Tuesday, 13 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** कोविड लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी परदेशात विकसित लसींच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारची परवानगी

**  रेमडीसिवीर औषध काळ्या बाजारात विकणाऱ्या तीन जणांना आज पहाटे धुळे इथं अटक

** औरंगाबाद इथं आज ११ कोविडग्रस्तांचा मृत्यू; तर बीड जिल्ह्यात आज नवे एक हजार १८ रुग्ण

आणि

** राज्यात गुढीपाडव्याचा सण सर्वत्र शांततेत आणि उत्साहात साजरा

 

****

 

 

कोविड लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकारने परदेशात विकसित लसींच्या आपात्कालीन वापराला परवानगी दिली आहे. कोविड लसीकरणासंदर्भात स्थापन विशेषज्ञांच्या राष्ट्रीय समूहाने या लसींचा वापर करण्याची शिफारस केली आहे. जागतिक आरोग्य संघटना - डब्ल्यू एच ओ ने या लसींचा त्यांच्या आपत्कालीन वापराच्या लसींच्या यादीत समावेश केलेला आहे. भारतात सर्वप्रथम या लसी शंभर जणांच्या समूहाला देण्यात याव्यात, त्या सर्वांवर आठवडाभर निगराणी ठेवावी, त्यानंतरच देशात सर्वत्र या लसी देण्यात याव्यात, असं या समूहाने म्हटलं आहे.

****

कोविड उपचारासाठी वापरात येणारे रेमडीसिवीर औषध काळ्या बाजारात विकणाऱ्या तीन जणांना आज पहाटे धुळे इथं अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. ही टोळी ग्राहकांना सोळा हजार रुपयांना एक याप्रमाणे या औषधाची विक्री करत होती. रेमडीसीवीर औषध, रोख रक्कम, एक मोबाईल असा एकूण ३८ हजार ८९९ रूपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.

****

राज्याला केंद्र सरकारकडून कोविड लसींचा पुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज धुळे तालुक्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर कॉंग्रेसच्या वतीनं केंद्र शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी तालुका कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा या मागणीचं निवेदन सादर केलं.

****

बुलडाणा जिल्हयात खामगाव तालुक्यात कोविड लसीकरण सध्या थांबवण्यात आलं आहे. कोविड लसीच्या सर्व मात्रा संपल्यामुळे लसीकरण मोहीम थांबवल्याचं, जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत कोविड लसीच्या २४ हजार मात्रा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर या मात्रांचं सर्वच केंद्रावर वितरण केले जाईल, आणि त्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू होईल, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या सर्व ११५ प्रभागात आज कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु होती. उद्याही यासर्व ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली आहे. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना केाविड लस देण्यात यावी यासाठी महापालिकेच्या वतीनं जम्बो कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु केलेली आहे.

****

बीड जिल्ह्यात आज एक हजार १८ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक २४३ रुग्ण अंबाजोगाई इथं त्याखालोखाल बीड २१६, परळी १४०, केज ११९, आष्टी ९८, पाटोदा ५६, गेवराई ५०, माजलगाव ३४, शिरुर २० आणि वडवणी इथल्या १४ रुग्णांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज ११ कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये सात पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता दोन हजार १५ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधित रुग्णांची संख्या एक लाख १८४ झाली आहे.

****

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते वीरा साथीदार यांचं आज नागपुरात निधन झालं. त्यांच्यावर नागपुरातल्या एम्स रुग्णालयात कोविडवर उपचार सुरू होते. चळवळीत सक्रीय असलेले विरा साथीदार यांनी कोर्ट चित्रपटात अभिनय केला होता. या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट या श्रेणीत धडक मारली होती.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उदारमतवादी विचारांचं, मानवतावादी शिकवणींचं पालन करुन देश हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण त्यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन, इतर मागास बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. आंबेडकर यांची जयंती लोकांनी गर्दी न करता, शांतता आणि संयम ठेवून आपापल्या घरातच साजरी करावी असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे.

****

नागपूरच्या दीक्षाभूमी इथं भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी केली जाणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ सुधीर फुलझेले यांनी दिली. उद्या सकाळी ९ वाजता समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धांना माल्यार्पण करून बुद्ध वंदना होईल. या कार्यक्रमाला मोजक्या संख्येत भिक्षूसंघ आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं फुलझेले यांनी सांगितलं.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या मुख्य प्रशासकीय इमारतीत उद्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्णाकृती तैलचित्र लावण्यात येणार आहे. विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तथा ज्येष्ठ चित्रकार प्राध्यापक दिलीप बडे यांनी हे तैलचित्र रेखाटले आहे. शाहीर वामन दादा कर्डक यांनी रचलेल्या गीतांच्या 'गीत भीमायन' या ध्वनिफितीचं विमोचनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते उद्या ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या माळशेंद्रा इथं जिल्हा प्रशासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात ६० जणांनी रक्तदान केलं.

****

राज्यात गुढीपाडव्याचा सण सर्वत्र शांततेत आणि उत्साहात साजरा झाला. नागरिकांनी आपापल्या घरी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियमांच पालन करत सण पारंपरिक पद्धतीनं मात्र साधेपणानं साजरा केला. औरंगाबाद जिल्ह्यात श्री क्षेत्र पैठण इथं मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत तीर्थस्तंभ परिसरात नगराध्यक्ष शेखर पाटील यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

****

नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातल्या स्वप्नील रौदळ या सैनिकाचा आज पहाटे जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर इथं मृत्यू झाला. आज पहाटे प्रशिक्षण सुरू असताना बंकरला आग लागून स्वप्नील यांचा त्यात मृत्यू झाला. स्वप्नील यांच्या भाक्षी या गावी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, गावातल्या एकाही घरावर गुढी उभारली गेली नाही, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड शहरातल्या नंदीग्राम गृहनिर्माण सोसायटीतून जिल्हा पोलिस गुन्हे शाखेच्या पथकानं आज एक गावठी पिस्तूल आणि चार काडतूस जप्त केली. या सोसायटीत राहणाऱ्या गोविंदसिंघ हरिसिंघ पुजारी याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई करत, त्याला अटक केली.

****

टुरिस्ट टॅक्सी चालकांनी वाहन घेण्यासाठी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते थांबवण्याची मागणी औरंगाबाद इथल्या जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना आज सादर केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय हळणोर यांनी दिली. औरंगाबाद जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, समुद्रे किनारे कोविड प्रार्दुभावामुळे बंद करण्यात आली आहेत. टुरिस्ट टॅक्सीचा व्यवसाय हा पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे टॅक्सीचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे वाहनांच्या कर्जांचे हफ्ते भरणे शक्य नाही. परिस्थिती पर्वपदावर येई पर्यंत कर्जांच्या हफ्त्यांना स्थगिती देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे.

****

राज्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड उपचार केंद्र सुरू केल्यास प्रत्येक जिल्ह्यात कोविड रूग्णांना तीन हजार खाटा उपलब्ध होतील, अशी सूचना नांदेड इथले सामाजिक कार्यकर्ते दिपक मोरताळे यांनी केली. मोरताळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला ही सूचना ईमेलव्दारे पाठवली आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य विभागाचे सरासरी एक हजार आरोग्य कर्मचारी उपलब्ध असल्याचंही मोरताळे यांनी म्हटलं आहे.

//*************//

 

No comments:

Post a Comment