Tuesday, 6 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ० एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर; दिलीप वळसे - पाटील नवे गृह मंत्री.

·      २५ वर्षांहून अधिक वयाच्या सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी.

·      पेट्रोल पंप, कार्गो, डेटा सेंटर, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि फळविक्रेत्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश.

·      कोविड रुग्णांवर उपचारासाठी अनामत रक्कम मागणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा आरोग्य मंत्र्याचा इशारा.

·      राज्यात ४७ हजार २८८ नवे कोविड रुग्ण, मराठवाड्यात ८१ जणांचा मृत्यू तर पाच हजार ४८६ बाधित.

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या, विविध ४१ अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ.

आणि

·      औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी सिल्लोडचे अर्जुन गाढे यांची निवड.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे - पाटील यांच्याकडे गृहविभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला होता आणि गृहविभागाचा कार्यभार वळसे - पाटील यांच्याकडे देण्याची विनंती केली होती. वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ यांच्याकडे, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याची विनंतीही राज्यपालांनी मान्य केल्याचं, राजभवनाकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

ज्येष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं काल दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश जी एस कुलकर्णी यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. परमबीर सिंह यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर असून, सीबीआयनं या प्रकरणी १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करावी, त्या आधारे सीबीआय संचालक पुढील कायदेशीर कारवाई निश्चित करू शकतात, असं न्यायालयानं म्हटलं आहे. या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाच्या आदेशानंतर पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य नसल्यानं राजीनामा देत असल्याचं, देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

भारतीय जनता पक्षानं या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, असं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन, हा सगळा घटनाक्रम एका मोठ्या षडयंत्राकडे निर्देश करत असल्याचं सांगितलं.

दरम्यान, विधान सभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, देशमुख यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलं आहे. मात्र देशमुख यांनी आरोप होताच राजीनामा द्यायला हवा होता, असं ते म्हणाले. देशमुख यांच्यावरचे आरोप आणि सचिन वाझे प्रकरणावर मुख्यमंत्री मौन असल्याबद्दल, फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केलं. देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं आणि निर्दोष सिद्ध झाल्यावर पुन्हा जबाबदारी सांभाळावी, असं फडणवीस यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हटलं होतं.

****

महाविकास आघाडी सरकारमधले अन्य एक मंत्री अनिल परब यांचीही चौकशी लवकरच होईल आणि या सरकारमधले अर्धा डझन मंत्री घरी बसतील, असं भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी काल औरंगाबाद शहरातल्या शासकीय रुग्णालयांची पाहणी केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कोविड महामारीचा सामना करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार अयशस्वी ठरलं असल्याची टीका, सोमय्या यांनी केली. औरंगाबाद इथं कोविड बाधित रुग्णांना देण्यात येत असलेल्या सेवा सुविधांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांची सोमय्या यांनी भेट घेतली, आणि रुग्णांना होत असलेल्या गैरसोयींबाबत त्यांच्याकडे तक्रार केली.

****

२५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. ४५ वर्षापुढील सर्वाना लस देण्याची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आभार व्यक्त केले. त्याच पत्रात लसीकरणासाठी पात्र वयोगट आणखी कमी करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. घराबाहेर कामाला जाणाऱ्या तरुण वर्गाला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या पत्रातून व्यक्त केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद, या सर्वाधिक संसर्ग असलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये, फक्त तीन आठवड्यात ४५ वर्षापुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी आहे, याकरता कोविड लसीच्या दीड कोटी मात्रा मिळाव्यात, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आज ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार असून, यावेळी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात येणार आहे.

****

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जारी केलेल्या ब्रेक दि चेनच्या आदेशात, आणखी काही अत्यावश्यक सेवांचा समावेश राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातला आदेश काल प्रसिद्ध करण्यात आला. पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी - माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा, शासकीय आणि खासगी सुरक्षा सेवा, फळविक्रेते यांचा देखील आता अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे. खासगी आस्थापना आणि कार्यालयांना सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करावं लागेल. जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल, असं सरकारनं सांगितलं आहे. दहा एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असं या आदेशात म्हटलं आहे.

****

कोविड रुग्णांवर उपचारासाठी अनामत रक्कम मागणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा इशारा, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते काल जालना इथं बोलत होते. राज्यातले अनेक खाजगी दवाखाने कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी, ५० हजार रुपये अनामत रक्कम मागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. हा अक्षम्य गुन्हा असून, या दवाखान्यावर तातडीनं कारवाई करण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेनं केलेल्या मागण्यांच्या संदर्भात, मुख्यमंत्री तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री पूर्णपणे विचार करतील, मात्र ही संप करण्याची वेळ नाही, याचं संघटनेनं भान ठेवावं, असं टोपे यांनी सांगितलं. 

