Saturday, 3 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.

****

** पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात वर्गोन्नती देण्याचा राज्य शासनाचा निर्णय  

** बीड जिल्ह्यात नवे ४३४ कोविड रुग्ण; औरंगाबाद इथं ९ कोविडग्रस्तांचा मृत्यू

** भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावात दोन दिवस स्वयंस्फुर्तीने जनता संचारबंदी

आणि

** सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला सुरवात

****

राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना २०२०-२१ या चालू शैक्षणिक वर्षात वर्गोन्नती देण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. सर्व विद्यार्थ्यांचं वार्षिक मूल्यमापन न करता त्यांना उत्तीर्ण केलं जाणार आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं हा निर्णय घेतला आहे. त्या म्हणाल्या....  

राज्यामधले जे विद्यार्थी आहेत जे पहिली ते आठवीचे विद्यार्थी आहेत. शिक्षण हक्क अधिकारांच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट जे आहे, त्यांना पास करुन त्यांना पुढच्या वर्गामध्ये पाठवण्या संदर्भामधला निर्णय हा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही आज घेत आहोत. आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की, आपण विविध मार्गातून मुलांना शिक्षण देण्याच प्रयत्न या मधल्या काळामध्ये करण्याचं काम केलं. परंतु पहिले ते आठवीचे विद्यार्थी आहेत त्यांची वर्गोन्नती करण्याचा आ‍पण या ठिकाणी निर्णय घेतला आहे.

 

इयत्ता ९ वी तसंच ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही लवकरच असा निर्णय घेण्याचे संकेत गायकवाड यांनी दिले. विद्यार्थ्याना वर्गोन्नती देत असताना त्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत निर्गमित करण्यात येतील, असं गायकवाड यांनी सांगितलं.

****

दरम्यान, २०२१-२२ या आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कुठलीही कपात न करण्याचा निर्णय, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतला आहे. गेल्या वर्षी अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेल्या प्रकरणांचा तसंच विषयांचा नव्या वर्षात समावेश करण्यात आला आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षात या इयत्तांचा ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी असेल. या कालावधीत पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी आहे, आरोग्य सेवा तसंच इतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना ५० टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरू राहतील. या काळात जिल्ह्यातले सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

****

बीड जिल्ह्यात आज नवे ४३४ कोविड रुग्ण आढळले, यामध्ये अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक ११२ रुग्ण आढळले असून, त्या खालोखाल बीड तालुक्यात ९५, आष्टी ६३, परळी ५४, माजलगाव ३०, पाटोदा २३, केज २२, गेवराई १३, शिरुर १२, वडवणी ६, तर धारूर तालुक्यातल्या ४ रुग्णांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज ९ कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये सहा पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे. दरम्यान घाटी रुग्णालयात आज सकाळपर्यंत ७३ नवे कोविडग्रस्त दाखल झाले. रुग्णालयाकडून जारी पत्रकात ही माहिती देण्यात आली.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात सप्ताहांत टाळेबंदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. औरंगाबाद शहरातली बहुतांश दुकानं बंद दिसून आली. रस्त्यावर वाहतुकही तुरळक स्वरुपात होती. जिल्ह्यात आज आणि उद्या पूर्ण टाळेबंदी लागू राहणार असून, रात्रीच्या संचारबंदीची वेळ वाढवण्यात आली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत रात्री आठ वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी असेल.

****

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यानं काही गावं स्वयंस्फूर्तीनं बंद पाळत आहेत. भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावात आजपासून दोन दिवस जनता संचारबंदी पाळण्यात येत असल्यानं रस्त्यांवर, बाजारात शुकशुकाट होता. घनसावंगी तालुक्यातल्या वालसावंगी इथं दोन दिवसांपासून पुकारण्यात आलेल्या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पुण्यात बंदच्या दरम्यान बससेवा चालू ठेवण्यात यावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनी आज आंदोलन केलं, यावेळी पोलिसांनी बापट यांना ताब्यात घेतलं. वाढत्या कोविड संसर्गामुळे पुण्यात पुढील सात दिवस सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे

****

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचं आज नाशिक इथं कोविड संसर्गामुळे निधन झालं. देशपांडे यांनी विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशकं भरीव कार्य केलं आहे. देशपांडे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे.

****

राज्यात काल एका दिवसात ३ लाख २८ हजारहून अधिक लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. राज्यात आतापर्यंत ७० लाख लोकांना कोविडची लस देण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोविड लसीकरण होणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे.

****

ख्रिस्ती धर्मियांचा येशूच्या पुनरुत्थानाचा सण ईस्टर संडे उद्या साजरा होत आहे. यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या कठीण काळात येशू ख्रिस्तांचा मानवता, प्रेम, दया, क्षमा आणि त्यागाचा संदेश सर्वांकरताच मार्गदर्शक असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना पुढील सात दिवस घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचं पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

****

कोविड संकटाच्या काळात आणि देशव्यापी टाळेबंदीत रेल्वे विभागाचे कार्य अत्यंत अभिमानास्पद, संतोषजनक आणि कृतज्ञतेस पात्र असल्याचं, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. एका पत्रातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सगळं जग एकाच जागी थांबलेलं असताना, रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. या काळात ४ हजार ६२१ श्रमिक विशेष गाड्यांच्या माध्यमातून ६३ लाखांहून जास्त प्रवाशांना त्यांच्या गावाकडे पोहोचवण्यात आलं. सुरक्षा आणि पायाभूत सोयीविषयक ३७० महत्त्वाची कामं पूर्ण केली. ‘किसानरेल्वे’च्या माध्यमातून शेतमालासह १ हजार २३३ दशलक्ष टन मालवाहतूक केली. ६ हजार १५ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालं, अशी माहिती गोयल यांनी या पत्रात दिली आहे.

****

केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या कामाला प्रत्यक्ष १५ मार्चपासून सुरवात झाली आहे. या ५४ किलोमीटरच्या मार्गातील सर्वेक्षण पूर्ण झालं असून, ज्या ठिकाणी रेखांकन पूर्ण झालेलं आहे, अशा ठिकाणी भूसंपादन केलं जात असल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं. किती गावातल्या किती नागरिकांच्या जमिनी संपादित केल्या जाणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. या रेल्वे मार्गासाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

****

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सीजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, मृताच्या नातेवाईकांनी आज पहाटे रुग्णालयात गोंधळ घालत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. सारी वार्डात दाखल या रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृत्यू झाल्याचं, डॉक्टरांनी सांगितलं. मात्र रुग्णाचे नातेवाईक अधिक संतप्त झाल्यानं, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

धुळे जिल्हा रुग्णालयातील कोविड सुश्रुषा केंद्राची जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आज पाहणी केली. अतिरिक्त खाटांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करून रुग्णांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. कोरोना विषाणूची लक्षणं दिसताच तपासणी करून वेळेत औषधोपचार करून घ्या, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.

****

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या कोठडीत राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या विशेष न्यायालयानं ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन कांड्या सापडल्या प्रकरणी वाझे सध्या एनआयएच्या कोठडी आहेत. त्याच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे आज त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं, तेव्हा न्यायालयानं एनआयएच्या मागणीवरुन त्याच्या कोठडीत वाढ केली.

****

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला. श्रीधर आत्राम असं या ५५ वर्षीय पुरुषाचं नाव असून, जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेला असतांना वाघाने त्याच्यावर हल्ला केला. सिंदेवाही तालुक्यात आज पहाटे ही घटना घडली.

//********//

 

 

No comments:

Post a Comment