Friday, 16 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 April 2021 Time 7.10AM to 7.25AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** प्राणवायुची हवाईमार्गे वाहतूक करण्यास तसंच कोविड साथीला नैसर्गिक आपत्ती घोषित रण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी

** येत्या दोन ते तीन दिवसात रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा सुरळीत होईल - आरोग्यमंत्री राजेश टोपे

** परभणी जिल्ह्यात उद्यापासून २२ तारखेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने, भाजीपाला, आणि खाद्य पदार्थ विक्री बंद ठेवण्याचे आदेश

** कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद

** राज्यात ६१ हजार ६९५ कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ९१ जणांचा मृत्यू तर सात हजार ५९६ बाधित

** महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसंच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या तर आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द

आणि

** `प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न` योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचं वाटप करण्यास, केंद्र सरकारची परवानगी

****

राज्यात निर्माण झालेल्या प्राण वायुच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, देशाच्या अन्य भागातून प्राणवायुची हवाईमार्गे वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, तसंच कोविड साथीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, अशी मागणी करणारी पत्रं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली आहेत. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. येत्या ३० एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या अकरा लाख नव्वद हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यात बाराशे मेट्रिक टन उत्पादनापेक्षा अधिक प्राणवायूची गरज आहे. एप्रिल अखेरपर्यंत प्राणवायूची मागणी प्रतिदिन दोन हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते, ही बाब लक्षात घेता, अन्य राज्यातून प्राण वायू आणावा लागणार आहे. हा प्राण वायू रस्ते मार्गाऐवजी हवाई मार्गानं आणण्याची व्यवस्था करण्यात यावी, असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे. कोविड विषाणू संसर्गाला नैसर्गिक आपत्ती घोषित केल्यास, टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून, अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातल्या शिधापत्रिका धारकांना प्रति प्रौढ व्यक्ती दररोज १०० रुपये आणि मुलांना प्रत्येकी ६० रुपये सानुग्रह मदत देता येईल. अशी मदत देण्यास राज्य सरकारला परवानगी देण्याची मागणीही, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

औषधांच्या निर्यातदारांना कायमस्वरूपी परवाने द्यावेत जेणे करून ते रेमडीसीवीर औषध स्थानिक बाजारपेठेत विकू शकतील, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत लघु उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांकडून कर्जाचे हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात, तसंच मार्च एप्रिलची वस्तु आणि सेवा कर-जीएसटी परतावा मुदत आणखी तीन महिने वाढवून मिळावी, आदी मागण्याही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

****

येत्या दोन ते तीन दिवसात रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा सुरळीत होईल, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत कोरोना विषाणू संसर्गा संदर्भात स्थापन कृती दलाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. राज्यातल्या १५ निर्यातदारांकडे रेमडेसिवीर उपलब्ध असून, निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा झाली असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं. रेमडेसिवीर आवश्यक रुग्णांनाच द्यावं, असे निर्देशही सर्व रुग्णालयांना देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. काही दिवस प्राणवायू वापराचं नियोजन करायला सर्व जिल्हा प्रशासनांना सांगण्यात आलं आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

****

राज्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीचं पालन करण्याचं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

ते म्हणाले.....

माझी सर्व नागरिकांना विनंती ही आहे की, हे जे निर्बंध आहेत. हे निर्बंध कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेले आहे. म्हणून याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच सहकार्य मिळण हे फार आवश्यक आहे. पोलीस दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत की, आपण या सर्व नियमांच कोटेकोर कसं पालन होईल, या संदर्भामध्ये काळजी घ्या. माझ्या पोलीस बांधवाना सांगू इच्छितो, आपल्या हातात अधिकार जरी असला तरी त्याचा अतिरेक होणार नाही अशा संवेदनशिलपणानं आपण नागरिकांशी वागावं.

