Monday, 5 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 April 2021 Time 7.10AM to 7.25AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ० एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      राज्य सरकारची कोरोना विषाणू संसर्गाविरोधात ‘ब्रेक द चेन’ मोहिम, आजपासून ३० एप्रिलपर्यंत रात्रीची टाळेबंदी, सप्ताहांत पूर्ण टाळेबंदी.

·      प्रार्थना स्थळं, मनोरंजन स्थळं, चित्रपट गृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, केश कर्तनालयं, ब्यूटी पार्लर्स, स्पा, क्रीडा संकुलं, जलतरण तलाव पूर्णपणे बंदच; उपाहारगृहही बंद- मात्र घरपोहोच सेवा सुरू.

·      शाळा, महाविद्यालयं आणि खासगी शिकवण्या बंद- दहावी - बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार.

·      राज्यात ५७ हजार ७४ नवे कोविड रुग्ण, मराठवाड्यात ८५ जणांचा मृत्यू- पाच हजार २९२ बाधित.

·      परभणी जिल्ह्यात आजपासून सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नियमित व्यवहार सुरू करण्यास परवानगी; बीड आणि नांदेड जिल्ह्यातील टाळेबंदी मागे.

·      नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत.

आणि

·      ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन.

****

कोरोना विषाणू संसर्गाविरोधात ‘ब्रेक द चेन’ मोहिम सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळानं घेतला. या मोहिमेतर्गत राज्यात आजपासून ३० एप्रिलपर्यंत रात्रीची टाळेबंदी लावण्यात येत असून, सप्ताहांत पूर्ण टाळेबंदी लावली जाणार आहे. यानुसार आता दररोज रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत सगळे व्यवहार बंद राहणार आहेत. दर शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण टाळेबंदी असेल. या सप्ताहांत टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा तसंच वाहतुक वगळता सर्व व्यवहार बंद राहतील.

३० एप्रिल पर्यंत उद्योग तसंच उत्पादन क्षेत्रं, वृत्तपत्र छपाई आणि वितरण, ई कॉमर्स सेवा सुरू राहतील. लग्न सोहळ्यासाठी ५० जणांना, तर अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी राहील. शेती, शेतीविषयक कामं आणि शेतमालाची वाहतूक सुरु राहणार. किराणा, औषधी, भाजीपाला आदी अत्यावश्यक वस्तुंची दुकानं सुरु राहणार आहेत. 

या काळात प्रार्थना स्थळं, मनोरंजन स्थळं, चित्रपट गृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, केश कर्तनालयं, ब्यूटी पार्लर्स, स्पा, क्रीडा संकुलं, जलतरण तलाव पूर्णपणे बंद राहतील. उपाहारगृहं पूर्णपणे बंद राहतील, घरपोहोच सेवा मात्र सुरू राहणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवण्या बंद राहतील, केवळ दहावी आणि बारावीच्या परिक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असं या आदेशात म्हटलं आहे.

एखाद्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास, ती इमारत अल्प प्रतिबंधित - मिनि कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात येईल, बाहेरील लोकांना त्या इमारतीत प्रवेश नसेल, तसा फलक इमारतीसमोर लावला जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

 

सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम पद्धतीनं कामकाजाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक विभाग वगळता, शासकीय कार्यालयंही बंद राहणार आहेत. अत्यावश्यक विभाग ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार असून, मंत्रालयासह सर्व कार्यालयात, अभ्यागतांना लसीकरण केलेलं असेल, तरच प्रवेश मिळेल. नियमभंग केल्यास किमान पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते म्हणाले –

कुठलीही मुव्हमेंटस्‍ नाईटला आणि डे टाईमला सुध्दा आपण त्या ठिकाणी जमावबंदी लागू करत आहोत राज्यभरामधे. रात्री आठ वाजेपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत गार्डन्स मधे पूर्ण बंदी राहील. तरीपण डे टाईम्सला गार्डन्स ओपन राहतील. शॉप्स, मार्केटस्‌, मॉल्स या ठिकाणी इसेन्शियल सर्विसेस सोडून हे सर्व बंद राहतील. पब्लिक ट्रान्सपोर्ट हे पूर्ण सुरू राहतील. मग ती बससेवा असेल, रेल्वेसेवा असेल, फ्लाईट सेवा असेल, ऑटो रिक्षा असेल, टॅक्सीज असतील या सगळ्या गोष्टी चालू राहतील. परंतू थोडेफार निर्बंध असेल तो ऑटोरिक्षामधे ड्रायव्हर आणि दोन, टॅक्सीमधे ५० टक्के लोक बसतील अशी, बसेसमधे उभा नाही कुणी राहायचं, बसूनच प्रवास करायला हवा आणि हे जर निर्बंध पाळले नाही तर पाचशे रूपये फाईन आहे. सगळ्या प्राईव्हेट ऑफिसेसला वर्क फ्रॉम होम सूचना देण्यात आलेल्या आहेत.

