Thursday, 15 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** कोरोना विषाणू संसर्गाला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मुख्यमंत्र्याची पंतप्रधानांना विनंती

** रेमडेसिवीरचा पुरवठा लवकरच सुरळीत होईल - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही

** बीडमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ९६३ रुग्ण तर औरंगाबादमध्ये १५ रुग्णांचा मृत्यू

आणि

** संसर्ग रोखण्यासाठी औरंगाबाद, जालन्यासह राज्यभर कडक संचारबंदी सुरू

****

राज्यातल्या प्राणवायू तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे त्याची वाहतूक करण्याविषयी तसच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब आणि दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिल आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत असून रुग्ण मोठ्या संख्येन आढळत आहेत. ३० एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या अकरा लाख नव्वद हजारांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे. आज राज्यात १२०० मेट्रिक टन उत्पादनापेक्षा अधिक प्राणवायूची गरज आहे. एप्रिल अखेरपर्यंत प्राणवायूची मागणी दिवसाला दोन हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते. कोविड संसर्ग हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावा तसच टाळेबंदीच्या काळात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातल्या शिधापत्रिका धारकांना प्रति प्रौढ व्यक्ती दररोज १०० रुपये आणि मुलांना प्रत्येकी ६० रुपये दररोज असे सानुग्रह अर्थसहाय करायला राज्य सरकारला परवानगी द्यावी अशी विनंतीही या पत्राद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधील केंद्राच्या वाट्याचा पहिला हप्ता देखील लगेच मिळावा, अनेक लघू उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांच्याकडून पहिल्या तिमाहीत कर्जाचे हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात अस मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे. लहान व्यापारी आणि उद्योग अडचणीत आहेत त्यामुळे मार्च एप्रिलची वस्तू आणि सेवा कर परतावा मुदत आणखी तीन महिने वाढवून मिळावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे.

****

येत्या दोन ते तीन दिवसात रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होईल, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत कोरोना विषाणू संसर्गा संदर्भात स्थापन कृती दलाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. राज्यातल्या १५ निर्यातदारांकडे रेमडेसिवीर उपलब्ध असून निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रेमडेसिवीर आवश्यक रुग्णांनाच द्यावं, असे निर्देशही सर्व रुग्णालयांना देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पाच राज्यांतून प्राणवायू आणण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली असून मोठ्या टँकरमधून लवकरच हा प्राणवायू राज्यात आणला जाईल. तसंच प्रत्येक जिल्ह्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयात प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं ते म्हणाले. काही दिवस प्राणवायू वापराचं नियोजन करायला सर्व जिल्हा प्रशासनांना सांगण्यात आलं आहे, अशी माहितीही टोपे यांनी यावेळी दिली.

****

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित  देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल असं देशमुख यांनी सांगितलं.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात या आठवड्यात सुरू झालेल्या परीक्षा राज्यशासनानं टाळेबंदीचा निर्णय घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  पाच मे नंतर या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर करून त्यानुसार पुढील परीक्षा घेण्यात येतील असं विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे संचालक डॉक्टर वसंत भोसले यांनी आज सांगितलं आहे.

****

बीड जिल्ह्यात आज ९६३ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण अंबाजोगाई २३०, बीड १६७, आष्टी ११६, केज १०६, माजलगाव ७०, परळी ६९, पाटोदा ५९, गेवराई ४९, शिरुर ४३, वडवणी २९ आणि धारुर इथल्या २५ रुग्णांचा समावेश आहे.

****

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल रुग्णालय - घाटीत आज १५ कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये एक रुग्ण नाशिक जिल्ह्यातला आहे. औरंगाबाद जिल्हयात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता दोन हजार ६६ झाली आहे. घाटीत आज ४८ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख तीन हजार २९२ झाली आहे.

****

संपूर्ण राज्यात लागू संचारबंदी अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातल्या सर्व बाजारपेठा बंद होत्या. सकाळी नागरिकांची वर्दळ दिसून आली. मात्र, दुपारनंतर पोलिसांनी बंदोबस्त अधिक कडक करत बाहेर पडलेल्या नागरिकांची तपासणी करुन विनाकारण बाहेर पडलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्यानं रस्त्यांवर शुकशुकाट पाहण्यास मिळाला. जालना शहरातही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकानं बंद राहिली. नागरिकांची रस्त्यावरील वर्दळ मात्र दिवसभर सुरूच होती. पोलिस प्रशासनानं घरातच थांबण्याचं आवाहन करूनही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं आढळून आलं तर काही ठिकाणी पोलिसांनी अडथळे उभारून अकारण फिरणाऱ्यांना रोखलं. नवीमुंबईतही कडक संचारबंदी पाळण्यात आली. धुळ्यात पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागला. 

****

राज्यात काल कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक तीन लाख ५७ हजार १२३ मात्रा देण्यात आल्या. राज्यात आतापर्यंत एक कोटी अकरा लाख ३३ हजाराहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. मुंबईत सर्वाधिक अठरा लाख तर पुण्यात पंधरा लाख ७७ हजार जणांना मात्रा देण्यात आल्या आहेत. काल मुंबईत ४६ हजार ३१९ पात्र नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं तर पुण्यात ५४ हजार ४२५ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पक्ष प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात गेल्या बारा तारखेला त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी दोन दिवस रुग्णालयात विश्रांती घेतल्याचंही मलिक म्हणाले.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या हिंदी विभागातले प्राध्यापक, साहित्यिक डॉ. संजय माणिकराव नवले यांचं आज पहाटे औरंगाबादमध्ये निधन झाल. ते ५५ वर्षांचे होते. कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाल्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं. डॉ. नवले हे गेल्या ३० वर्षापासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. विद्यापीठाच्या युवक महोत्सव सल्लागार समितीचे सदस्य, महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी ४६ ग्रंथांचं लेखन संपादन केलं आहे. विद्यापीठातर्फे डॉ.संजय नवले यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उद्या सकाळी साडे अकरा वाजता `ऑनलाईन` शोकसभा ठेवण्यात आल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे.   

****

जालना मुंबई जनशताब्दी विशेष रेल्वे १७ एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

****

नागरिकांनी कोविडच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःसह कुटुंबाला सुरक्षित ठेवावं असं आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे.

परभणी मधल्या लोहगाव  ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेल्या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमात आज ते बोलत होते.  गावातील आशाताई, अंगणवाडीताई, शिक्षक, आरोग्य सेवक आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना लसीकरणात सहभागी करून घेण्याच्या सूचना टाकसाळे यांनी यावेळी दिल्या.

****

बीड जिल्ह्यात अनेक भागांत काल विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या अवकाळी गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर फळबागा, भाजीपाला, अंबा, तसच धान्याच नुकसान झालं आहे.

//*********//

 

 

No comments:

Post a Comment