****

राज्यात काल ४७ हजार २८८ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३० लाख ५७ हजार ८८५ झाली आहे. काल १५५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५६ हजार ३३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के झाला आहे. काल २६ हजार २५२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २५ लाख ४९ हजार ७५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८३ पूर्णांक ३६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात चार लाख ५१ हजार ३७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या पाच हजार ४८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८१ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, नांदेड जिल्ह्यातल्या २५, जालना अकरा, परभणी आठ, लातूर पाच, बीड तीन, उस्मानाबाद दोन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ४४० रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९०६, लातूर ८०४, बीड ५७५, परभणी ५५३, जालना ५२४, उस्मानाबाद ४२३, तर हिंगोली जिल्ह्यात २६१ नवे रुग्ण आढळून आले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सात एप्रिलला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम उद्या सायंकाळी सात वाजता ऑनलाईन स्वरुपात आयोजित केला जाणार आहे. परीक्षेचा ताणतणाव घालवण्यासंदर्भात या कार्यक्रमादरम्यान चर्चा होईल, असं पंतप्रधानांनी एका ट्विट मध्ये म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात गृहविलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर देणं आणि लसीकरणाच्या मोहिमेला अधिक गती देण्याचे निर्देश, पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. काल जालना इथं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत ते बोलत होते. मास्क, सॅनिटायजर आणि सामाजिक अंतराचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही, त्यांनी यावेळी दिले. शासकीय आणि खासगी रुग्णालयातल्या खाटांचं एककेंद्रीय पद्धतीने नियोजन करणं, ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आणि सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत, प्रशासनाला त्यांनी यावेळी सूचना दिल्या.

****

पंढरपूर इथलं श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदीर समितीनं घेतला आहे. मात्र विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील, तसंच इतर सणवार, उत्सवही परंपरेनुसार साध्या पद्धतीनं साजरे करण्याचा निर्णयही, मंदिर समितीनं घेतला आहे. समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, तसंच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी याबाबत एक पत्र जारी केलं.

****

तुळजापूर इथलं तुळजाभवानी मंदीर कालपासून भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या काळात भाविकांनी देवीचं ऑनलाईन दर्शन घ्यावं, असं आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केलं आहे.

****

महाराष्ट्रातल्या एकूण कोविड मृत्यूंपैकी १४ टक्के मृत्यू नांदेड जिल्ह्यात होत आहेत. ही बाब गंभीर असून, वाढती रुग्ण संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीनं नांदेड जिल्ह्यात आरोग्य पथक पाठवून उपाय योजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक मोरताळे यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी पंतप्रधान कार्यालयास ईमेलद्वारे पाठवलं आहे.

****

औरंगाबाद महापालिकेच्या जम्बो कोविड लसीकरणाला कालपासून प्रारंभ झाला. या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शहरातल्या सर्व नऊ प्रभागांमध्ये ४५ वर्षे वयाच्या पुढील चार हजार ४८१ नागरिकांनी पहिल्याच दिवशी लस घेतल्याची माहिती, उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.

****

कोविड-19 ची लस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर तसंच सुरक्षित असून, परभणी जिल्ह्यातल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी आवर्जून लसीकरण करण्याचं आवाहन, स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी केलं आहे. परभणी तालुक्यात जांब इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करून घेतल्यानंतर, ते बोलत होते. तुबाकले यांनी या केंद्रातल्या सुविधा आणि लसीकरणाबाबत माहिती घेतली.

****

परभणी इथं विनामास्क फिरणाऱ्या २२ जणांवर काल महापालिकेच्या पथकानं कारवाई करत, प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे चार हजार ४०० रुपये दंड वसूल केला. औरंगाबाद इथंही रात्री आठ वाजेनंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वाणिज्य, कला, विज्ञान यासह विविध ४१ अभ्यासक्रमांच्या परीक्षा, आजपासून सुरु होत आहेत. ‘कोविड’ संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले दिले आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय तसंच तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा, १६ मार्चपासून सुरु झाल्या आहेत. औरंगाबाद, जालना, बीड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा होत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसंच ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीनं परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली. ऑफलाईन परीक्षा देणाऱ्यांसाठी त्यांच्या महाविद्यालयातच परीक्षा केंद्र असेल, तर ऑनलाईन परीक्षा मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे देता येईल.

****

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतल्यानं, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांचे समर्थक सिल्लोडचे अर्जुन गाढे हे उपाध्यक्षपदी विजयी झाले. उपाध्यक्षपदासाठी कृष्णा पाटील डोणगावकर, दिनेश परदेशी, अर्जुन गाढे, जगन्नाथ काळे, आप्पासाहेब पाटील हे पाच जण निवडणूक रिंगणात होते. गाढे यांना तेरा तर डोणगावकर यांना सात मतं मिळाली.

****

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी खासदार निधीतून कार्डियाक रुग्णवाहिका परभणी जिल्हा रुग्णालयास उपलब्ध करून दिली आहे. या रूग्णवाहिकेचं मान्यवरांच्या उपस्थितीत काल लोकार्पण करण्यात आलं.

****

भारतीय स्टेट बँकेनं आपल्या गृह कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. सहा पूर्णांक ७० टक्क्यांवरुन हा व्याजदर सहा पूर्णांक ९५ टक्के करण्यात आला आहे. ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी हा व्याजदर लागू राहील. ७५ लाखापेक्षा अधिकच्या कर्जावर सात टक्के व्याजदर आकारला जाणार असल्याचं, बँकेनं म्हटलं आहे. 

****

यवतमाळ इथल्या एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुन्हा नोंद केला आहे. ही मुलगी यवतमाळहून औरंगाबाद शहरात मामाकडे राहण्यासाठी आली होती. यवतमाळ इथल्याच फुरकान खान नामक युवकाने या मुलीला पळवून नेल्याचं निष्पन्न झालं असून, संशयित आरोपीचा तपास सुरू असल्याचं, गुन्हे शाखेनं कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment