनिकासाठी अनेक वर्ष वार्ताहर म्हणूनही काम केलं असून त्यांना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.

****

दिवंगत शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांना आज ऑनलाईन श्रद्धांजली सभेत अभिवादन करण्यात आलं. नेरळकर गुरुजींचे सहकारी तसंच शिष्यांनी यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज १२ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ११ रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत तर एक रुग्ण बीड जिल्ह्यातल्या खायगाव इथला आहे. मृत रुग्णांमध्ये ८ पुरुष आणि ४ महिला रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज सकाळी घाटी रुग्णालयात कोविड संसर्ग झालेले नवे ९८ रुग्ण दाखल झाले.

****

बीड जिल्ह्यात आज ७६४ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक १४३ रुग्ण अंबाजोगाई तालुक्यातले असून, बीड तालुक्यात १४१, आष्टी १२३, केज ७१, माजलगाव ७३, गेवराई ६०, परळी ५९, धारूर २९, शिरुर २६, पाटोदा २५, आणि वडवणी इथल्या १४ रुग्णांचा समावेश आहे.

****

केंद्रीय पथकान आज उस्मानाबाद इथं भेट देऊन कोविड स्थितीचा आढावा घेतला. शहरातल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांशी चर्चा करून या पथकानं कोविड बाधितांवर उपचार पद्धतींची माहिती घेतली. रुग्णालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्राणवायू प्रकल्पाची पाहणी केली. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधपथकान आशा स्वयंसेविकाकडून लसीकरण जनजागृतीची माहिती घेतली. उस्मानाबाद शहरातल्या प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन, या पथकानं विलगीकरणाअसलेल्या नागरिकांवर उपचाराचीही माहिती घेत, आवश्यक सूचना केल्या.

****

परभणी जिल्ह्यात केंद्रीय पाहणी पथकाने आज परभणी तालुक्यात पिंगळी इथं आरोग्य केंद्राला भेट देऊन कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना तसंच लसीकरण कार्यक्रमाची माहिती घेतली. या ठिकाणी केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर पथकाने समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजली आनेराव यांनी या पथकाला ग्रामीण भागात आरोग्य संस्थांमधलं अपुऱ्या मनुष्यबळाबाबत माहिती देत याविषयी पाठपुरावा करण्याची विनंती केली.

****

नांदेड इथं महापालिकेच्या कोविड तपासणी केंद्रांवर आज अनेक कोविड संशयीत रुग्णांना तपासणीविनाच घरी परतावं लागलं. आर.टी.पी.सी.आर. तपासणीसाठी आवश्यक असलेल्या किट संपल्यामुळे या नागरिकांना घशातल्या स्रावाचे नमुने देता आले नाहीत, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं  आहे.

****

बीड जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्यानं, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केलेल्या रक्तदान शिबिरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिजाऊ प्रतिष्ठान आणि मित्र मंडळाच्या ६५ जणांनी रक्तदान केलं. शासकीय आणि खाजगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता आहे. त्यामुळे सामाजिक संघटनासह इतरांनी या रक्तदान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

//*********//

 

 

 

No comments:

Post a Comment