Monday, 19 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** द्रवरुप प्राणवायू वाहतुकीसाठी रेल्वेची तयारी पूर्ण; प्राणवायू वाहतुकीसाठी एसटीही तयार

** मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधली मदत पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

** राज्यात औद्योगिक क्षेत्रातलं पहिलं कोविड लसीकरण  तसंच आरटीपीसीआर चाचणी केंद्र नाशिक औद्योगिक वसाहतीत सुरू

आणि

** हिंगोली इथं युध्दपातळीवर प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याची पालकमंत्र्यांची सूचना

****

कोविडग्रस्तांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या द्रवरुप वैद्यकीय प्राणवायूची वाहतूक करण्यासाठी रेल्वेची तयारी पूर्ण झाली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं कळवलं आहे. मालगाड्यांवर टँकर ठेवून 'रो रो' सेवेच्या माध्यमातून ही वाहतूक केली जाईल. मुंबईत कळंबोली स्थानकातून रिकामे टँकर मालगाड्यांवर चढवले जातील आणि तिथून पुढे ते जमशेदपूर, रौरकेला आणि बोकारो इथं पाठवले जातील. राज्यातून परिवहन महामंडळाच्या वतीनं टँकर वाहतुकीचं नियोजन केलं जात असून, कळंबोली इथं १ हजार ६१८ टँकर आणले असल्याचंही रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

****

प्राणवायूच्या वाहतुकीसाठी एसटी अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळही तयार असल्याचं, परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. प्राणवायूच्या वाहतुकीसाठी एसटीचे चालक सज्ज आहेत. गरज असलेल्या ठिकाणी ग्रीन कॉरिडॉर्स तयार करून, प्राणवायूचा प्राधान्यानं पुरवठा केला जाईल, असं परब यांनी सांगितलं.

****

कोविड निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटींच्या पॅकेजमधली मदत पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अंतर्गत सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, मोफत शिवभोजन थाळी, सामाजिक न्याय विभागाच्या ३५ लाख, आणि आदिवासी विभागाच्या १२ लाख लाभार्थ्यांना आगाऊ मदतीचं तात्काळ वितरण, बांधकाम क्षेत्रातले नोंदणीकृत कामगार, घरगुती कामगार, राज्यातील फेरीवाले, रिक्षाचालक यांच्यासह विविध समाजघटकांसाठी जाहीर केलेल्या मदतीचा निधी तात्काळ वितरित करण्यात येणार आहे.

****

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, हे तपासण्यासाठी घरातल्या घरात सहा मिनिटं चालण्याची चाचणी करण्यावर आरोग्य विभागानं भर दिला आहे.  त्याबाबत नागरिकांचं प्रबोधन करावं, असं आवाहन आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी केलं आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटं चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं.

****

राज्यातलं औद्योगिक क्षेत्रातलं पहिलं कोविड लसीकरण केंद्रं तसंच आरटीपीसीआर चाचणी केंद्र आज नाशिक औद्योगिक वसाहतीत सुरू झालं. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे या केंद्राचं उद्धाटन करण्यात आलं. कामगारांच्या लसीकरण मोहिमेसाठी औद्योगिक क्षेत्र स्वतःहून पुढे येत आहे, ही बाब भूषणावह असल्याचं भुजबळ म्हणाले. कोरोना विरुद्धच्या लढाईत आता फक्त सरकारवर अवलंबून न राहता सर्वच क्षेत्रातील सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्रातील मंडळींनी पुढे आलं पाहिजे, असं भुजबळ यांनी नमूद केलं. अर्थचक्र चालू ठेवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातल्या सर्व कामगारांचं लसीकरण होण्याची गरजही भुजबळ यांनी व्यक्त केली.

****

हिंगोली इथं युध्दपातळीवर प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याची सूचना पालकमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिल्या आहेत. या शिवाय पालकमंत्र्यांनी प्राणवायू सुविधा असलेल्या रुग्ण खाटा, सामान्य रुग्णखाटा, रेमडेसीवीर औषध पुरवठा तसंच व्हेंटीलेटची संख्या वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. जिल्ह्यात वाढती कोविड रुग्ण संख्या पाहता, प्राणवायू प्रकल्प उभारण्याची मागणी खासदार राजीव सातव यांनी केली होती.

