Sunday, 4 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** राज्यात दररोज रात्रीची टाळेबंदी तर सप्ताहांत पूर्ण टाळेबंदीचा राज्य सरकारचा निर्णय

** सर्व नागरिकांच्या लसीकरणाची मागणी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

** ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन

** औरंगाबाद जिल्ह्यात आज १५ कोविड बाधितांचा मृत्यू

आणि

** पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्याची आज सांगता

****

राज्यात उद्यापासून रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची टाळेबंदी लावण्यात येत असून, सप्ताहांत पूर्ण टाळेबंदी लावली जाणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. या काळात उपाहारगृहं पूर्णपणे बंद असतील, घरपोहोच सेवा मात्र सुरू राहणार आहे. सार्वजनिक वाहतुक ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार आहे. दर शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण टाळेबंदी असेल. या सप्ताहांत टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा तसंच वाहतुक वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. विरोधी पक्ष नेत्यांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवल्याची माहिती मलिक यांनी दिली.

****

राज्यातल्या सर्व नागरिकांच्या लसीकरणाची मागणी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू तसेच त्यासाठीच्या कोविड लसींच्या वाढीव मात्रांची मागणी करू, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. ते आज राज्यातल्या प्रमुख उद्योजकांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. कोविड काळात उद्योजकांनी गरजेपुरतेच कामगार कारखान्यात बोलवावे, कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. कंत्राटी कामगारांसह अन्य कोणाही कामगाराला कोविड संसर्ग झाला, तर त्याच्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतांना उद्योग जगताने, शासन आणि मुख्यमंत्र्यांच्यासोबत खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. लसीकरण सुविधा रात्रंदिवस सुरू ठेवावी, कोविड निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी, शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होमच्या सूचना द्याव्यात, अशा सूचनाही उद्योजकांनी या बैठकीत केल्या.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज चित्रपट तसंच दूरचित्रवाणी मालिका निर्माते यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा करून शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करण्याचं आवाहन केलं.

****

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्याने राष्ट्रीय विक्रम नोंदवला असून काल एकाच दिवशी राज्यात ४ लाख ६२ हजार नागरिकांनी लसीकरण केलं आहे. राज्यात आतापर्यंत ७३ लाख ४७ हजार ४२९ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानत, यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीचं कौतुक केलं आहे. लसीकरणाचा हाच वेग कायम राहिल्यास राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्याचं उद्दीष्ट गाठता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

****

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या ८८ वर्षांच्या होत्या. सोलापुरात जन्मलेल्या शशिकला जवळकर यांनी, १९४७ साली जुगनू या चित्रपटांतून अभिनयाला प्रारंभ केला, अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्यानंतर त्यांनी १९६२ साली आलेल्या आरती या चित्रपटातून खलनायिकेची भूमिका साकारली, आणि त्यानंतर अनेक चित्रपटांतून त्यांनी खलनायिकेच्या आणि त्यानंतर चरित्र भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी काम केलं होतं. आरती तसंच गुमराह चित्रपटातल्या भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. केंद्र सरकारने २००७ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. शशिकला यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीतून दु:ख व्यक्त होत आहे.

****

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांची संख्या २२ झाली आहे. सुकमा आणि विजापूर जिल्ह्याच्या सीमेवर जगरगुंडा भागात हा हल्ला झाला. या हल्ल्यात सुमारे २५ सैनिक जखमी झाले होते. यापैकी एक सैनिक अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल तसंच केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह यांच्याशी चर्चा करून, आवश्यक सूचना केल्या आहेत.

****

महामार्गांच्या बांधकामं करारात झाडं लावण्याचा समावेश असतानाही झाडे न लावणाऱ्या कंत्राटदारांची कामाची देयकं रोखण्याचे निर्देश केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी दिले आहेत. झारखंडमधल्या रस्ते विकास कामांचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. झाडं लावण्याच्या कामाचं ई-टॅगिंग करावं, तसंच नोंदी ठेवण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. रस्त्यांच्या, तसंच उड्डाणपुलांच्या कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, दर्जा चांगला नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला परत काम मिळणार नाही, असा इशाराही गडकरी यांनी दिला.

****

औरंगाबाद शहरात घरगुती वापरासाठीच्या छोट्या ऑक्सीजन सिलिंडरच्या पुनर्भरणाची सुविधा चार ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातल्या मोंढा नाका, शेंद्रा औद्योगिक वसाहत, वाळूज औद्योगिक वसाहत आणि जाफर दरवाजाजवळ, ही केंद्रं आहेत. औषध विभागाचे सह आयुक्त मि.कृ.काळेश्वरकर यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद शहरात रेमडेसिवीर औषधांचा पुरेसा साठा असल्याचं, विभागाकडून सांगण्यात आलं आहे

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज १५ कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये ११ पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार ७७३ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ८६ हजार ९८१ झाली असून १५ हजार ३४१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज ४८६ नवे रुग्ण दाखल झाले. यात सर्वाधिक १२० रुग्ण बीड तालुक्यात त्या खालोखाल अंबाजोगाई तालुक्यात १०७ रुग्ण, आष्टी ५७, परळी ४३, माजलगाव ३७, केज ३४, गेवराई ३०, पाटोदा २६, शिरुर १५, वडवणी नऊ आणि धारुर इथल्या आठ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता २७ हजार २०० झाली आहे.

****

पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्याची आज सांगता होत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनानं फक्त २० मानकऱ्यांच्या उपस्थितीत काला दहीहंडी फोडण्याची परवानगी दिली आहे. आता थोड्याच वेळात, सूर्यास्ताच्या वेळी नाथ समाधी मंदिरात नाथ वंशजाच्या हस्ते काला दही हंडी फोडण्यात येईल. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात लागू सप्ताहांत टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात सर्व दुकाने, बाजारपेठा बंद होत्या आणि रस्तेही निर्मनुष्य होते.

 

दरम्यान, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी पैठण इथल्या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. तसंच रुग्णालयात उपलब्ध सेवा सुविधांचा आढावाही घेतला.

****

नांदेड इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार भानुदासराव गणपतराव उर्फ भा.ग. देशपांडे यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. शिक्षण, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले देशपांडे यांनी श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव तसंच कंधारच्या पांचाली शिक्षक पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही योगदान दिलं. साप्ताहिक 'रणसंग्राम' या वृत्तपत्राचे ते संपादक होते.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी आज शहरातल्या कोविड सुश्रुषा केंद्रासह विलीगीकरण कक्षांना भेटी देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णांची चौकशी करत, त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

****

औरंगाबाद शहरात वाढता कोविड मृत्यूदर तसंच रुग्णालयांमधून कोविड उपचार आणि इतर नियोजनाबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केली आहे. रुग्णालयांमधून रुग्णांची पिळवणूक होत असल्याचा आरोप केणेकर यांनी केला आहे.

****

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. या निवडणुकीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळकर, प्रविण पाटील चिखलीकर, बाबुराव कदम कोढेकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रा. राजेंद्र केशवे, गोविंदराव शिंदे नागेलीकर, हे विजयी झाले आहेत.

****

वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी धार्मिक स्थळी जाणं टाळावं, असं आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी केलं आहे. नागरिकांनी व्यक्तिगत भक्तीपेक्षा सामाजिक तसंच राष्ट्रीय भक्तीस प्राधान्य देऊन, गर्दी टाळावी, असं फड यांनी म्हटलं आहे.

//**************//

 

No comments:

Post a Comment