****

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश नव्यानं जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बॅंका, किराणा सामान दुकानं, भाजी बाजार,फळ विक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य वस्तुंसह सर्व प्रकारची दुकानं, उद्या १७ तारखेपासून येत्या २२ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल दिले आहेत. अत्यावश्यक सेवेशी निगडित असलेली कार्यालयं, तसंच कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक कामाशी संबंधित अधिकारी - कर्मचारी आणि त्यांची कार्यालयं वगळता,परभणी जिल्ह्यातली सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, ही १७ ते २३ एप्रिल दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी जारी केले.

****

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्यात लागू संचारबंदीच्या काल पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईत अनेक बाजारपेठा सुरु होत्या, तसंच लोकल आणि बस मध्येही नागरीकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. ठाणे, पुणे, अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्येही नागरीकांनी संचारबंदी पाळली नाही, रस्त्यांवर गर्दी कायम होती. 

****

औरंगाबाद जिल्ह्यात यासंचारबंदीला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला. शहरातल्या सर्व बाजारपेठा बंद होत्या. सकाळी नागरिकांची वर्दळ दिसून आली. मात्र, दुपारनंतर पोलिसांनी बंदोबस्त अधिक कडक करत, बाहेर पडलेल्या नागरिकांची तपासणी करुन, विनाकारण बाहेर पडलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्यानं, रस्त्यांवर शुकशुकाट पाहण्यास मिळाला.

जालना शहरातही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकानं बंद राहिली. नागरिकांची रस्त्यावरची वर्दळ मात्र दिवसभर सुरूच होती. पोलिस प्रशासनानं घरातच थांबण्याचं आवाहन करूनही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं आढळून आलं, तर काही ठिकाणी पोलिसांनी अडथळे उभारून अकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.

****

नांदेड जिल्ह्यात संचारबंदीला काल पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात अनेक ठिकाणी पार्सल घरी नेण्याच्या नावावर सायंकाळी स्विट्स मार्ट, किराणा दुकान, हॉटेल्स, भाजीपाला मार्केट या सर्वच ठिकाणी गर्दी झाली होती. तर रिक्षा, दुचाकी, चार चाकी वाहनं बिनदिक्कतपणे रस्त्यावर धावत होते. 

दरम्यान, नांदेड शहरातल्या जुना मोंढा भागातली जीवनावश्यक वस्तुंची दुकानं, सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळात सुरू राहतील, असं व्यापारी संघटनेनं जाहीर केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संचारबंदीच्या निर्देशांचं पालन न करणाऱ्या आस्थापना तसंच नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, तसंच दंडात्मक कारवाई करण्यात येईल, सं ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितलं आहे. काल नियम न पाळणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, विनामास्क फिरणाऱ्या १९३ नागरिकांकडून, २६ हजार ८०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला असल्याचं, पाटील यांनी सांगितलं.

****

राज्यात काल ६१ हजार ६९५ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३ लाख ३९ हजार ८५५ झाली आहे. काल ३४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, हजार १५३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६ शतांश टक्के झाला आहे. काल ५३ हजार ३३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २९ लाख ५९ हजार ०५६ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख २० हजार ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ५९६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९१ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २३, नांदेड जिल्ह्यातल्या १९, लातूर १८, परभणी १२, जालना दहा, बीड पाच, तर हिंगोली जिल्ह्यातल्या चार रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३२९ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार २२८, लातूर एक हजार ६६३, बीड ९६३, उस्मानाबाद ७६४, जालना ७०२, परभणी सहाशे शहॅत्तर, तर हिंगोली जिल्ह्यात २७१ नवे रुग्ण आढळून आले.