****

लातूर महानगरपालिकेच्या वतीनं पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मुलांच्या वसतिगृहात कोविड समर्पित सुश्रुषा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रात  प्राणवायू सुविधा असलेल्या ९० रुग्णखाटा तसंच २०० अलगीकरन रुग्णखाटा उपलब्ध आहेत. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांची या केंद्राच्या सुकाणू अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

परभणी तालुक्यातील झरी तसंच पिंगळी इथं कोविड सुश्रुषा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. झरी इथं नियोजित  कोविड केंद्राच्या जागेची पाहाणी आमदार पाटील यांनी केली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी शहरांमधून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी परतत  असल्यामुळे ग्रामीण भागातही कोविडचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी, झरी तसंच पिंगळी इथं कोविड केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. शहरातल्या कोविड रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा या केंद्रात पुरवण्यात येतील, असं राहुल पाटील यांनी सांगितलं.

****

नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांना कोविड प्रतिबंधासाठी नियम पाळण्याचं, तसंच कोविड लस घेण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनाची महामारी विशेषत: ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात फैलावतेय. तेव्हा सर्व जनतेने मास्क वापरणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे, साबणाने स्वच्छ हात धुणे आणि नियमाचं कोटेकोरपणानं पालन करणे या बाबीची जर काळजी घेतली तर निश्चित कोरोना महामारी कमी होण्याला मदत होणार आहे. माझी आपल्याला दुसरी एक विनंती अशी राहणार आहे की, ४५ वर्षाच्या वरच्या नागरिकांना लस उपलब्ध आहे. ही लस सर्वांनी घ्यावी. मी स्वत: लसीचे दोन डोस घेतले आहे. त्याच्यामुळे कुठलाही त्रास होत नाही. जनतेला माझी हात जोडून विनंती राहणार आहे, की नियमांचं कोटेकोरपणानं पालन करा आणि कोरोनाला संपवण्यासाठी सहकार्य करा.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सर्व रुग्णालयांनी प्राणवायूचा सुयोग्य वापर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. ते आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात द्रवरुप प्राणवायूचा पुरेसा साठा आहे, मात्र भविष्यातील परिस्थितीचा विचार करुन नियोजन करणं आवश्यक असल्याचं केंद्रेकर म्हणाले. सर्वच कोविडग्रस्तांवर उपचारासाठी प्राणवायूची आवश्यकता नसते, गरज असणाऱ्या रुग्णांनांच प्राणवायू लावण्यात यावा, प्राणवायूची गळती होऊ देऊ नये, आदी सूचनाही केंद्रेकर यांनी केल्या.

****

बीड जिल्ह्यात आज एक हजार १२१ नवे कोविड बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये सर्वाधिक २१२ रुग्ण हे अंबाजोगाई इथले आहेत. त्याखालोखाल आष्टी १९८, बीड १६१, परळी १२५, गेवराई १०१, केज ८७, माजलगाव ६४, धारुर ५७, पाटोदा ५१, शिरुर ३७ आणि वडवणी इथल्या २८ रुग्णांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज २७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये १९ रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यातील असून जालना जिल्ह्यातल्या तीन, बीड दोन आणि अहमदनगर, बुलढाणा तसंच जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता दोन हजार १७५ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख ९ हजार ११२ झाली आहे.

****

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या दिग्दर्शक सुमित्रा भावे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सुमित्रा भावे यांनी सामाजिक कार्यकर्ता आणि संवेदनशील दिग्दर्शक म्हणून केलेलं काम या दोन्ही क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनीही भावे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. एका प्रयोगशील दिग्दर्शिकेला आपण मुकलो आहोत, अशी भावना अमित देशमुख यांनी व्यक्त केली. कर्करोगानं आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं, त्या ७८ वर्षांच्या होत्या.

****

 

No comments:

Post a Comment