Saturday, 3 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना आणि लसीकरण तीव्र करण्याचे निर्देश, केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत केंद्र सरकारनं, कोरोना साथरोगाबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश, सर्व राज्यांना दिले आहेत. प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केल्याशिवाय कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणं शक्य नाही, असं ते म्हणाले. जे लोक मास्क वापरत नाहीत आणि सामाजिक अंतर पाळत नाहीत, त्यांच्यावर राज्य सरकारनं कठोर कारवाई केली पाहिजे, असं कॅबिनेट सचिवांनी सांगितलं.

****

देशभरात काल सात कोटींहून अधिक लोकांच्या लसीकरणाचा टप्पा पार झाला. त्यापैकी सहा कोटी लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. देशभरात आतापर्यंत सात कोटी ३० लाख ५४ हजार २९५ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आलं. काल ३० लाख ९३ हजार नागरीकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मरण पावलेल्यांमध्ये ८८ टक्के रुग्ण हे ४५ वर्षे वयावरील होते हे लक्षात घेऊन, सरकारनं लसीकरण मोहीम राबवताना ४५ वर्षांवरील लोकांना प्राधान्यक्रमानं लस देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडनं होणारे मृत्यू कमी करण्यात या निर्णयाचा महत्त्वाचा वाटा आहे, असं प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य दो. व्ही.के. पॉल यांनी केलं आहे. लोकांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबरच कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी नियमांचं पालन केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

****

देशात काल नव्या ८९ हजार १२९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ७१४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी २३ लाख ९२ हजार २६० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ६४ हजार ११० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ४४ हजार २०२ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी १५ लाख ६९ हजार २४१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या देशभरात सहा लाख ५८ हजार ९०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथल्या मांजरपाडा प्रकल्पाच्या सुरु असलेल्या कामांची पालकमंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे उपाध्यक्ष  नरहरी झिरवाळ यांनी काल पाहणी केली. मांजरपाडा प्रकल्पाचं काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार असून, यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेनं पाणी उपलब्ध होणार आहे, तसंच भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून, भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भवण्यासाठी  हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ – सीबीएसईनं शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ साठी नववी ते बारावीच्या वर्गांचा अभ्यासक्रम कमी करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईनं नवा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला असून, गेल्या वर्षी वगळण्यात आलेले धडे आगामी वर्षात पुन्हा समाविष्ट करण्यात आले आहेत. अभ्यासक्रमात झालेला बदल केवळ एकाच वर्षापुरता मर्यादित होता, असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे.

****

येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, असा विश्वास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

****

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या बजाज हेल्थ केअर या केमिकल कंपनीत आज सकाळच्या दरम्यान भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या सहाय्यानं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आगीत कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचं वृत्त नसून, आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

****

सांगली जिल्ह्यातल्या पंधरा साखर कारखान्यांनी ७९ लाख आठ हजार ९०६ टन ऊसाचं गाळप करुन, ९३ लाख सात हजार ३१ क्विंटल साखरेचं उत्पादन केलं आहे. या कारखान्यांचा साखर उतारा ११ पूर्णांक आठ टक्के राहिला. पंधरापैकी तेरा कारखान्यांची धुराडी बंद झाली. सोनहिरा आणि उदगिरी या दोन कारखान्यांचे गाळप आणखी चार दिवस चालणार आहे.

****

सांगलीतल्या एका कोविड सेंटरनं रुग्णालयात वापरलेले पीपीई किट उघड्यावर टाकल्यामुळे, संतप्त नागरिकांनी काल रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. सदरची गाडी ही आदित्य डायग्नोस्टीक सेंटरची असून, याप्रकरणी महापालिकेनं रुग्णालयाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

****

उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद इथं १६ ते २५ एप्रिल दरम्यान होणाऱ्या आशियाई वेटलिफ्टिंग – भारोत्तोलन स्पर्धेत माजी विश्वविजेती मीराबाई चानू ही ४९ किलो वजनी गटात भारताचं नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत मीराबाईच्या कामगिरीवर क्रीडा रसिकांचं विशेष लक्ष असून, पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात १८ वर्षांच्या जेरेमी लालरीनुगा याच्या विजयाचीही अपेक्षा केली जात आहे.

****

No comments:

Post a Comment