Tuesday, 6 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** देशभरात सुरू कोविड लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

** दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा - राज ठाकरे

** औरंगाबाद इथल्या मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष डॉ फातिमा झकेरिया यांचं निधन

आणि

** परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार सुरेश वरपुडकर यांची निवड

****

 

 

 

 

देशात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. राज्यातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज यासंदर्भातल्या आढावा बैठकीत कुंटे बोलत होते.

राज्यात आतापर्यंत ऐंशी लाखांहून जास्त नागरिकांनी लस घेतली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. काल दिवसभरात चार लाख ३० हजार पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. राज्याला आतापर्यंत कोविड लसीच्या एक कोटी सहा लाख  मात्रा प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८८ लाख मात्रांचा वापर झाला आहे. राज्यात लस वाया जाण्याचं प्रमाण तीन टक्के एवढं आहे. कालपर्यंत ८१ लाख २१ हजार ३३२ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.

****

दिलीप वळसे पाटील यांनी आज राज्याच्या गृहमंत्री पदाची सूत्रं स्वीकारली. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही याची काळजी घेऊ असे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं. आगामी काळात विविध सण उत्सव येत असल्यानं, प्रत्येक धर्मियांच्या दृष्टीने हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी आव्हानात्मक परिस्थिती उभी असल्याचंही ते म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग प्रकरणी दिलेल्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या यंदा कोविड पार्श्वभूमीवर रीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, यावं अशी मागणी हाराष्ट्र व निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या मागण्या केल्या असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. दोन ते तीन दिवस विक्रीसाठी दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, टाळेबंदीच्या काळातील विजबिलात सरसकट माफी करावी, शेतकऱ्यांना हमी भाव देण्यात यावा, या मागण्या केल्या असल्याचंही राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. जानेवारी महिन्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चिन्हं दिसत होती. पण, पालिका आणि राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****

औरंगाबाद इथल्या मौलाना आझाद शिक्षण न्यास तसंच संस्थेच्या अध्यक्ष डॉ फातिमा झकेरिया यांचं आज औरंगाबाद इथं निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. ताज मासिकाच्या संपादक म्हणूनही त्या कार्यरत होत्या. टाईम्स ऑफ इंडियासह विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी पत्रकारिता केली होती. ‘साहित्य आणि शिक्षण’ या क्षेत्रातल्या योगदानासाठी २००६ साली त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री सन्मान देऊन गौरवलं होतं. पत्रकारितेतल्या योगदानासाठी १९८३ साली त्यांना सरोजिनी नायडू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. माजी खासदार रफिक झकेरिया यांच्या त्या पत्नी तर जागतिक पातळीवरील नियतकालिक न्यूज वीक चे संपादक फरीद झकेरिया यांच्या त्या आई होत. फातिमा झकेरिया यांच्या निधनानं औरंगाबाद इथं शिक्षण क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये २२ रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत तर जळगाव आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोविड संसर्गानं मृत पावलेल्यांची संख्या आता एक हजार ८३५ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ८९ हजार ९८६ झाली आहे. जिल्ह्यात १५ हजार २७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज ७१६ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. यामध्ये अंबाजोगाई इथले १६१, बीड १३१, आष्टी ९८, परळी ८८, केज ६४, गेवराई ४३, माजलगाव ३४, पाटोदा आणि शिरुर प्रत्येकी ३१ आणि वडवणी तालुक्यातल्या सहा कोविड बाधितांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता २८ हजार ४९१ झाली आहे.

****

नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करण्यासाठी शासनाने २६३ कोटी ११ लाख रुपयांच्या बांधकाम खर्चास मंजुरी दिली आहे. आज या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४३० खाटांचे रुग्णालय असणार आहे.

****

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार सुरेश वरपुडकर यांची तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी गटाकडून दिलेल्या मुदतीत एकही अर्ज न आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी ही बिनविरोध निवडीची घोषणा केली असल्याचं सांगितलं.

****

बुलडाणा शहरात राज्य शासनाच्या वतीनं लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी विरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. व्यापारी बांधवांनीही यावेळी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शनं केली. तसंच दुकानं बंद ठेवून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. सिंदखेडराजा इथं सर्व व्यावसायिकांनी टाळेबंदी विरोधात तहसीलदार तसंच मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं.

****

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल, बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज जारी केले आहेत. केशकर्तनालय, ब्युटीपार्लर बंद ठेवण्याचे याबाबतच आदेशात नमूद आहे. त्याचबरोबर सरकारी कार्यालये, सहकारी संस्था, खाजगी उद्योग, बांधकाम क्षेत्र, कारखाने याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांसाठी नियमावली लागू करण्यात आली असून, आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.

****

नाशिक जिल्ह्यात चांदवड इथल्या एका खासगी कोविड सुश्रुषा केंद्राला आज अचानक आग लागली. या केंद्रात पाच कोविड रुग्ण उपचार घेत होते, त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही, कोविड केंद्राचं मात्र मोठं नुकसान झालं. आज दुपारी हा प्रकार घडला.

****

औरंगाबाद शहरात लहान मोठ्या व्यापारी तसंच व्यावसायिकांना दुकानं चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात केणेकर यांनी, टाळेबंदीला व्यापारी वर्गाचा विरोध असल्याचं सांगितलं. प्रशासनाच्या सर्व नियम आणि अटींचं पालन करून व्यवसाय करण्याचं आश्वासन व्यापारी वर्गाने दिल्याचं, केणेकर यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

मराठी भाषा सुधार मोहिमेअंतर्गत अक्षरभारती संस्थेतर्फे विविध क्रियाशील उपक्रम घेण्यात येणार असल्याचा निर्णय अक्षरभारतीच्या बैठकीत घोण्यात आला. मराठी प्रमाणलेखन पुस्तिका तयार करणे, रस्त्यावरील दुकानांच्या पाट्या, घराची किंवा रस्त्यांची नावे वृत्तपत्रातील, दूरचित्रवाणीवरील जाहिराती या ठिकाणी होणारे अशुद्ध लेखन सुधारण्यासाठी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करणे, शुद्ध मराठी लेखन कार्यशाळा घेणे, प्रज्ञावंतांच्या मुलाखतीचा साहित्य-कला संवाद उपक्रम घेणे यासारखे उपक्रम घेण्यात येणार आहेत. हे सर्व उपक्रम १ एप्रिलपासून ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीत करण्यात येणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी सांगितलं. 

****

अॅथलेटिक्स फेडेरेशन ऑफ इंडियाच्यावतीनं घेण्यात आलेल्या तांत्रिक अधिकारीच्या पंच परीक्षेत औरंगाबादच्या डॉ.पूनम राठोड या उत्तीर्ण झाल्या आहेत. डॉ.पूनम राठोड ह्या अॅथलेटिक्सच्या राष्ट्रीय खेळाडू असून सरस्वती भुवन महाविद्यालयात क्रीडा शिक्षक आहेत. देशभरात ऑनलाइन लेखी आणि प्रात्यक्षिक पद्धतीनं घेण्यात आलेल्या या पंच परीक्षेत औरंगाबादमधून उत्तीर्ण झालेल्या त्या एकमेव विद्यार्थी आहेत.  

***************//

 

 

  

No comments:

Post a Comment