****

गृह विलगीकरणात असलेले कोविड रुग्ण पाच ते सात दिवसात घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्याचं, औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय - घाटीच्या अधिष्ठाता, डॉक्टर कानन येळीकर यांनी म्हटलं आहे. गृह विलगीकरणात असलेल्या कोवीड रुग्णांनी १४ ते १७ दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात येवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या……

होम आयसोलेशन घेतल्यानंतर काय होत की, यांना त्रास काहीच नसतो पण ते पॉझिटिव्ह असतात. मग एक आठवडा झाला की, माणूस कंटाळतो आणि शेवटी तो कधीतरी मास्क लावून घराच्याबाहेर पडतो. मग दोन दिवसांनी म्हणतो, नाही आता मास्कची पण आता गरज नाही. मला काही त्रास नाही. आणि कधी तो नकळत घराच्या बाहेर पडतो आणि कामाला लागतो. हे १४ ते १५ दिवस आपण इंफेक्टीव्ह आहेत. आपला हा आजार दुसऱ्याला लागू शकतो. हे विसरुन जाता कामा नये, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे पुर्ण आयसोलेशनचा जो कालावधी आहे. तो दोन आठवड्यांचा आहे. हा आजार पसरु नये, आणि स्वत:लाही होऊ नये, आणि आपल्या पासून दुसऱ्यांना होऊ नये याची काळजी घेण गरजेचं आहे.

****

बीड शहरात रेमडेसीवीर इंजेक्शन जास्त किमतीत विकणाराऱ्या औषधी दुकानांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बीड शहरातल्या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये असलेल्या औषधी दुकानात हे इंजेक्शन पाच हजार ४०० रुपयांना विक्री केलं जात असल्याची तक्रार, बीड जिल्हा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी संतोष सोहनी यांनी दाखल केली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

नांदेड इथं उभारण्यात येत असलेल्या जंबो कोविड सेंटरची काल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाहणी केली. सुमारे २०० खाटांच्या या जंबो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन तसंच बायपेप व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध असणार आहे. 

****

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून, परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल, असं देशमुख यांनी सांगितलं.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात या आठवड्यात सुरू झालेल्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पाच मे नंतर या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे संचालक, डॉक्टर वसंत भोसले यांनी काल सांगितलं.

****

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ - आयबीनेही दहावीच्या परिक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती आणि अधिक तपशील जाणून घेण्यासाठी संबंधित शाळांशी चर्चा करावी, असं मंडळानं सांगितलं आहे.

****

`प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न` योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचं वाटप करण्यास, केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे, त्यानुसार शिल्लक डाळीचं लाभार्थ्यांना लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती, अन्न, नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचं वाटप केलं नसल्यानं, त्या खराब झाल्याबाबतचं वृत्त वृत्तपत्र तसंच अन्य सामाजिक संपर्क माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल बोलत होते. निर्देशाला अनुसरून राज्यात शिल्लक सहा हजार ४४२ मेट्रीक टन डाळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत वितरित करण्यात येणार आहे.

****

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार काल संपला. या निवडणुकीसाठी उद्या मतदान, तर दोन मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

****

जालना- मुंबई जनशताब्दी विशेष रेल्वे उद्या १७ एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.  

****

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या हिंदी विभागातले प्राध्यापक, साहित्यिक डॉ. संजय नवले यांचं काल पहाटे औरंगाबादमध्ये निधन झालं, ते ५५ वर्षांचे होते. कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाल्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्यांचं निधन झालं. विद्यापीठाच्या युवक महोत्सव सल्लागार समितीचे सदस्य, तसंच महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे संचालक म्हणूनही, ते कार्यरत होते. त्यांनी ४६ ग्रंथांचं लेखन संपादन केलं आहे. त्यांच्या पार्थीव देहावर काल संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचं काल हैदराबाद इथं निधन झालं, ते ५३ वर्षांचे होते. पूर्वी शिवसेनेत असलेले कौडगे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेत प्रवेश केला होता.

****

नागरिकांनी कोविडच्या परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन स्वतःसह कुटुंबाला सुरक्षित ठेवावं असं आवाहन, परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे. परभणी मधल्या लोहगाव ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेल्या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमात, ते काल बोलत होते. गावातल्या आशाताई, अंगणवाडीताई, शिक्षक, आरोग्य सेवक आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना लसीकरणात सहभागी करून घेण्याच्या सूचना, टाकसाळे यांनी यावेळी दिल्या.

//***********//

 

No comments:

Post a Comment