Wednesday, 14 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

** औरंगाबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान तसंच अभियांत्रिकी शाखेच्या पदवी परीक्षाही दोन मे पर्यंत स्थगित

** काळाबाजार रोखण्यासाठी सरकार शासकीय रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवणार तर खाजगी रुग्णालयांना अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रणाखाली पुरवठा 

** औरंगाबादमध्ये आज १७ कोविड बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

आणि

** भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर आदरांजली

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सी बी एस ईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत आगामी महिन्यात होणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेशी संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला. सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीच्या प्रकोपाचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे, असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या तारखा १ जून रोजी साथीच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर निश्चित करण्यात येतील. परीक्षेच्या तारखांबाबत १५ दिवस अगोदर विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दहावीच्या परीक्षा मात्र रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी मंडळ निकष निश्चित करणार आहे. या निकषानुसार लावण्यात आलेल्या निकालाबाबत समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना कोविड परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाईल, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. कोविड-१९ च्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं मंडळानं म्हटलं आहे.

****

औरंगाबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान तसंच अभियांत्रिकी शाखेच्या पदवी परीक्षा दोन मे पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. तसंच इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षाही २७ एप्रिल ऐवजी पाच मे पासून सुरू होणार आहे. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश परीक्षा विभागाला दिले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उर्वरित परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीनं द्यावी, असं आवाहन परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील यांनी केलं आहे.

****

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये म्हणून सरकारनं उपाययोजना केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. जालन्यात खासगी कोविड रुग्णालयांना दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचं आज त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. हाफकीन कंपनीमार्फत राज्य सरकार इंजेक्शनची खरेदी करुन शासकीय रुग्णालयांना पुरवठा करणार आहे तसंच खाजगी रुग्णालयांना पुरवण्यात येणाऱ्या इंजेक्शनवर अन्न आणि औषध जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण राहील, असं स्पष्ट करतांना ते म्हणाले.

जे रेमडेसिवीर काही दिवसांपुर्वी खुप जास्त ब्लॅक मार्केटींगच्या पध्दतीने होत असायचं त्याच्यावर आता एफडीए आणि कलेक्टरचा कंट्रोल राहील. रेट्स वर कंट्रोल राहील. त्यामुळे चौदाशे पंधराशेच्या आतमध्येच रेमडेसिवीर विकल्या जाणार आहे. कंपनी तर देणार नाहीच, परंतू चुकीच्या पध्दतीने स्टॉकींग करुन ब्लॅक मार्केटींग करण्याचं काम आज कुठल्याही ट्रेडर्सनी करु नये. कंपनी आणि गव्हर्नमेंट, कंपनी आणि कलेक्टर एवढाच विषय राहिलेला आहे. स्टॉकिस्ट हा फक्त कलेक्टरच्या नियंत्रणाखाली काम करणारी एक व्यवस्था राहिलेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, ही एक कमतरता निर्माण झाली होती. ती कमतरता निश्चितप्रकारे या सिस्टीममुळे निघून जाईल.

 

राज्यात सध्या प्राण वायुच्या सिलेंडर्सचा तुटवडा असून जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं येत्या १५ दिवसांत हवेतील प्राण वायू शोषून घेणारा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर संपूर्ण राज्यात असे प्रकल्प उभारले जातील, यामुळे जल प्राण वायुला नवा पर्याय मिळेल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात सध्या जावणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शन आणि कृत्रिम प्राणवायूच्या टंचाई संदर्भात खासदार सुभाष भामरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांची भेट घेतली. यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी भामरे यांनी केली. येत्या तीन ते चार दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात रेमडीसिवीर औषधाचा पुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार थांबवण्यासाठी धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी भरारी पथक नेमलं आहे. रुग्णालयातल्या या औषधाच्या साठ्यावर दैनंदिन नियंत्रण या पथकातर्फे ठेवलं जाणार आहे.

****

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय- घाटीत आज १७ कोविड बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये १४ रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत तर जालना, नांदेड आणि जळगाव इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता दोन हजार ३९ झाली आहे. दरम्यान, घाटीत आज ९९ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख एक हजार ६३५ झाली आहे.

****

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश आदरांजली वाहत आहे.  

मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.

नागपूरमध्ये दीक्षाभूमी इथं असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई आणि सचिव सुधीर फुलझेले यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात आली, तसंच स्तुपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला देखील अभिवादन करण्यात आलं आणि बुद्ध वंदना घेण्यात आली.

****

औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मुख्य प्रशासकीय इमारतीत लावण्यात आलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसंच 'गीत भीमायन' ध्वनिफितीचं विमोचन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले.....

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेण अत्यंत महत्वाचं आहे. हे खरं असलं तरी बाबासाहेब समजणे तितके सोपे सुध्दा नाही. आणि म्हणुनच त्यांचा काही इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद अद्यापही आपल्याला करता आलेला नाही. म्हणून सर्व सामान्य जनतेला बाबासाहेब समजून सांगण्यासाठी कवी, लेखक व साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे.

****

जालना जिल्ह्यात पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी मस्तगड इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नांदेडच्या महापौर मोहिनी येवनकर, आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर, यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या धाराशिव इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहराच्या काही भागात, शेंद्रा, कुंभेफळ, करमाड तसंच लाडगाव परिसरात आज हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जालना जिल्ह्यात राजूरसह परिसरात काही वेळ मेघगर्जनेसह पाऊस झाला. नाशिक तसंच धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक स्वरूपात पाऊस झाला.

****

 

No comments:

Post a Comment