****

विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवत, नागरिकांनी नियमाचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. लसीकरण मोहिमेचं नियोजन आणि अंमलबजावणीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मदत करतील, असं त्यांनी सांगितलं. कोरोना विषाणुचा नवीन स्ट्रेन का वाढतो आहे, याचा अभ्यास करून काळजी घेण्यासंदर्भात माहिती द्यावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. सरकारनं या काळात वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई थांबवावी, सामान्य नागरिकांना मदत करण्याबाबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

****

दरम्यान, राज्यात संपूर्णपणे टाळेबंदीची वेळ आली, तर दोन दिवसांच्या पूर्वसूचनेनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून, कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीविरोधात एकजुटीनं लढा द्यावा, असं आवाहन पवार यांनी केलं.

****

राज्यातल्या सर्व नागरिकांच्या लसीकरणाची मागणी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू, तसंच त्यासाठीच्या कोविड लसींच्या वाढीव मात्रांची मागणी करू, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. ते काल राज्यातल्या प्रमुख उद्योजकांशी, दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. कोविड काळात उद्योजकांनी गरजेपुरतेच कामगार कारखान्यात बोलवावे, कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. कंत्राटी कामगारांसह अन्य कोणाही कामगाराला कोविड संसर्ग झाला, तर त्याच्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल चित्रपट तसंच दूरचित्रवाणी मालिका निर्माते यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा करून, शासनानं घेतलेल्या निर्णयांच्या पालनात सहकार्य करण्याचं आवाहन केलं.

****

कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणात राज्यानं राष्ट्रीय विक्रम नोंदवला असून, शनिवारी एकाच दिवशी राज्यात चार लाख ६२ हजार नागरिकांनी लसीकरण केलं आहे. राज्यात आतापर्यंत ७३ लाख ४७ हजार ४२९ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल राज्यातल्या जनतेचे आभार मानत, यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीचं कौतुक केलं आहे. लसीकरणाचा हाच वेग कायम राहिल्यास, राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दीष्ट गाठता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

राज्यात काल ५७ हजार ७४ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३० लाख १० हजार ५९७ झाली आहे. काल २२२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५५ हजार ८७८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८६ शतांश टक्के झाला आहे. काल २७ हजार ५०८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २५ लाख २२ हजार ८२३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८३ पूर्णांक ८ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात चार लाख ३० हजार ५०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या पाच हजार २९२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३०, नांदेड जिल्ह्यातल्या २७, लातूर दहा, परभणी आठ, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार, तर हिंगोली जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ५०८ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार १८६, लातूर ६८५, जालना ५६७, परभणी ५२२, बीड ४८६, उस्मानाबाद २५२, तर हिंगोली जिल्ह्यात ८८ नवे रुग्ण आढळून आले.

****

औरंगाबाद महानगरपालिकेने कोविड नियोजनासाठी मायक्रो, मीडियम आणि लार्ज - सुक्ष्म, मध्यम आणि विस्तृत प्रतिबंधित क्षेत्रं निर्धारित केली आहेत. १५ पेक्षा अधिक आणि ५० पेक्षा कमी सक्रीय रुग्ण संख्या असलेला भाग सुक्ष्म, ५० ते १०० सक्रीय रुग्ण असलेला भाग मध्यम तर शंभरपेक्षा अधिक सक्रीय कोविड रुग्ण असलेला भाग विस्तृत प्रतिबंधित क्षेत्र असेल. शहरात असे २६ प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत.

