Friday, 2 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

देशभरात आतापर्यंत सहा कोटी ८६ लाख नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं. काल ३६ लाख ७१ हजार नागरिकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. 

राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या कालच्या पहिल्याच दिवशी, तीन हजार २९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून, सुमारे तीन लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. राज्यात काल आतापर्यंतचं सर्वाधिक लसीकरण झालं असून, एकाच दिवशी ५७ हजार जणांना लसीकरण करून, पुणे जिल्हा अग्रेसर राहीला आहे.

आतापर्यंत देशभरात सर्वाधिक सुमारे ६५ लाखांहून नागरिकांना लसीकरण करून, महाराष्ट्रानं पहिल्या क्रमांकात सातत्य राखलं आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी, दररोज तीन लाख नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं असून, दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लस दिली जात आहे.

****

देशात काल ८१ हजार ४६६ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४६९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या, एक कोटी २३ लाख तीन हजार १३१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, एक लाख ६३ हजार ३९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ५० हजार ३५६ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत, एक कोटी १५ लाख २५ हजार ३९ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर, ९३ पूर्णांक ६७ टक्के झाला आहे. देशभरात सध्या सहा लाख १४ हजार ६९६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, केरळ, पंजाब आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांमध्ये, कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ कायम असून, देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या ८० टक्के रुग्ण या सहा राज्यांमधले असल्याचं, आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काकपोरा परिसरात सुरक्षा बल आणि दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत, तीन दहशतवादी मारले गेले. आज सकाळी ही चकमक झाली.

****

आज गुड फ्रायडे. गुड फ्रायडे निमित्त लोक एकमेकांना भेटून मानसिक बळ आणि आनंदासाठी शुभेच्छा देतात. येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या संघर्ष आणि बलिदानाचं स्मरण, हा दिवस करून देतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ट्वीटर संदेशाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुडफ्रायडे निमित्त दिलेल्या संदेशात, येशू ख्रिस्ताच्या दया, क्षमा, शांती, प्रेम, त्यागाच्या संदेशाचं आणि सेवाकार्याचं स्मरण केलं आहे. येशूंची मानवसेवेची शिकवण सर्वांनी आचरणात आणावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

****

रिजर्व बँकेनं ऑनलाईन व्यवहारांसाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी, बँका आणि वित्तीय संस्थांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना आता नवी प्रणाली लागू करण्यासाठी, ३० सप्टेंबरपर्यंत मुदत मिळणार आहे.

****

आक्टोबर महिन्यात कोरोना विषाणूची साथ ओसरु लागल्यानंतर सातत्यानं वाढत असलेल्या औद्योगिक उत्पादनात, मार्च महिन्यातल्या कोरोना विषाणूच्या नव्या उद्रेकानंतर दोन टक्के घट झाली आहे. उत्पादन पूर्वपदावर यायला आता तीन ते सहा महिने किंवा त्याहूनही अधिक काळ लागू शकतो, असं मत असलेल्या उद्योजकांचं प्रमाणही वाढलं असल्याचं, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सनं, पुणे जिल्ह्यातल्या उद्योग क्षेत्रात केलेल्या सर्वेक्षणात आढळून आलं आहे. गेल्यावर्षी मार्च मध्ये कोरोना विषाणूची साथ सूरू झाल्यापासून मराठा चेंबरतर्फे दरमहा हे सर्वेक्षण करण्यात येतं. बाराव्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष काल जाहीर करण्यात आले, त्यानुसार सूक्ष्म आणि लघू उद्योगांना कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका जास्त बसल्याचं दिसतं. ४८ टक्के उद्योगांमध्ये उत्पादन कोरोना पूर्वकाळातल्या उत्पादनाच्या पातळीवर पोहोचलं असलं, तरी ते बहुतांश मोठे उद्योग आहेत. एकंदर औद्योगिक उत्पादन फेब्रुवारीत क्षमतेच्या ८५ टक्के इतकं झालं होतं, ते मार्च मध्ये ८३ टक्क्यांवर आल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

****

फ्लिपकार्ट आणि गीव इंडिया टीमने राज्याच्या आरोग्य विभागाला २८ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती, रजनीशकुमार यांचे आभार मानले आहेत. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना याची नक्की मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

राज्यातल्या साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशृंग देवी गडाच्या परिसरात, मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत असल्यानं, कालपासून पाच दिवसांसाठी देवीचं मंदिर बंद करण्यात आलं आहे. गडाच्या परिसरात जनता संचारबंदी स्वयंस्फूर्तीनं पाळण्यास सुरुवात झाली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथलं मंदिरही सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय, मंदिर व्यवस्थापनानं घेतला आहे.

****

No comments:

Post a Comment