दरम्यान, औरंगाबाद शहरात घरगुती वापरासाठीच्या छोट्या ऑक्सीजन सिलिंडरच्या पुनर्भरणाची सुविधा चार ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातल्या मोंढा नाका, शेंद्रा औद्योगिक वसाहत, वाळूज औद्योगिक वसाहत आणि जाफर दरवाजाजवळ, ही केंद्रं आहेत. औषध विभागाचे सह आयुक्त मि.कृ.काळेश्वरकर यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद शहरात रेमडेसिवीर औषधांचा पुरेसा साठा असल्याचं, विभागाकडून सांगण्यात आलं आहे

****

परभणी जिल्हा प्रशासनाने आजपासून सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व आस्थापनांना नियमित व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सायंकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत मात्र पूर्ण संचारबंदी लागू असेल, असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. राज्य मार्ग परिवहन मंडळाला जिल्हांतर्गत बस वाहतुकीस ५० टक्के क्षमतेनं परवागनी देण्यात आली आहे. जिल्हाबाहेर जाणारी तसंच येणारी एसटी तसंच खासगी वाहतुक मात्र पुढील आदेशापर्यंत बंद असेल.

****

बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात लावलेली टाळेबंदी मागे घेण्यात आली असून, जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. सर्व बाजारपेठा कडक निर्बंधांसह पुन्हा दुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ३६ कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात मागील ११ दिवसांपासून लागू असलेली संचारबंदीही काल मध्यरात्रीपासून उठवण्यात आली आहे. यापुढे राज्य शासनाने लागू केलेले नियम लागू राहणार आहेत.

****

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीनं एकहाती सत्ता मिळवली आहे. यात काँग्रेस १३, राष्ट्रवादी तीन, तर शिवसेनेचा एका मतदारसंघात विजय झाला आहे. भारतीय जनता पक्ष प्रणित खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पॅनलला केवळ चार जागा मिळाल्या. या निवडणुकीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळकर, प्रविण पाटील चिखलीकर, बाबुराव कदम कोढेकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रा.राजेंद्र केशवे, गोविंदराव शिंदे नागेलीकर हे विजयी झाले आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्याची काल सांगता झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनानं फक्त २० मानकऱ्यांच्या उपस्थितीत काला दहीहंडी फोडण्याची परवानगी दिली होती. काल सूर्यास्ताच्या वेळी नाथ समाधी मंदिरात नाथ वंशजाच्या हस्ते काला दही हंडी फोडण्यात आली. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात लागू सप्ताहांत टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात सर्व दुकाने, बाजारपेठा बंद होत्या आणि रस्ते निर्मनुष्य होते.

दरम्यान, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी काल पैठण इथल्या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. तसंच रुग्णालयात उपलब्ध सेवा सुविधांचा आढावा घेतला.

****

जालना जिल्ह्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्यानं, पालकमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानाचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत, गुरु गणेश क्रिकेट क्लबच्या १३ सदस्यांनी मैदानावरून थेट जनकल्याण रक्तपेढीत येत रक्तदान केलं.

****

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं काल मुंबईत राहत्या घरी निधन झालं, त्या ८८ वर्षांच्या होत्या. सोलापुरात जन्मलेल्या शशिकला जवळकर यांनी, १९४७ साली जुगनू या चित्रपटांतून अभिनयाला प्रारंभ केला. १९६२ साली आलेल्या आरती या चित्रपटातून त्यांनी सर्वप्रथम खलनायिकेची भूमिका साकारली. शशिकला यांनी, सुमारे दोनशेहून अधिक चित्रपटांतून खलनायिका तसंच चरित्र भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी काम केलं होतं. आरती तसंच गुमराह चित्रपटातल्या भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. केंद्र सरकारने २००७ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. शशिकला यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीतून दु:ख व्यक्त होत आहे.

****

नांदेड इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार भानुदासराव गणपतराव उर्फ भा.ग. देशपांडे यांचं काल सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. शिक्षण, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले देशपांडे यांनी श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव तसंच कंधारच्या पांचाली शिक्षक पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही योगदान दिलं. साप्ताहिक ‘रणसंग्राम’ या वृत्तपत्राचे ते संपादक होते.

****

नांदेड इथले माजी सरकारी वकील साहेबराव देशमुख तरोडेकर यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. तरोडेकर हे काही काळ नांदेड नगरपालिकेचे नगरसेवक, तसंच शिक्षण, महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती होते.  

****

परभणी जिल्ह्यात जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी काल शहरातल्या कोविड सुश्रुषा केंद्रासह विलगीकरण कक्षांना भेटी देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णांची चौकशी करत, त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

****

औरंगाबाद शहरात वाढता कोविड मृत्यूदर तसंच रुग्णालयांमधून कोविड उपचार आणि इतर नियोजनाबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केली आहे. रुग्णालयांमधून रुग्णांची पिळवणूक होत असल्याचा आरोप केणेकर यांनी केला आहे.

****

No comments:

Post a Comment